27/07/2022
ती फुलराणी
"हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालींचे"
"त्या सुंदर मखमालींवरती, फुलराणी ती खेळत होती"
बालकवींच्या कवितेतल्या ह्या ओळी,आपल्यासारख्या काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी तरी किमान फक्त स्वप्नंच.ही फुलराणी प्रत्यक्षात असेल अशी साधी शंकासुद्धा कधी आली नाही.पण एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याच्या हात धुवून मागे लागणं ही माझी वाईट खोड.असंच काहीसं झालं होतं माझं "Valley Of Flowers" च्या बाबतीत.हिमालय आधीच माझा जिव्हाळ्याचा विषय.त्यात ईशान्य भारताची तोंडओळख झाल्यापासून तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा हिमालयाचे वेगवेगळे रंग उलगडून पाहण्याचा आताशा छंदच जडलाय जीवाला.उत्तराखंड नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांनी समृद्ध असल्यामुळे उत्तराखंडमध्ये फिरणं हा कायमच एक मौलिक अनुभव असतो.खटकते ती फक्त तिथल्या स्थानिक लोकांची आणि आलेल्या पर्यटकांचीही स्वच्छतेबाबतची कमालीची अनास्था.
मुळातच जातिवंत भटकी, त्यामुळे कोणत्याही मासिकात,वृत्तपत्रात,दैनिकांत,आलेलं कोणतंही प्रवासवर्णन मी सहसा वाचायचं सोडत नाही.साहजिकच साधारण सात आठ वर्षांपूर्वी एका बाईंनी ह्या "Valley Of Flowers" बद्दल बरीच विस्तृत माहिती देणारा जो लेख लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केला होता तो वाचूनच ह्या ठिकाणाबद्दल प्रचंड कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं होतं.पण काही ना काही कारणानं ते पाहायचा योग काही येत नव्हता.म्हणतात नं,"नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं !", तसंच काहीसं.गेले तीन चार वर्षांपासून जेव्हा जेव्हा आम्ही ह्या सहलीचा बेत शिजू घातला तेव्हा तेव्हा काही ना काही कारणाने तो बारगळला. पण यंदा चंगच बांधला ...आता शेंडी तुटो वा पारंबी "Valley Of Flowers"पाहायचंच.
तसं लेखावरून "Valley Of Flowers" म्हणजे काही pleasure ट्रिप वगैरे असणार नाही तर काहीसा कठीण ट्रेक असणार आहे याचा पुरेसा अंदाज आलाच होता.शिवाय लेख लिहिणाऱ्या बाई स्वतःसुद्धा आमच्यासारखंच मध्यमवयीन असताना आपल्या काही निवडक मैत्रिणींबरोबर ह्या भागाची सैर करून आल्या होत्या त्यामुळे त्यांना वयोमानापरत्वे तो ट्रेक करताना आलेल्या ज्या काही अडचणी त्यांनी सविस्तरपणे त्या लेखात मांडल्या होत्या,त्या सगळ्याचा आणि आमच्या वयाचा परामर्श घेता,आम्हालाही फक्त पुरेशा शारीरीकच नाही तर मानसिक तयारीनिशी हा ट्रेक करावा लागेल ह्याची कल्पना होती.त्यामुळे मानसरोवरच्या ट्रीपची ही काहीशी रंगीत तालीम समजायची,असं गृहीत धरूनच आम्ही ट्रेकच्या तयारीला लागलो.ट्रेकची difficulty level लक्षात घेता स्वतंत्रपणे जावं की एखाद्या ट्रेकर्स ग्रुप बरोबर जावं, इथपासून आमच्यामध्ये काथ्याकूट झाला.शेवटी एकदाचं स्वतंत्रपणेच ट्रेक करायचं ठरल्यावर मग त्या दृष्टीने ट्रेकचं नियोजन सुरु केलं .
