06/10/2019
नमस्कार फक्कड हो...
(१० एकरातील पोस्ट आहे त्यामुळे वाचनाचा कंटाळा असणाऱ्यांनी २-२ एकर करीत वाचली तरीही चालेल!)
कमीतकमी खर्चात ट्रेक करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे. पेजच्या नावावरूनच तुम्हा सर्वांना मूळ उद्देशाची कल्पना आली असेलच. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अश्याच कमी खर्चात ट्रेक करणाऱ्या तुमच्या-आमच्या सारख्या सर्व भटक्या मंडळींची एक मोट बांधण्याची संकल्पना डोक्यात आली, आणि तीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं पहिलं पाऊल पडलं ते थेट दुर्गराज राजगडावर!
होय मित्रहो 'गरीब ट्रेकर्स' च्या नावाखाली आयोजित करण्यात आलेला 'राजगड भ्रमंती' हा पहिलाच ट्रेक! आपल्या समूहाचे सहसंस्थापक अक्षय खेळुकर व सुरज हांडे च्या नियोजनाखाली प्रवास, जेवण, मुक्काम अशी कशाचीही आबाळ न होता राजगडाची दोन दिवसीय भ्रमंती यशस्वीपणे पार पडली. पहिल्याच ट्रेकसाठी माझ्या(वैभव इंदूरकर)सह अन्य पाच भटक्यांची साथ मिळाली. स्थळदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून आविनाश साबळे दादांचं मार्गदर्शन लाभलं. पद्मवतीमाची, बालेकिल्ला, संजीवनी, सुवेळा, पालिदरवाजा ह्या सहित जिकडे खूप कमी पावलं वळतात अशी काळेश्वरी बुरुज, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा अशी ठिकाणे सुद्धा त्यांनी दाखवली. पहिल्या दिवशी चोरदिंडी मार्गे गडप्रवेश, पद्मावती माची, बालेकिल्ला, व संजीवणीवर सूर्यास्त असं काहीसं नियोजन होतं त्यापैकी संजीवणीवरील सूर्यास्त वगळता बाकी नियोजनाप्रमाणे पार पडले. धुक्यामुळे संजीवणीवरील सूर्यास्त पाहता आला नाही. त्याच्याप्रतिक्षेत संजीवणीवर बराच वेळ घालवल्यानंतर आपल्याच काही भटक्या मित्रांनी केलेला प्लास्टीक रॅपर्स, बॉटल्स, कागद, कपडे असा बहुमूल्य ऐवज सापडला तो गोळा करत पद्मावतीकडे परतीस निघालो. रात्रीच्या पोटोबासाठी मॅगीची पाकिटे सोबत आणलेली होतीच. ती बनवण्यासाठी चूल मांडली. पण पावसाळा जरा जास्तच लांबल्यामुळे सुक्या लाकडांची फारच कमतरता होती. त्यामुळे गडावरील जमा केलेला कचरा जाळण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी, अविनाश व प्रवीण ने लगेचच एका आडोश्याला चूल मांडली. प्रवीण ने पातेलं आणलेलं त्यात सुरजने मस्त पैकी मॅगी बनवली. दिवसभराच्या पायपीटमुळे लागलेली भूक आणि गडावरील प्रचंड थंडी यामुळे ती गरमागरम मॅगी जरा जास्तच चविष्ट लागत होती. पोटोबा झाल्यानंतर पद्मावतीच्या देवळात सर्वांनी अंग टाकलं. तिथेच सर्वांचा एकमेकांशी परिचय करून घेतला त्यानंतर राजगडाचा इतिहास, गडावरील ठिकाणे याविषयी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सोमवार(working day) असल्याने गडावर आम्हा सहा टाळक्यांव्यतिरिक्त इतर कुणीही नव्हतं. अमावस्येची रात्र, गडावरील प्रचंड थंडी अन धुकं, भयाण शांतता यात रातकिड्यांची किरकिर रात्रभर जाणवत होती. दुसऱ्यादिवशी पहाटेच सुवेळावर सूर्योदय पाहायला जाण्याचं नियोजन होतं. सकाळीच उठून सुवेळाकडे गेलो खरे पण राजगड त्याच्या मनात असेल तेवढंच दाखवतो म्हणतात!प्रचंड धुक्यामुळे सूर्यदर्शन काही झाले नाही. मग परत येताना नेढ्यातील थंडगार वारा अनुभवला. चौबाजुला दिसणारा हिरवागार परिसर न्याहाळताना फोटोग्राफीचा मोह कुणालाही होणारच, मग मनसोक्त फोटो काढले. तिकडून काळेश्वरी बुरुजाकडे गेलो पुढे मग अळू दरवाजाचं दर्शन घेऊन डुब्या शेजारून परत माचीवरती पोहोचलो. आता पालिदरवाजा पाहायचा बाकी होता. हा शिवकालीन राजमार्ग त्यामुळे अर्थातच तो भव्य असणार. सदरेवरून पालिदरवाजाकडे वाट जाते. अतिशय भव्य असा पालिदरवाजा, त्या जवळील दिंड्यांची व्यवस्था, पायरी मार्ग सगळं काही अवाक करणार आहे. पद्मावतीमाचीवर परतल्यानंतर परतीच्या वाटेला लागलो. राजगड सोडण्याची कुणाचीही ईच्छा नव्हती पण नाईलाजाने परतावं लागणारच होतं. 'राजगडा परत भेटू रे!' असं मनात ठरवूनच गुंजवणे दरवाजाने उतरायला सुरुवात केली. हा मार्ग झाडीतून जाणारा आहे त्यात पावसाळा असल्याने कारवी जास्तच होती. पण जंगल ट्रेकचा मस्त अनुभव घेता आला. वाटेत लहान ओढे लागतात त्याच्या थंडगार पाण्यात सर्वांनी मनसोक्त अंघोळीचा आनंद घेतला. गुंजवणे गावात पोहोचून नाश्ता केला आणि आपापल्या गाड्यांना किक मारली!
पुणे ते पुणे प्रवास (दुचाकीवरून), जेवण, नाष्टा, चहा यासाठी प्रत्येकी केवळ #३०० रुपये खर्च आला.
मित्रांनो तुमचेही असेच कमी खर्चात केलेल्या ट्रेकचे अनुभव असतील तर नक्की सांगा आपल्या पेज वर नक्की शेअर करू. हा समूह आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे यावर कसलीही बंधने नसतील. निसर्गाला हानी न पोहोचवता, कमी खर्चात परिपूर्णपणे गडकिल्ले पाहणे हाच समूहाचा निखळ उद्देश असेल. यापुढे आयोजित करण्यात येणाऱ्या ट्रेकची कल्पना सर्वांना पेजवरती देण्यात येईलच त्यामुळे आपल्या मित्रांनाही पेजशी जोडायला विसरू नका. तुमचेही भटकंतीचे काही प्लॅन्स असतील तर आम्हाला सुध्दा कळवा. पेज आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे काही suggestions असतील तर नक्की कमेंट करा.👍
🙏🏼
गरीब ट्रेकर्स