16/04/2021
सिर सलामत तो पगडी पचास.....
आमच्या कात्रज ते सिंहगड आणि कळसूबाई नाईट ट्रेक नंतर आमचा ट्रेक ठरला हरिश्चंद्रगड, तो ही नळीच्या वाटेने. शनिवार - रविवार गडावर गर्दी असेल म्हणून आम्ही गुरुवार-शुक्रवार-शनिवार, ७-८-९ जानेवारी ट्रेक करायचा असे ठरवले. ७ तारखेला दुपारी पुण्यातून निघून बैलपाडा गावात मुक्कामी पोहोचणे, ८ तारखेला पहाटे ट्रेक चालू करून जेवणाच्या वेळेपर्यंत गडावर पोहोचणे, गडदर्शन करणे, ९ तारखेला सकाळी लवकर निघून हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारलिंग वगैरे बघून टोलारखिंड मार्गे खिरेश्वर ला उतरणे, खिरेश्वर ला जेवण करून संध्याकाळपर्यंत पुण्यात परतणे असा कार्यक्रम ठरला होता.
ठरल्याप्रमाणे ७ तारखेला दुपारी दिड वाजता आम्ही पुण्यातून निघालो आणि संध्याकाळी सहा वाजता बैलपाडा गावात पोहोचलो. वातावरण ढगाळ असल्याने अंधार लवकर पडला होता. बैलपाड्यात पोहोचल्यावर कमा ने आम्हाला त्यांनी बांधलेल्या नवीन घरात उतरवले. जेवण येईपर्यंत गप्पा मारल्या. मग मिलिंद ने ट्रेक रुट बाबत ब्रिफींग दिले. या आधी माझा हरिश्चंद्रगड ट्रेक चा बेत, ४ ते ५ वेळा, काही ना काही कारणांनी रद्द करावा लागला होता त्यामुळे हरिश्चंद्रगडावर जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. दुसरे म्हणजे मी स्वतः कधीही राॅक क्लाईंबींग केलेले नाही, माझ्या मित्रांचा हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेनेच करायचा असा आग्रह होता, नळीच्या वाटेवर २-३ ठिकाणी थोडासा टेक्निकल क्लाईंब असल्याने मी मिलिंद ला ट्रेकला येण्याबाबत विचारले, तो लगेच तयार झाला. आम्ही बैलपाड्याला पोहोचल्यावर, इतके वर्ष काही ना काही कारणांनी न करता आलेला ट्रेक मी करणार, तो ही थेट नळीच्या वाटेने, म्हणून मी खूष होतो. ब्रिफींग झाल्यावर कमा ने आणलेल्या चविष्ट जेवणावर सगळ्यांनी आडवा हात मारला. पहाटे लवकर उठायचे असल्याने आम्ही लवकरच झोपलो.
ठरल्याप्रमाणे ८ तारखेला पहाटे ४ वाजता उठलो. चहा पिऊन, प्रातर्विधी आटपून, ५.४५ वाजता ट्रेक चालू केला. आमच्या बरोबर, बैलपाड्यातील, कमा, कमळू आणि काशिनाथ या तीन भावांपैकी कमा आला होता. आम्ही जसे जसे कोकणकड्याजवळ जात होतो तसा तसा तो आपल्या रौद्रभीषण सौंदर्याचे वेगवेगळे पैलू उघडून दाखवत होता आणि ते बघून आम्ही अक्षरशः निशब्द झालो होतो.