सगळ्या जाम्यानिम्यानिशी ठरल्या दिवशी ऋषिकेशला पोहोचलॊ आणि आत्ताच संध्याकाळी थोडं हुडकून दुसऱ्या दिवशीची ऋषिकेश ते जोशीमठ जाण्याची टॅक्सिची व्यवस्था करून ठेवावी म्हणून बाहेर पडलो तर पहिली शुभवार्ता कानावर पडली.त्यादिवशीच्या झालेल्या जोरदार पावसामुळे, सकाळीच भूस्खलन होऊन ऋषिकेश ते जोशीमठचा हायवे आपल्या सैन्याने सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता.माझ्यासाठी तरी कोणताही चांगला उपक्रम सुरू करताना अशी नकारघंटा वाजणं शकुनच असतो.त्यामुळे आता ट्रिप नक्की सुखासुखी पार पडणार ह्याची नकळत मिळालेली ती ग्वाहीच होती खरंतर.तरी अख्खी संध्याकाळ जंगजंग पछाडून सुद्धा ऋषिकेशपासून जोशीमठपर्यंत आम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायला जेव्हा एकही टॅक्सिवाला तयार होईना किंवा जे एक दोन तयार झाले ते "अडला नारायण गाढवाचे पाय धरी "अशी आमच्यावरची ओढवलेली परिस्थिती पाहून तोंडाला येईल ती किंमत सांगत होते तेव्हा बहुदा तरी सगळ्या सहलीचा कार्यक्रम एक दिवसाने पुढे ढकलावाच लागेल अशीच चिन्हं दिसत होती.पण जर सहल एक दिवसाने पुढे ढकलायची तर आमच्या परतीच्या प्रवासाच्या विमानतिकिटांचं काय करायचं ? हाही प्रश्न होताच.विमानतिकिटांच्या खर्चाला तिलांजली द्यावी लागणार की काय ह्या काळजीने आमचे चेहरे काळेठिक्कर पडले.किमान दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत तरी हातावर हात धरून बसण्याखेरीज तेव्हा तरी आमच्या हातात दुसरं काहीही नव्हतं.पण म्हणतात नं ,"उम्मीद पें दुनिया कायम हैं |" ,तसं सकाळी आरामशीर उठू मग पाहू काय करायचं ते ,असं म्हणत आम्ही दैवावर हवाला टाकून चक्क ढाराढूर झोपी गेलो.
सकाळी उठून इकडे तिकडे चौकशी केल्यावर सुद्धा, "आजचा दिवस ऋषिकेश मध्येच थांबा,वर जाऊन अडकलात तर काय ? त्यापेक्षा तुम्ही इथे निदान सुरक्षित आहात," असाच सूर फोन करून विचारल्यावर एक दोन ट्रॅव्हल एजन्ट्सनी आळवला . आता एक शेवटचा प्रयत्न करून पाहू नाहीतर थांबू एक दिवस म्हणून आम्ही सरळ गढवाल मंडळ विकास निगमच्या ऑफिसमध्येच फोन लावला. सरकारी संस्था असल्यामुळे ह्यांच्याकडे आपल्याला सद्य परिस्थीतीचा ताजा अहवाल मिळेल हा आमचा अदमास खरा ठरला.आम्हाला अगदी अनपेक्षितपणे अपेक्षित असं उत्तर त्यांच्याकडून मिळालं आणि आमचा जीव भांड्यात पडला.सैन्याने हायवे सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला केलाय, हे कळल्यावर लागलीच जवळच्याच एका ट्रॅव्हल एजन्टकडे सहज चौकशीसाठी म्हणून घुसलो तर त्याने तडक आम्हाला अपेक्षित अशा दरात ऋषिकेश ते जोशीमठ जायला टॅक्सिची व्यवस्था करून दिली."भगवान के घर देर हैं अंधेरी नहीं।" म्हणतात ते काही उगाच नाही.
