शिवकालीन वाघेश्वर मंदिर, पवना धरण.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणाची १९७२ साली निर्मिती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळातील पवना खोर्यात पवना धरण आहे. शिवकालीन गावे, ऐतिहासिक वास्तू या धरणाच्या पाण्यात आजही अस्तित्वात आहेत. पवना खोर्यातील अजिवली गावाजवळील वाघेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर १० महिने पाण्यात आणि उन्हाळ्यातील या दिवसांत पाणी कमी झाल्याने २ महिने दृष्टीस पडते. सध्या हे मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक गर्दी करत आहेत.
सध्या मंदिराची बरीच पडझड झाली आहे. बहुतांश भिंती ढासळल्या आहेत. मंदिराच्या समोर नक्षीकाम केलेले कळसाचे दगड, भंगलेल्या मूर्ती, वीरगळ, सतीशिळा असे अवशेष पडले आहेत. मंदिरासमोर भग्नावस्थेतील नंदी अणि शिवलिंगही दृष्टीस पडते. खांबांवर पानांचे नक्षीकाम आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे, तसेच मुख्य प्रवेशद्वार सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह आजही तग धरून आहे.
एका ठिकाणी तर एका खांबावर सभामंडप तग धरुन आहे, आत संगमरवरी फरशा व त्यात कासव आहे. एक छोटीशी घंटा अडकवलेली असून, समोर सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती आहेत व आत शिवलिंग आहे. वास्तुशैली पाहून मंदिर मध्यमयुगीन आहे व मुघलकालीन शिखराची रचना हे वेगळेच वैशिष्ट्य आहे. या मंदिरात २०० किलो वजनाची पंच धातुची मोठी घंटा होती ती आता गावात नव्याने बांधलेल्या वाघेश्वराच्या मंदिरात ठेवली आहे. मंदिराच्या आजूबाजूला गड किल्ल्यांचा प्रदेश आहे.
पुरातत्व खात्याने यावर वेळीच लक्ष देऊन ते पाण्याबाहेर काढून पुन्हा संवर्धन करणे गरजेचे आहे. गाळ आणि पाण्यात लुप्त होणारा ऐतिहासिक वारसा फक्त दोन महिने उन्हाळ्यापुरता कौतुकाचा विषय होतो, परंतु त्याच्या इतरत्र संवर्धनाविषयी पुरातत्व खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.
तळेगाव दाभाडे येथे तळ्याच्या खोदकामात सापडली ऐतिहासिक विहिर...