27/12/2014
गेले काही दिवस अनेकांनी मोराबद्दल लिहायला सांगुन मला जणु राष्ट्रीय मानचिन्हाबद्दलच लिहायला सांगितलय अस वाटून गेलं. आपण अगदी प्राथमिक वर्गांमधेच शिकलेलं असतं की मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आपण भारतिय म्हणुन आपली नाळ ह्या राष्ट्रीय पक्षाबरोबर जुळण्याच्या आधीपासून आपली इवलीइवली बोटं, स्वत:च्या तळ हातावर ताल धरून "इथे इथे बस रे मोरा" म्हणायला शिकलेली असतात. आपल्या तळहातावर कधीच न बसणारा मोर आपल्या शाळेत आपला आवडता पक्षी म्हणुन छापिल निबंध बनून जातो. मग पुढे कॊलेजमधे गेल्यावर लता मंगेशकरांपेक्षा तो अवधूत गुप्तेच्या मुखाने आपल्या मनात पिसारा कधी फ़ुलवतो ते कळतच नाही.
भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणुन मोर डौल, सौंदर्य नी अभिमानाचं प्रतिक आहे.फ़ेझंट कुटुंबातला [ pheasant family] सदस्य असलेला हा पक्षी सौन्दर्याचं प्रतिक समजला जातो.आज जगभर मोराच्या ३ जाती मिळतात. अफ़्रिकन कोन्गो , भारतिय मोर नी तिसरा ओस्ट्रेलियातला हिरवा मोर. साधारण हे सर्व नर मोर, ज्यांना पिसारा असतो ते सारखेच दिसतात. नराच वजन साधारण ५ किलो असतं तर मादी मोराच म्हणजेच लांडोरीचं वजन साधारण साडेतीन ते चार किलो असतं.मोराची लांबी साधारण ५० इंच लांब असते. आपण मोराचा पिसारा म्हणतो, ती तर चक्क शेपटीवर उगवलेली लांब लांब पिसं असतात. मोर त्याच्या पिसार्यामुळे पट्कन ओळखता येतो. पण लांडोरीला मात्र पिसारा नसतो. पण जसा मोराच्या डोक्यावर तुरा असतो, तसाच तुरा लांडोरीच्या डोक्यावरही असतो. मोर आणि लांडोर अगदी ठळकपणे वेगवेगळ्या कळतात. निसर्गाने मोराला सौन्दर्य दिलय,झळाळता रंग दिलाय नी डौलही दिलाय. लांडोर मात्र अगदी साधी नी जणू बेरंगीच!
आपला एक सर्वसाधारण गैरसमज असतो की ईग्रजीमधे मोराला पिकॊक म्हणतात. पण मोरला ईग्लिशमधे कॊमन पिफ़ाउल [ Indian peafowl / blue peafowl ]असं म्हणतात नी त्याचं शास्त्रिय नाव आहे ’पावो क्रिस्टाटस’ [Pavo cristatus] . कोंबड्या, लावी, तित्तिर आणि मोर हे सगळे जमिनीवरील फ़्यॆसियानिडी [Phasianidae ] कुटुंबात सामावलेले आहेत. या कुटुंबाच वैषिठ्य म्हणजे हे पक्षी प्रामुख्याने जमिनीवरच वावरतात नी फ़क्त रात्री अथवा संरक्षणासाठीच झाडांवर ऊडून बसतात. आणि ह्यांच उडणंसुद्धा जास्त नसतं.मोराबद्द्दल बोलायचं तर मोर भरपूर झाडं असलेल्या नी डोंगराळ भागात रहातो. पण गेली अनेक दशकं उत्तर भारतात शेतांमधे, खळ्यांमधे हा सहज राहताना दिसतो.
मोराची मान ही अतिशय रंगीत असते. या रंगावरूनच झळाळता रामा रंग निर्मिला आहे. ह्याच्या हिरव्या निळ्या रंगाच्या गळ्यावर उदी तपकीरी रंगाचे ठिपके असतात.लांडोरीला मात्र निसर्गाने इतका झळाळता रंग दिला नाहिये. मोराच्या मानने ती लखलखीत नसते.मोरांचे पाय हे त्यांना अतिशय विसंगत असे असतात. यांचे पाय बळकट असतातच पण त्याच बरोबर ते जमिनीवर पळण्यास योग्य असतात. मोराचे डोळे काळे असतात नी त्याची द्रुष्टी अतिशय तिक्ष्ण असते. डोळ्यांच्या जोडीला मोराचे कान ही तिखट असतात. या दोन्हींच्या जोरावर, धोक्याची जराही चाहूल लागल्यास मोर लगेच पळ काढतात.या पायांचा उपयोग त्याला पळण्याच्या जोडीस साप, सरडे यांसारखी भक्ष पकड्ण्यासची उपयोग होतो. या सरपटणार्या जिवांखेरीज मोर धान्य, बिया, फ़ुलं नी फ़ळंदेखील खातात.