पण खरी परीक्षा ही नव्हतीच.आम्ही इथून पुढचा प्रवास शारीरिक दृष्टया कसा झेपवणार ही होती.टॅक्सी, shared टॅक्सी असं मजल दरमजल करत आम्ही दुसऱ्या दिवशी गोविंदघाट गाठलं.त्यादिवशी सूर्यदेवांनी आणि वरुणराजाने दोघांनीही आमच्यावर जशी कृपाच करायची ठरवली होती.पाऊस थांबून सकाळची कोवळी ऊन्हं वर आली होती. सकाळी गोविंदघाटला पोहोचलो तर बाजूच्याच गुरुद्वारामधून येणारा "कडा प्रसादा"चा साजूक वास बेजार करत होता,पण दिवस मावळायच्या आत घांगरिया गाठायचं आहे ह्याचं भान ठेवून आम्ही "कडा प्रसाद" चाखायचा मोह आवरता घेतला आणि गपगुमाने वेळ न दवडता पुढच्या प्रवासाला लागलो.गोविंदघाटचा टॅक्सी स्टॅन्ड ते पुलन्याला जाणारा टॅक्सी स्टॅन्ड हे जेमतेम ८०० -९०० मीटरचं चढउतार असलेलं अंतर सगळ्या सामानसुमानानिशी पायी पार करताना,आम्ही जर तितकंच सामान आमच्या पाठीवर लादून त्याच्यापुढचं दहा किमीचं अंतर पायी चालायचं ठरवलं तर आमची काय अवस्था होईल ह्याची पुसटशी झलक आम्हाला मिळाली.त्यामुळे पुलन्याला पोहोचल्यावर फार आगाऊपणा न करता एका "पिठठु"वाल्याला पकडून आधी आम्ही आमच्याकडचं सगळं अवजड सामान त्याला सुपूर्त केलं.मोजक्या सामानाचं धोपटं पाठीशी मारून आपण जेव्हा वर चढायला सुरुवात करतो तेव्हा खरी मजा सुरु होते.हळूहळू चढत जाणाऱ्या उन्हामुळे आणि काहीशा कमी होत जाणाऱ्या प्राणवायुच्या प्रमाणामुळे, चढताना आपली अपेक्षेपेक्षा लवकर दमछाक व्हायला सुरुवात होते,अवसान गळायला लागतं.भरीस भर म्हणून कीं काय ,वाटेत बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट भावाने विकल्या जाणाऱ्या वस्तूही आपले डोळे पांढरे करत असतात.पण येणारीजाणारी ज्येष्ठ शीख मंडळी मात्र ,"शाब्बाश पुत्तरजी ! बस्स आ गया ,अब थोडासा और |",म्हणत आपलं मनोबळ वाढवण्याचा जो आपापल्या परीने प्रयत्न करत असतात,तेच आपला हुरूप वाढवण्याचं काम करतात.आम्ही चढत असताना लखनऊमधून शिखांचा एक ग्रुप हेमकुंड साहिबच्या दर्शनासाठी आमच्या बरोबरीनेच चढत होता,त्यातल्या एका श्याहण्णव वर्षांच्या आजींना काहीही न खातापिता मध्येमध्ये फक्त ग्लुकॉन डी चाखत चढत असलेल्या पाहून तर आम्ही फक्त मूर्च्छा यायचेच बाकी होतो.त्यादिवशी त्या आजी सगळ्या यात्रेकरूंच्या आणि पर्यटकांच्या चर्चेचा एकदम "हॉट टॉपिक"झाल्या होत्या.वाहेगुरुच्या दर्शनाला काहीही न खातापिता हेमकुंड साहिबपर्यंत पायी चढण्याचं त्यांचं यंदाचं हे सलग पाचवं वर्ष होतं.श्रद्धेमध्ये असामान्य ताकद असते हेच खरं.त्या आजींकडूनच थोडसं उसनं अवसान घेऊन आम्ही जवळपास पाच तासांत घांगरियापर्यंतचं दहा किमीचं अंतर अखेरीस कापून पूर्ण केलं.
