07/09/2023
#भिलार_सडा_परिसरासह_महाबळेश्वर_वनपरिक्षेत्रात_कचरा_टाकल्यास_होणार_दंडात्मक_आणि_कायदेशीर_कारवाई
महाबळेश्वर वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या हद्दीत प्लास्टिक आणि इतर स्वरूपातील कचऱ्याचे ढीग दिसून येऊ लागले आहेत. या कचऱ्यामुळे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाचे आणि येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाच्या क्षेत्रात अशा पद्धतीने कचरा टाकल्यामुळे परिसंस्थेत बदल होऊ घातले आहेत.
वनपरिक्षेत्रात काही ठिकाणी काही मद्यपी खुलेआम दारू पिताना दिसून येत आहेत. हे समाजविघातक लोक जाताना हा कचरा इथेच टाकून जातात. प्लास्टिक सारखा न कुजणारा कचरा वर्षानुवर्षे इथेच पडून राहून पर्यावरण धोक्यात येण्याचा संभव आहे.
महाबळेश्वर सारख्या तालुक्याची उपजीविका पर्यटनावर आधारित असल्याने जर इथले पर्यावरण, वनवक्षेत्र यांना कचऱ्याने ग्रासल्यास येथे पर्यटक पाठ फिरवतील.
वरील सर्व बाबींना ध्यानात घेऊन श्री. नितीन (भाई) भिलारे , (संस्थापक / अध्यक्ष , मैत्री सामाजिक संस्था) यांचे निवेदनावरून महाबळेश्वर वनपरिक्षेत्रपाल यांनी आज भिलार येथील सडा परिसरात स्वतः भेट देऊन येथील वन परिसराच्या दुरावस्थेची पाहणी केली. या सडा परिसरात औषधी वनस्पतींचे भांडार असून त्यांची जपणूक होणे गरजेचे आहे.
यापुढे वन परिसरात कचरा टाकताना आणि मद्यपान करताना आढळून आल्यास कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच रंगेहाथ पकडून त्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. यामुळे वनपरिक्षेत्रात यापुढे कचरा टाकण्याचा विचार देखील कोणी करू नये. असे प्रतिपादन श्री. काकडे साहेब यांनी केले आहे.
श्री. नितीन भाई यांनी वनविभागाचे सौंदर्य हे टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही सर्वस्वी आपली असून त्यापासून आपल्याला प्रतारणा करता येणार नाही. इथली निसर्ग संपदा हीच आपली खरी संपत्ती आहे. आपल्या आरोग्यासाठी इथले पर्यावरण प्रदूषण विरहित राहणे गरजेचे आहे. याकरिता आपण वनविभागाच्या हद्दीत अथवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे पूर्णपणे बंद करायला हवे. नाहीतर हा कचऱ्याचा राक्षस आपल्या आरोग्याला, इथल्या पर्यावरणाला आणि पर्यायाने इथल्या पर्यटनाला गिळून टाकेल.