आम्ही बैलपाड्यातून निघालो तेव्हा वातावरण ढगाळच होते. आणि असेही आम्ही पश्चिम बाजूने चढत असल्याने आम्हाला उन्हाचा त्रास होणारच नव्हता. कमा सगळ्यात पुढे आणि मी व मिलिंद मागे. नाळेतून चढता चढता मी सहजच मागे बघितले तर मोरोशीचा भैरवगड, वऱ्हाडाचे डोंगर, नाणेघाट याबाजूला पाऊस पडत असलेला कळत होता. नळीच्या वाटेकडची बाजू मोकळी होती पण माकडनाळेच्या बाजूने काळेकुट्ट ढग येत होते. नळीच्या वाटेकडे डावीकडे वळण्याच्या थोडं आधी पावसाची भुरभुर सुरू झाली. मी मिलिंद कडे बघितले आणि म्हणालो, "असा पाऊस सुरू राहीला तर वर कसं जायचं?" मिलिंद मला म्हणाला, "अशा परिस्थितीत नळीच्या वाटेने वर जाणे योग्य ठरणार नाही." मग मिलिंद ने कमा ला हाक मारून थांबायला सांगितले. कमा आमच्यापासून फार लांब नव्हता. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस थोडा वाढला होता. आमच्या सुदैवाने कमा जिथे थांबला होता तिथे एका मोठ्या कातळाखाली आम्हा ८ जणांना आडोसा मिळेल एवढी जागा होती. पाऊस वाढल्याने आम्ही सगळे त्या कातळाखाली बसलो. अशा पावसात वर न जाण्याचा निर्णय मिलिंद ने घेतला. एकंदरीत परिस्थिती बघता त्या निर्णयाला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण "सेफ्टी फर्स्ट".
बैलपाड्यात परतायचे ठरल्याने आम्ही बरोबर घेतलेला चहा पीत, पाऊस थांबायची वाट बघत त्या कातळाखाली बसून राहिलो. १५-२० मिनिटांनी पाऊस थांबला आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. पावसामुळे दगड निसरडे झाल्याने आम्हाला अतिशय सावधपणे उतरावे लागत होते. आम्ही जिथून खाली उतरायला सुरुवात केली तिथे चढून जायला आम्हाला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला खाली उतरून यायला लागला. एका दगडाबाबतचा, तो दगड कोरडा असल्याचा, अंदाज चुकल्याने माझा डावा पाय त्या दगडावरून सटकला आणि मुरगळला. पण अँकल शूज असल्याने फक्त पाय मुरगळण्यावरच भागले. माझा पाय मुरगळणे सोडल्यास बाकी कोणालाही काही झाले नाही.
बैलपाड्यात पोहोचल्यावर कमा कडे जेवण केले आणि जीप करून खिरेश्वर ला गेलो. या कमाची कमाल म्हणजे त्याला पाचनई ला एका लग्नाला जायचे होते. तो आम्हाला गडावर सोडून पाचनईत उतरणार होता. पण गडावर जायचा आमचा बेत रद्द झाल्याने त्याने गावात एकाला फोन करून बोलवून घेतले. आम्हाला त्याच्या हवाली केले आणि हा पठ्ठ्या निघाला नळीच्या वाटेने गड चढून, पाचनई मार्गे उतरून लग्नाला जायला.
खिरेश्वर ला जाऊन, टोलारखिंड मार्गे गड चढून, शनिवारी सकाळी खाली उतरू असे एका मित्राच्या मनात आले. पण हरिश्चंद्रगड सारख्या किल्ल्यावर जाऊन फक्त भोज्जा केल्यासारखं करून खाली उतरणे यात काही मजा नाही असं मिलिंद ने त्याला समजावले. त्यामुळे मग खिरेश्वर चे मंदिर बघू आणि आराम करू असे ठरले. खिरेश्वर ला जाताना आधी मंदिर बघितले आणि मग चिंतामणी च्या हाॅटेल वर गेलो. त्याने पण आम्हाला अत्यंत चविष्ट जेवण दिले. जेवणाबरोबर स्वीट डिश म्हणून गरमगरम शिरा दिला. त्यानेच आमची तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या व्हरांड्यात सोय करून दिली. शनिवारी सकाळी आरामात उठून, आवरून आम्हाला घ्यायला येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ची वाट बघत बसलो.
या ट्रेक ला आम्ही, वय वर्ष १३ ते ६० या वयोगटातले ८ जण होतो. १३ वर्षांची मुलगी "सांज" हिने तिच्या बडबडीने आमची भरपूर करमणूक केली. आमच्या सर्वांच्या बडबडीने तिची पण भरपूर करमणूक झाली असावी कारण आमची बडबड ऐकून तिचे हसणे थांबतंच नव्हते. आमचा ट्रेक ठरल्याप्रमाणे झाला नाही पण तरीही आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं.