15/10/2019
माफियाराज सुसाट, अधिकारी मालामाल, पर्यावरण कोमात
जोयडा तालुक्यातील स्थिती: कोटी कोटींच्या भानगडी
जोयडा: बम्मू फोंडे
निसर्ग संपत्तीने ओतप्रोत भरून राहिलेल्या जोयडा तालुक्यात वर्षानुवर्षापासून निसर्ग संपत्तीची लयलूट सुरू आहे. वाळू, खडी, दगड, लाकूड, वन्यप्राण्यांचे अवयव, मातीची राजरोज तस्करी केली जाते. त्यासाठी नदी नाले, डोंगर,जमीन तसेच जंगले लुटली जातात. प्रत्येक क्षेत्रात माफिया राज सुसाट बोकाळले आहे. माफियांना प्रशासकीय अधिकारी, समाजसेवकांची झुल पांघरूण पांघरूण वावरणारे नेते, लोकप्रतिनिधी, दलालांचा वरदस्त लाभला आहे.
दरवर्षी कोट्यवधिंच्या निसर्गसांपत्ती लूट होत असली तरी त्याविरोधात होणारी कारवाई ही तकलादू आहे. त्यातुन तालुक्यात कोटीकोटींच्या या भानगडी चालत असून माफियाराज सुसाट, अधिकारी मालामाल होत असताना पर्यावरण कोमात जाते आहे. मात्र या भानगडी चालतात कशा असा प्रश्न सामान्यांना पडलेला असून त्यावर टाकलेला हा फोकस....
जोयडा तालुक्यावर निसर्गाने ओंजळ भरून आविष्कार केला आहे. नदी नाले, जंगल, डोंगर दऱ्या खोऱ्यात खनिजांच्या खाणींची मुबलकता आहे. या निसर्ग संपत्तीवर घाला घालून बेकायदा वाळू उपसा, खडी मशीन, झाडांची तस्करी, डोंगरावरील दगडांची आणि वनस्पतींची लूट करणाऱ्या टोळ्याचं जणू कार्यरत आहेत. त्यामध्ये कोट्यावधींचा घपला होत आहे. निसर्ग संपत्ती ही सरकारी मालमत्ता आहे. त्याची लूट तर होतच आहेच शिवाय कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. नियम धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या या बेकायदा धंद्यांमुळे तालुक्यातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण बिघडले आहे.
वाळूमध्ये कोटींच्या भानगडी...
तालुक्यात २०१२ पासून वाळू उपसा करण्यास निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नदीनाल्यासह शेत जमिनीत होणारा वाळू उपसा थांबविण्यासाठी फक्त कागदीघोडे चालविले जात आहेत. या व्यवसायातून हप्तेखोरीतून दर महिना सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा होतो. या व्यवसायावर सरकारचे नियंत्रण अजिबात नाही. व्यावसायिकांनी पैशाच्या जोरावर प्रशासनावरील आपली पकड घट्ट केली आहे. आता हे व्यावसायिक प्रशासनाला हे डोईजड झाल्याचे पहावयास मिळत आहे.
खडीमशिन : लुटीचा वेगळा मार्ग
तालुक्यात खडी मशीनचा (स्टोनक्रशर) व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यातुन सरकारला काहीसा महसूल मिळत असला तरी त्यात काळाबाजार किती कोटींचा असावा याची प्रचीती येत नाही. या व्यवसायातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार वाळू व्यवसाया सारखीच लूट होते. नियम आणि अटी धाब्यावर बसवून हा व्यवसाय अनेक ठिकाणी बिनदिक्कत चालला आहे. खनिज आणि भूगर्भ खात्याने अनेकवेळा बेकायदा खडी मशीनवर कारवाई केली पण त्याचा परिणाम त्यांच्यावर काहीच झाला नाही. या व्यवसायातही हप्तेखोरी रुजली आहे.
वनसंपतीवर काळी नजर...
वनसंपत्तीने समृद्ध असलेला जोयडा तालुका आज अनेक संकटात सापडला आहे. झाडांची कत्तल ही नेहमीची बाब बनली आहे. तालुक्यात औषधी वनस्पती, चंदन व इतर वनस्पतींची तस्करी केली जाते. त्यावर नियंत्रण आणल्यास वनखात्याला वारंवार अपयश आले आहे. दुर्मिळ पशु पक्षांच्या शिकारी करून त्यांचे अवयव जागतिक बाजारात विकले जाण्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. या व्यवसायातून अनेकजण मालामाल झाले आहेत. स्थानिक नागरिकांना हाताशी धरून जंगलातील औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या टिकाऊ वनस्पती लुटणे, त्यांची तस्करी करणे, असे प्रकार करणाऱ्या टोळ्या संक्रिय झाल्या आहेत.
दगड, डस्ट चोरीची उलाढाल लाखोंची
तालुक्यातील डोंगर, जंगलातील दगडांची तसेच डस्टची चोरी राजरोजपणे होत आहेत. मात्र त्यासाठी खनिज व भूगर्भ खात्याकडून तशी परवानगी घेतली गेल्याचे नमूद नाही. सरकारी आणि खाजगी डोंगरावर मोठ्या प्रमाणात दगड फोडले जात असल्याने डोंगर उध्वस्त होत आहेत.