24/06/2023
ध्यानी मनी आणि नियोजित नसताना अचानक आखलेले प्रवास म्हणजे अनेक आठवणींची , अनंत आनंदाची आयुष्यभराची साठवण . हा प्रवास जर बिंधास्त , बेफिकर , मोटरसायकल प्रवासाचा कैफ चढलेल्या मित्रांसोबत असला तर तो आणखीन निराळा .
"जगायला मिळणं ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे . ही दुर्मिळ गोष्ट माणसाला मिळालेली असूनही बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत म्हणुन अस्तित्वात असतात . ते खर्या अर्थानं जगतंच नाहीत ; असे आपल्यासोबत व्हायला नको म्हणुनच आयुष्याचा प्रवास वसूल जगा ." हे वाक्य लिहिणार्या लेखक श्री अभिषेक कुंभार या फिरस्त्याच्या गोष्टीचं पुस्तक "फिरस्ते" .
भोर महाड रस्त्याला पुण्यापासुन ५० किलोमीटर अंतरावर असणार्या "आपटी" गावातील मटणा भाकरीच्या बेतावेळी अचानक गप्पांत आलेला "लह लडाख" चा बेत . हा प्रवास अथं पासुन इती पर्यंत सांगण्यापूर्वीच प्रारंभालाच दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे यांचं ते वाक्य लिहीतात "आयुष्यात दोन गोष्टी नक्की करा . असं आयुष्य जगा की लोकांनी तुमच्यावर लिहावं किंवा असं काही लिहा जे लोकांनी आवर्जून वाचावं ."
"फिरस्ते" हे लेखक अभिषेक कुंभारनं जगलेला प्रवास ज्यावर त्याच्या नंतर मला लिहावं वाटलं आणि त्याने लिहिलेलं इतरांनी आवर्जुन वाचावं असं "फिरस्ते" .
खरं तर मित्रांच्या याद्यांमधुन अशा प्रदिर्घ प्रवासासाठी असेच मित्र तयार होतात ज्यांचा तीथे पोहोचण्याचा , पहाण्याचा योग असतो .
"६०००/६५०० किमी प्रवास आणि आठ मित्र" याची गोष्ट फिरस्ते .
"तू काॅल करशील ना रोज ? मला विसरुन तर नाही ना जाणार ! कुणी दुसरी काश्मीरवाली नाही ना आणायचास ?" निघण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच २० जुनच्या विशेष भेटींतलं वाक्य अविवाहितांना हसवुन पुढे वाचायला नेतं . जुन च्या पावसाळ्याच्या तोंडावरच निघालेल्या एकमेकांना संभाळत तरीही एकमेकांची खिल्ली उडवत निघालेला अभिषेक कोकणामधुन जाताना "अतिथ्यशिल कोकण सदैव आपणास खुणावतंच असतं "येवा कोकण आपलोच असा !" म्हणत कोकणचं मनोमन कौतुक करतो .
प्रत्येकाच्या हेडफोनवर वाजणारी निरनीराळी गाणी आणि अरजित , रिकी मार्टीन , नुसरत , राहत , जस्टीन , एनरीके , बादशहा , फाझलपुरिया , हनीसिंग , आतिफ हे गायक जणु एका गाडीवर एकेका व्यक्तीसोबत स्वार होऊन वाहत होते लिहित कल्पना विस्तार करतो .
आमदारकी खासदारकी सोडुनही राजकारण्यांच सामान्य जनतेशी असलेलं नातं म्हणजे शाकारलेल्या पण फुटक्या कौलावर किंवा वाळवणावर बांधबंदिस्तीत नीटसा पांघरुण ठेवलेला नेत्याचा बॅनर हेच चित्र असतं . किती उपहासात्मक परंतु संवेदनशीलतेनं लेखक अभिषेकनं केलेलं भाष्य फिरस्तेमध्ये आहे .
पहिलाच दिवस ५२५ किलोमीटरचा प्रवास ; पृष्ठाचं सारं संवेदनच मरुन गेलं होतं . प्रत्येकजण फेंगडा चालत होता . नियती अजिबात कठोर नव्हती पण यांनीच काय ती यांची ( नियती ) कठोर करुन घेतली होती . शब्दांचे खेळ ते हेच !
कुठे आहेत आमचे पोहे ? कुठंय आमचे उपीट , शिरा , मिसळ , डोसा , इडली ? काही म्हणुन दिसत नव्हतं ! गुजरात मध्ये झालेले महाराष्ट्रीय खवय्यांचे हाल .
ज्यावर आपण अरेरावी करतो त्या चौकातील मारवाड्याच्या गावी आलो आहोत त्यामुळे आता इथं जास्त टारटुर झाली केली तर त्याचाच पाहुणा आपला समाचार घ्यायचा मनात येत लेखकाला हिंदी चित्रपटातील "अपनी गली मे तो कुत्ता भी शेर होता है !" संवाद आठवतो .
बेटाजी बेटाजी करत भाई बेतानं चंदन लावत होता याला म्हणतात व्यापारी नाहीतर आम्ही इकतोय वावर आन दावतोय पावर . उदयपुर मध्ये भेटलेलेल्या कार सेवा व्यवसायीकाचा किस्सा गंमतीशीर रंगवला .
गंमती जंमतीसह सुरु असलेला प्रवास मध्येच अनाकलनीय होतो . अनपेक्षीत घटना , प्रसंगानं जिवावर बेतता बेतता रहातं . भेटलेले फौजी , महाराष्ट्र परिसरामधील मराठी माणसं यांसह अनामिक भावनिक नातं जोडलं जातं .
लेह लदाक चा ज्वर मलाही गेले काही महिने चढला आहे . तो ज्वर उतरतो आहे जातो आहे . तो ज्वर बहुदा सार्याच लेह वेड्यांना काही प्रश्नांसहीत येत जातो हे "फिरस्ते" मध्ये वाचायला भेटले .
या आधी सुद्धा लेह प्रवासावर आधारीत पुस्तक वाचण्यासाठी मागवीले परंतु त्या मध्ये केवळ लेह स्पर्श जाणवला ; प्रवासाचं अंतरंग "फिरस्ते" मध्ये वाचायला मिळालं .
प्रवासवर्णन वाचता वाचता . आपणही बुलेट्स सोबत शब्द वाचनानी प्रवास करु लागतो .
तीथले भौगोलीक वातावरण , हवामान याचा रायडर्सवर होणारा परिणाम . प्रवासा दरम्यानचे अपघात तरीही एकमेकांना संभाळुन घेण्यातील मैत्रीचा प्रवास अवश्य वाचण्यासारखा !
लेह निघावं की नाही या द्विधा मनस्थितीमधील हौशींसाठी हे निर्णयात्मक पुस्तक !
अभिजित अजितकुमार जंगम .