बटाट्याची फुलं
हिमालयन डेझी
१९३१ मध्ये ब्रिटिश गिर्यारोहक फ्रॅंक स्मिथ ह्यांनी पहिल्यांदा आमच्यासारख्याच बालकवींच्या कवितेच्या वरच्या ओळी भ्युंडारच्या खोऱ्यात खऱ्या अर्थी अनुभवल्या.आपल्या दोन समविचारी गिर्यारोहक सहकाऱ्यांबरोबर माऊंट कामेतच्या गिर्यारोहणाच्या मोहिमेवर आलेले गिर्यारोहक आणि जीवशास्त्रज्ञ फ्रॅंक स्मिथ, कामेत पर्वत सर करून उतरताना खराब हवामानामुळे वाट चुकले आणि अगदी अपघातानेच भ्युंडारच्या खोऱ्यात उतरले.समुद्रसपाटीपासून ११ हजार ते १४ हजार फूट उंचीदरम्यान,असंख्य रंगांच्या फुलांच्या गालिच्यांनी नटलेल्या ह्या खोऱ्याच्या अलौकिक सौन्दर्याने ते इतके कमालीचे भारावून गेले की, "ह्या पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो हाच आहे,"Valley Of Flowers",असं फ्रॅंक स्मिथना वाटलं आणि तेव्हापासून हे भ्युंडारचं खोरं,"Valley Of Flowers"ह्याच नावाने पर्यटकांमध्ये प्रसिद्ध झालं.भ्युंडारच्या खोऱ्यामधल्या विविध फुलांवर आणि इथल्या वनस्पतींवर त्यांनी केलेल्या संशोधन कार्यावर त्यांनी ह्याच नावाने एक पुस्तकही लिहून प्रसिद्ध केलं.पुढे १९३९ मध्ये इंग्लंडच्या जॉन मार्गारेट लेग वेगवेगळ्या फुलांवर संशोधन करण्यासाठी खास इंग्लंडमधून ह्या खोऱ्यात आल्या पण काही फुलांचे नमुने संशोधनासाठी गोळा करताना पाय घसरून त्या दरीत पडल्यानं त्यांचा मृत्यू ओढवला.त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या बहिणीने बांधलेली समाधीसुद्धा आपल्याला ह्या खोऱ्यात पाहायला मिळते. किंबहुना इतर खोऱ्यापेक्षा फुलांच्या प्रजातींचं जास्त वैविध्य आपल्याला मार्गारेट ह्यांच्या ह्या समाधीच्या आसपासच पाहायला मिळतं,अर्थातच तिथपर्यंत अजून दोन अडीच किमी चालण्यासाठी तुमच्यात जीव शिल्लक असेल तर ! ह्या "Valley Of Flowers" मध्ये जूनपासून सप्टेंबर पर्यंतच्या चार महिन्यांत साधारण ५२१ प्रजातींची फुलं बहरतात. त्यातली "ब्लू पॉपी" म्हणजे खसखशीची फुलं आणि त्याच्या विविध प्रजाती ही ह्या खोऱ्याची खासियत.खोऱ्याचं सौंदर्य वाढवण्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या मानवी आजारांवर ह्या खोऱ्यातल्या जवळपास प्रत्येक फुलाचे आणि वनस्पतीचे अर्क विलक्षण प्रभावी सिद्ध झालेले आहेत. माणूस मातीतून जन्माला आणि सरतेशेवटी मिसळणारही मातीतच त्यामुळे त्याच्या सगळ्या आजारविकारांवरचे उपचारही कसे आणि किती प्रमाणात निसर्गाच्याच कुशीत दडलेले आहेत हे ह्या "Valley Of Flowers"वर दाखवला जाणारा माहितीपट पाहताना अगदी प्रकर्षाने जाणवतं.ह्या बहरणाऱ्या फुलांचं सरासरी आयुष्य जेमतेम चार ते पाच दिवसांचं असल्यामुळे दर चार पाच दिवसांनी हे खोरं रंग पालटतं.२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या भयंकर पुरामध्ये पूर्ण भ्युंडार गाव तर दुर्दैवाने वाहून गेलं,आज त्या गावाचा साधा मागमूसही नाही,पण "Valley Of Flowers"चं हे खोरं मात्र आजही त्या गावाच्या नावानेच ओळखलं जातं.निसर्गापुढे माणूस हतबल आहे हेच खरं.
