03/04/2022
. 🚩🚩 *किल्ले सुंदरगड* (दात्तेगड)🚩🚩
पाटण:- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाटणच्या वायव्येस तीन मैलावर सह्याद्रीच्या रांगेत सुंदरगड हा किल्ला आहे. या किल्ल्यास दातेगड, घेरादात्तेगड, दंतगिरी, हातगड आणि सुंदरगड अशी नावे आहेत. सद्या हा किल्ला सुंदरगड, दातेगड या नावाने प्रचलित आहे. किल्ला साधारण २.५० हेक्टर परिक्षेत्रात असून आयताकृती आहे. किल्ल्यास चारही बाजुस नैसर्गिक सौंदर्य आहे. काही ठिकाणी तटबंदी पहायला मिळते. या तटाला तोफा डागण्यास व निरीक्षणास जागोजागी जंग्या, टेहळणी कक्ष आहे. किल्ल्यावरील मुख्य आकर्षण गजलक्ष्मी तलवार विहीर व विहीरीतील शिवमंदिर आणि पश्चिम बाजूकडील खंजीराच्या आकारातील महाद्वार व महाद्वारातील गणपती, वीर हनुमान मूर्ती आहे. इतिहासीक शिल्प कलेचा अदभुत नमुना सुंदरगड आहे. या किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला असून जवळच तिर्थक्षेत्र धारेश्वर, के टू पॉईंट, पवनचक्की प्रकल्प, सडावाघापूर उलटा धबधबा हि प्रेक्षणीय स्थळे आहेत.
*पाटण महालाची राजधानी सुंदरगड*
*एक निगराणी किल्ला*
पाटण महालाचे संरक्षण करण्यासाठी त्याकाळचे आवश्यक साधन म्हणून सुंदरगडाचा उपयोग केला गेला आहे. पाटण महालाच्या मध्य ठिकाणी असलेल्या सूंदरगडावरुन वंसतगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड, गुणवंतगड (किल्ले मोरगिरी), प्रचितगड, भैरवगड, जंगलीजयगड या किल्ल्यांची निगराणी राखली जात होती. म्हणून या किल्ल्याला निगराणी किल्ला असेही म्हटले जाते. यावरुन पाटण महाल किती मोठा होता हे लक्षात येते. इतिहास काळात पश्चिम महाराष्ट्रातून कोकण प्रातांत उतरण्यासाठी पाटण महालातून सुंदरगड- गुणवंतगड- भैरवगड किंवा जंगलीजयगड यामार्गे उतरले जात होते. जंगली जयगड जवळील तोरणे गावाजवळील कोकण खिंड हि या मार्गाची आजही साक्ष आहे. एकाच वेळी एकच घोडा जाईल ऐवढाच मार्ग या खिंडीत असुन शत्रू सैन्याला या खिंडीत कचाट्यात पकडून युद्ध केले जात होते. शिवकाळात या खिंडीजवळ जवळ अनेक लढाया झाल्या त्याची अवशेष आजही पहायला मिळतात. सैनिकांच्या करमणूकीसाठी असलेला नायकीणीचा वाडा व इतिहास कालीन उगवीण देवीचे मंदिर येथे पडलेल्या अवस्थेत आहे.
शिवकाळात कोकण प्रातांत उतरण्यासाठी पाटण महाल हा एकमेव मार्ग असल्याने सुंदरगडावर त्या काळचे राजे, महाराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे येणे-जाणे होते. शुभकार्याची प्रथम देवता श्री गणपती, वीर हनुमान आणि शिवमंदिर यांची जागृत मूर्ती देवस्थाने सुंदरगडावर असल्याने या प्रातांतील कोणतीही मोहीम, लढाई व शुभकार्याची सुरुवात या दैवतांच्या दर्शनाने होत असे. यावरून सुंदरगडाचे पाटण महालातील शिवकालीन महत्त्व आजच्या पिढीसमोर येते.
