07/07/2023
नारळ सुपारीच्या वाड्या आणि बागायतदारांची मानसिकता.
----------------------------------------
चौल रेवदंड्यातील बरेचसे बागायतदार असे म्हणताना दिसतात कि नारळाच्या वाडीतून आजकाल फारसा फायदा होत नाही. मजूरी वाढल्याने बेणणी, बागेतील इतर खर्च आणि नारळातून मिळणारे उत्पन्न यामध्ये खर्चाचीच बाजू जास्त असल्याने वाड्या जोपासणे परवडत नाही. सुपारीतून जास्त उत्पन्न मिळते म्हणून काही जण सुपारीची झाडे जास्त लावतात. केळी, चिकूंवर वांदर ताव मारतात मग त्याची लागवड करून आम्हाला काय फायदा असाही बरयाच जणांचा सूर असतो. हि बाजू जरी खरी असली तरी आजकालच्या आधुनिक जमान्यात पुर्वीच्या लोकांसारखे आपण खरोखर फक्त वाडीवरच अवलंबून आहोत का ? आज आपल्यापैकी अनेक जणांकडे उत्पन्नाचे अनेक स्त्त्रोत आहेत. चौल रेवदंड्याच्या जैवविविधतेमुळे आज आपल्याकडे पर्यटन उद्योग विकसित होत आहे. यामुळे गावातील अनेक लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळत आहे. नारळ सुपारीच्या वाड्या आहेत म्हणून पर्यटक आपल्याकडे येत आहेत. कुणाचे टेंपो आहेत तर कुणाच्या रिक्षा आहेत. अनेक तरूण बाहेरगावी खाजगी किंवा सरकारी नोकरीत आहेत. सुतार, गवंडी, प्लंबर यांना भरपूर काम मिळत आहेत. हे सर्व मिळतेय याला कारण आपल्या पाठीशी निसर्ग मजबूत पणे उभा आहे. बाहेरच्या शहरी जगाशी तुलना केली तर आपल्याकडील शुद्ध हवा हि त्या वाड्यांमुळेच आहे. भरपूर पाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे ,वृक्षवेली आपल्या आजूबाजूला असल्याने एकमेकावर अवलंबून असलेले पशूपक्षी, किटक, प्राणी यांचे चक्र अजूनतरी शाबूत आहे. मग वाड्यांमधून आम्हाला विषेश उत्पन्न नाही असे का बरं म्हणायचे ? भाजीपाला शेतकरयाचे वांदर नुकसान करतो हे जरी खरे असले तरी वाडीत सुद्धा हा वांदर आपले खरोखर नुकसान करतो का ? त्याला खाण्यासारखी फळझाडे आपण ठेवलीच नाहीत तर त्याचा मोर्चा भाजीपाल्याकडे वळणारच. तो वालाचेही नूकसान करणार. माझ्या मते इतर उत्पन्नाचे स्त्त्रोत असलेल्या वाडीवाल्यांनी मुद्दाम वांदरांसाठी भरपूर केळी, चिकू , कोकंब अशी लागवड वाढवावी.
यामुळे वांदरांची संख्या वाढेल आणि ते आपल्याला आणखीन त्रास देतील अशी उगाच भिती बाळगू नये. वांदर हा प्राणी सुद्धा आपल्या जैवविविधतेचाच एक भाग आहे. निसर्ग well balanced आहे . तो उगाचच कुणाची संख्या वाढू देत नाही. निव्वळ पैसा मिळवायचा म्हणून एकाच प्रकारचे पिक मोठ्याप्रमाणात घेणेही निसर्गाच्या विरूद्ध आहे. यामुळे निसर्गात एकमेकांवर अवलंबून असलेल्या जैवसाखळीला बाधा होऊन जैवविविधता संपुष्टात येण्याचा धोका असतो. मुंग्या, साप, बेडूक, परागीभवन करणारे विविध किटक, फुलपाखरे, पक्षी, सर्व प्रकारचे प्राणी हि त्या निसर्ग देवतेची अद्भुत निर्मिती आहे. आपणही त्याचाच एक भाग आहोत. सात बारावर जरी आपले नाव असले तरी मूळ जमीन त्याची आहे. गणपती बाप्पा, मारूतीराया अशी प्राणी रूपे देवतामानावी आणि जैवविविधता टिकावी हाच आपल्या पूर्वजांचा उद्देश असावा. निसर्ग टिकवण्याची गरज आहे. मानसिकता बदलण्याची गरज आहे.
निसर्ग मित्र, शैलेश राईलकर,
चौल, अलिबाग. 8010371773.