ब्लू पॉपी
"Valley Of Flowers"कडे जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यापासून ६ किमी वर ,समुद्रसपाटीपासून १५,२०० फुटांवर आहे हेमकुंड साहिब.शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंद सिंगजींनी आपल्या दहा वर्षांच्या तपश्चर्येने पावन केलेलं शिखांचं हे श्रद्धास्थान.समुद्रसपाटीपासूनच्या त्याच्या उंचीमुळे हेमकुंड साहिबला पोहोचेपर्यंत हवा अजूनच विरळ होत जाते ,त्यामुळे सगळे आबालवृद्ध धापा टाकत टाकत निव्वळ इच्छाशक्तीवर चढून जाताना दिसतात.पण हेमकुंड साहिबच्या वाटेवर लागणारे स्वच्छ पांढरेशुभ्र खळाळते झरे,अधूनमधून डोकावणारी ब्रह्मकमळं आणि रस्त्याच्या कडेने वाऱ्यावर डोलणारे रंगीबेरंगी फुलांचे छोटे छोटे ताटवे नेत्रसुख देऊन आपली वर चढण्याची इच्छाशक्ती कायम राखतात. कदाचित म्हणूनच,हेमकूट पर्वताच्या कुशीत आणि हेमकुंड तलावाच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर उभं असलेलं हे गुरूद्वारा फक्त शीखांनाच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांना आकृष्ट करतंय.
हेमकुंड तलाव
हेमकुंड साहिब गुरूद्वारा
हेमकुंड तलावाच्या पलीकडच्या बाजूला श्रावणात चार ते पाच प्रकारची असंख्य ब्रह्मकमळं उमलतात.पण तिथे जाण्याची परवानगी मात्र फक्त स्थानिक लोकांनाच आहे.गोकुळाष्टमीनंतर अकराव्या दिवशी घांगरियात आणि आधीच्या भ्युंडार मध्ये नंदादेवीला म्हणजे पार्वतीला माहेरी आणण्याचा जो उत्सव साजरा केला जातो त्यात अशा हजार ब्रह्मकमळांनी तिचा शृंगार केला जातो.ह्या हेमकुंडाच्या बगलेतच लक्ष्मणाचं देऊळ सुद्धा आहे "श्री लोकपाल लक्ष्मण मंदिर".असं मानलं जातं की,लक्ष्मणाने रावणाचा पुत्र, मेघनादाचा वध केल्यानंतर आपल्या गेलेल्या शक्ती परत मिळवण्यासाठी शेषनागाच्या रूपात ह्या तलावाकाठी कठोर तपश्चर्या केली होती.म्हणून ह्या तलावाचं स्थानिक नाव "लोकपाल" असं आहे.बाकी हेमकुंड साहिबचा गड चढून फाफे झाल्यानंतर तिथे वर गुरुद्वारात लंगरमध्ये मिळणारी खिचडी आणि फिकी चाय (शुगर फ्री चहा) कशीही असली तरी त्यावेळी वरच्या गारठ्यामध्ये अतिशय अमृततुल्य वाटते.