*सुंदरगडावरील प्रमुख अवशेष*
सुंदरगडावर दक्षिण बाजूने टोळेवाडी मार्गे आणि उत्तरेकडून जाईचीवाडी मार्गे गडाच्या पश्चिम महाव्दारातून जाता येते. उत्तरेकडील मार्ग अल्लाहदायक निसर्ग सानिध्यातून काही क्षणाचा जंगल सफारीचा आनंद मिळवून देतो. या मार्गावरून जाताना काही इतिहासीक गुंफाचे दर्शन होते. पश्चिम मुख्य महाव्दारात पोहचताच वीरहनुमान, गणपतीचे दर्शन होते. या महाव्दाराचे वैशिष्ट्य म्हणजे सुर्यदय होताना सूर्यकिरण श्रीगणपती पाषाणावर येते तर सुर्यास्त होताना सूर्यकिरण वीरहनुमान पाषाणावर येते अशा वैशिष्ट्यपूर्ण महाव्दाराचा आकार बारकाईने पाहिला तर शिवकालीन शस्त्र 'खंजीर' सारखा दिसतो. या खंजीर महाव्दारातून गडाच्या माथ्यावर जाता येते. माथ्यावर अनेक ठिकाणी इतिहासीक वास्तूचे पडलेल्या अवस्थेत अवशेष पाहायला मिळतात.
खंजीर महाव्दाराच्या उत्तरेकडील वरच्या बाजूस अखंड खडकात खोदलेली गजलक्ष्मी तलवार विहीर दिसते. तलवार विहिरीच्या पात्याच्या टोकापासून विहिरीत उतरण्यास ४१ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. विहिरीच्या मध्यभागी पश्चिमे बाजूस महादेवाचे मंदिर कोरलेले आहे. याचा आकार सरासरी आठ फूट लांब, सहा फूट रुंद व सात फूट उंच असा आहे. मधोमध दगडी पाशाणातील शिवलिंग असून मंदिरा बाहेर नंदी आहे. नंदीच्या पाठीवरील झूलावर वैशिष्ट्यपूर्ण नकशीकाम असून हे नकशीकाम म्हणजे किल्ल्याच्या अंतर्गत पोठात असलेल्या गुप्त मार्गांचा नकाशा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या अगदी वर विहिरीच्या वरच्या टोकास हत्ती कोरलेला असून या हत्तीस गजलक्ष्मी असे म्हणतात. यावरून या विहिरीला "गजलक्ष्मी तलवार विहीर" असे म्हणतात. अशा या वैशिष्ट्यपूर्ण गजलक्ष्मी तलवार विहिरीत नैसर्गिक थंडावा व मंदिरात हवेच्या झुळूका अनुभवयास येतात. विहिरीत बारमाही पाणी आहे. पाण्याची खोली किती हे सांगता येत नाही. मात्र पाऊसाळ्यात विहिरीतील पाणी महादेव मंदिरापर्यंत येवून शिवलिंगास पोहचलेकी पाटण महालात अतिवृष्टी, पूरस्थिती निर्माण होते असे सांगितले जाते. कितीही पाऊस, अतिवृष्टी झाली तरी विहिरीतील पाणी महादेव मंदिराच्यावर येवू शकत नाही. ही येथील वेगळी खाशीयत आहे. तलवार विहीर वरुन पाहताना डोकावून न पहाता स्वतः ची काळजी घेऊन पहाणे.
तलवार विहिरीच्या उत्तरेकडील बाजूस अखंड खडकात खोदलेले वाड्याचे व टाक्यांचे अवशेष दिसतात. यातील काही टाक्या धान्य साठवण, पाणी साठवण साठी असाव्यात असे सांगितले जाते. गडाच्या दक्षिण बाजूस जुन्या बांधकामाची अवशेष आहेत. ही बांधकामे दगडी ज्योत्यांची असून त्यावर पूर्वी वाडे, घरे यांची बांधकामे दिसतात. ही बांधकामे पूर्ण ढासळलेल्या स्थितीत आहेत. गडावर एक अंधार कोठडीही आहे. असे सांगितले जाते. संपूर्ण किल्ला फिरुन पाहताना किल्ल्याच्या चारही दिशेस सह्याद्रीच्या पर्वतरांगासह नैसर्गिक सौंदर्य आहे. दक्षिणेच्या बाजूस पश्चिमेकडून पुर्वेस वाहणारी कोयनामाईचा प्रवाह लक्षवेधक आहे. तर उत्तरेकडील बाजूस केरा नदीच्या खोऱ्याचे विलभणीय दृश्य आहे. या किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला असून जवळच तिर्थक्षेत्र धारेश्वर, के टू पॉईंट, पवनचक्की प्रकल्प, सडावाघापूर उलटा धबधबा हि प्रेक्षणीय स्थळे आहेत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