हेमकुंड साहिबच्या वाटेवर आढळणारं ब्रह्मकमळ
तसं वानप्रस्थाश्रमाचं वय व्हायचंय आमचं अजून,पण आता इतक्या जवळ आलोय तर 'लगे हाथ' बद्रीनाथ,माना पण उरकूनच घेऊ म्हणून आम्ही परतीच्या वाटेवर थोडं पुण्य गोळा करायचं ठरवलं. स्वच्छता आणि शिस्त ह्याचं आपल्या भारतीयांना जरुरीपेक्षा जास्त वावगं असल्यामुळे कोणत्याही देवस्थानाला जायचं म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो.स्वच्छता आणि शिस्तीच्या मामल्यात आतापर्यंत तरी फक्त शेगावच्या संस्थानाचा अपवाद माझ्या पाहण्यात आहे.दुर्दैवाने बाकी भारतात तरी इतरत्र कोणत्याही देवस्थानाच्या बाबतीत ह्या दोन बाबी कमालीच्या दुर्लक्षित वाटतात.पण जिथपर्यंत ह्या यंत्रणा बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येत नाही तिथपर्यंत ते सहन करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्यायही नसतो.असो.तर चार धामांमधलं समुद्रसपाटीपासून १०,१७० फूट उंचीवर अलकनंदा नदीच्या काठावर असलेलं एक धाम म्हणजे "बद्रीनाथ" . भगवान विष्णूच्या ह्या देवळाची स्थापना सातव्या ते नवव्या शतकादरम्यान राजा कनकपालच्या मदतीने आदी शंकराचार्यांनी केली.अशी आख्यायिका आहे की आठव्या शतकांपर्यंत ह्या देवळाच्या जागी बौद्ध मठ होता ज्याचं रूपांतर आदी शंकराचार्यांनी भगवान विष्णूंच्या देवळात केलं त्यामुळे ह्या देवळाची बाह्यरचना एखाद्या बौद्ध विहारासारखी दिसते.मंदिराच्या गाभाऱ्यात झाडाखाली,काळ्याकभिन्न शाळीग्राम दगडात कोरलेली एक मीटर उंचीची भगवान विष्णूंची ही मूर्ती सोन्याच्या छत्रीखाली बसवलेली आहे.आठव्या शतकात बौद्धांचा पराभव झाल्यानंतर बौद्धांनी ही मूर्ती बाजूच्या अलकनंदा नदीत फेकून दिली,तेव्हा शंकराचार्यांनी ती मूर्ती नदीतून काढून देवळाच्या बाजूला असलेल्या तप्तकुंडात स्थापित केली आणि अखेरीस रामानुजाचार्यांनी ती तप्तकुंडाच्या बाहेर आजच्या देवळाच्या ठिकाणी ती पुनर्प्रस्थापित केली. त्यामुळे देवळाच्या आवारात,नर नारायण,लक्ष्मी नरसिंह,कुबेर,नारद,घंटाकर्ण आदींबरोबर रामानुजाचार्य यांचंही देऊळ आहे.भगवान विष्णूंच्या आठ स्वयंभू मूर्तीं पैकी एक अशी ह्या बद्रीनारायणाच्या मूर्तीची ख्याती असल्यामुळे ह्याला बद्री विशाल असंही म्हटलं जातं. देवळाच्या बाजूला असलेल्या तप्तकुंडात गंधकाचे झरे आहेत त्यामुळे बाहेरचं वातावरण कितीही गार असलं तरी ह्या कुंडाचं तापमान मात्र वर्षभर साधारण ५५डिग्रीच्या आसपास असतं.आम्ही पोहोचलो त्यादिवशी धुकं आणि पावसाचं साम्राज्य पसरलं होतं,पण बद्रीनाथाच्या दर्शनाच्या दिवशी मात्र नेमकी पावसाने विश्रांती घ्यायची ठरवलेली असल्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न आणि आल्हाददायक होतं.त्रासदायक होतं ते फक्त लोकांचं रांगेची शिस्त न पाळणं.पण तरीही छान निवांत दर्शन घेऊन आम्ही भारत तिबेट सीमेवरच्या शेवटच्या गावाकडे म्हणजे 'माना'च्या दिशेने आमचा मोर्चा वळवला.
बद्रीनाथ मंदिर
बद्रीनाथ पासून जेमतेम ३ किमी वर इंडोतिबेटीयन लोकांची वस्ती असलेलं हे छोटंसं गाव.ह्या गावात एखादा अलिखित नियम असावा तसं प्रत्येक घराच्या बाहेर छोट्या छोट्या वाफ्यांमध्ये आपल्याला बटाटा,मोहरी,फ्लॉवर आणि मुळ्याची शेती पाहायला मिळते.मानापासून अजून ६० किमी पुढे चीनची सीमा सुरु होते पण तिथपर्यंत साहजिकच आपल्यासारख्यांना नाही तर फक्त आपल्या सैन्याच्या जवानांनाच जाण्याची परवानगी आहे.ह्या मानामध्ये आपल्याला सरस्वती नदीचा उगम ,भीमपूल,व्यासगुहा,गणेशगुहा अशी काही पाहता येण्यासारखी ठिकाणं आहेत.त्यातल्या भीमपुलाबद्दल फार मजेशीर आख्यायिका आहे. पांडव स्वर्गाच्या वाटेने जात असताना द्रौपदीला ह्या सरस्वतीचं विशाल पात्र ओलांडता येईना म्हणून भीमाने द्रौपदीसाठी बाजूचा भला मोठा खडक आडवा पडून द्रौपदीला नदी ओलांडण्यासाठी हा पूल तयार केला ज्यामुळे ह्याचं नाव पडलं "भीमपूल ".शिवाय असाही एक समज आहे की महर्षी व्यास गणपतीकडून महाभारत लिहून घेत असताना सरस्वतीच्या पाण्याच्या जोराच्या खळखळाटाचा त्यांना व्यत्यय होऊ लागला,म्हणून व्यासांनी क्रोधीत होऊन सरस्वतीला लुप्त होण्याचा शाप दिला पण वास्तविक सरस्वती इथे मानामध्ये अलकनंदेला मिळते आणि म्हणून ती लुप्त होते हे त्यामागचं सत्य.हे सगळं ऐकलं की वाटतं,हिंदू पुराण हा नक्कीच एक संशोधनाचा विषय होऊ शकतं.
भीमपूल
परतीला ऋषिकेशमध्ये पोहोचेपर्यंत कावड यात्रेच्या उच्छादाने अक्षरशः कहर केला होता ,त्यामुळे आलेल्या पर्यटकांसाठी कोणतीही पर्यायी अशी सुसज्ज वाहतूक यंत्रणा न तयार करता ,महत्त्वाचे सगळे रस्ते तर पोलिसांनी बंद केलेलेच होते,पण त्याहीपेक्षा जास्त चीड आणणारं जर का काही होतं तर ते कावड यात्रेच्या निमित्त्याने आलेल्या असंख्य रिकामटेकड्यांची हुल्लडबाजी.वास्तविक आपल्याकडचे कोणतेही सणवार असतील नाहीतर तीर्थयात्रा,सगळ्यांना सखोल शास्त्रीय नाहीतर आध्यात्मिक बैठक आहे पण जेव्हा त्याच सात्त्विक गोष्टी उथळ भावाने आणि तोकड्या ज्ञानाने केल्या जातात तेव्हा कशा बिभत्स आणि ओंगळ रूप घेऊ शकतात ह्याचं "कावड यात्रा" हे मूर्तिमंत उदाहरण.लाखोंच्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंनी माजवलेलं पर्यावरण आणि ध्वनिप्रदूषण पाहिलं की नक्की कळतच नाही की आपण माणसं नेमका ऱ्हास कोणाचा करतोय,निसर्गाचा कि स्वतःचा ?
पण काही असेल "जहाँ चाह वहाँ राह |" हे मात्र खरं.प्रत्येक वेळी छोट्या असतील नाहीतर मोठ्या जेव्हा जेव्हा काही अडचणी दृष्टीपथात आल्या तेव्हा तेव्हा त्या अडचणी तरून जायला तो आमच्या पाठीची ऊभा राहून आमचा मार्ग प्रशस्त करत गेला आणि अडचणी नाहीशा झाल्या.अगदी जसं योजलं होतं तसं सगळं काही पूर्ण करून आम्ही सुखरूप परतलो.पण रंगीत तालीम तर झाली,आता वाट पाहतोय कधी आपले गडकरी साहेब उत्तराखंडातून थेट मानसरोवर गाठण्याचा रस्ता आमच्यासारख्या प्रवासवेड्यांसाठी पूर्ण करतायत.पडदा उघडण्याचाच अवकाश आहे,मग नाटक वठवायला तयार तर आम्ही आहोतच.
आता डोळे गाडून बसलोय "डेस्टिनेशन २०२३, मानसरोवर"कडे !!
माधुरी गोडबोले माईणकर
www.valuevacations.co.in
२४ जुलै २०२२
https://valueurvacations.blogspot.com/2022/07/blog-post.html