मोराचा पिसारा एक गम्मतच आहे बर का! याच्या पिसार्याचा उपयोग काय? मुख्य उपयोग आहे तो म्हणजे मादीला आकर्षीत करणे हाच. मादीचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी नर पिसरा फ़ुलवून नाच करतो आणि लांबलांब ओरड्तो ज्याला आपण मोराची केकावली असं म्हणतो.त्याच हे ओरडण, नाचणं असतं त्याच्या मादीसाठी नी आपण म्हणतो की पाऊस येणार म्हणुन तो नाचत असतो.मोराच्या लांबच लांब पिसार्याची लांबी, त्याच्या एकूण शरीराच्या ६०% इतकी असते. मोराच्या ह्या लांबलचक पिसार्याखाली साधारण २० राखाडी रंगाची पिसं असतात. यांच काम म्हणजे ह्या पिसार्याला आधार देणं. ही मोरपिसं आतून पोकळ असतात नी आपल्या नखांसारखीच क्यालशियमची वाढ असतात, जितक्या वेळेस ही गळून पडतात, तितक्या वेळेस ती पुन्हा येत रहातात. मोराच्या पिसार्याला "ट्रेन" [ train] म्हणतात. मला बरेच जण विचारतात की मोर झोपतात कसे? मोर अंधार पडल्यावर मोठ्या विस्ताराच्या झाडांवर झोपतात. जानेवारी ते ओक्टोबर हा मोरांच्या प्रजननाचा काळ असतो. मोरांच्या कळपाला ईग्रजीत "पार्टी" किंवा "प्राईड" म्हणतात. एका कळपात एक मोराबरोबर साधारण ५ माद्यांचा जनानखाना असतो.प्रत्येक मोराची स्वत:ची हद्द ठरलेली असते नी त्या हद्दीत यायची मुभा फ़क्त दुसर्या कळपातल्या लांडोरींना असते.लांडोरी योग्य नराची निवड त्याचा रंग, आकार नी डौल बघुन करतात.
आपल्याकडे मराठीत ज्याप्रमाणे नर मादीला वेगवेगळी नावं आहेत त्याप्रमानेच ईग्रजीत मोराला पिकोक [ Peacock ], लांडोरीला पिहेन [Peahen] असेही म्हणतात.लांडोर एकावेळेस साधारण ३ ते ५ अंडी घालते. २८ ते ३० दिवसांनंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. मोराचा अंडी उबवण्यात जराही सहभाग नसतो.दाट झुडुपांच्या आडोशाला खळग्यात लांडोर अंडी घालते. झुडुपांच्या आडोशाला लांडोर अंड्यांवर बसून ती उबवते. अंड्यांवर बसलेली लांडोर शत्रूला दिसू नये म्हणुनच तिचा रंग मळकट मातकट असतो. ही आहे निसर्गाची कमाल! अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं आईच्या पाठीपाठी फ़िरतात नी तिची अगदी नक्कल करतात. साधारणपणे १५ ते २० वर्षे आयुष्य असलेला हा राष्ट्रीय पक्षी आपल्या देशात, उत्तरेत , मध्य भारतात बहुतेक सर्व राज्यांमध्ये आढळतो.
जाता जाता सांगायची गोष्ट म्हणजे, पुर्वी सर्र्र्रास मोरांची खाण्यासाठी हत्त्या व्हायची. पण भारतिय वन्यजिव संरक्षण कायद्याअंतर्गत मोराला पुर्ण संरक्षण असून, तो पाळणे, मारणे हा कायद्याने दंडनिय अपराध आहे.लक्ष्मीच, कार्तिकेयाच वाहन असलेल्या मोराला जास्तित जास्त चितारला गेलेला पक्षी म्हणुन मान मिळाला आहे. न्रुत्यात, कलेत, कथांकादंबर्यांमधे, गाण्यांमधे मानाच स्थान मिळालेला हा पक्षी पहाल तेव्हा ह्या माहितीची आठवण काढा.आशा आहे की सगळ्यांची ’मोर’निंग गूड झाली असेल......
http://daytodaynature.wordpress.com/
All about Nature by Discovery tai , who strongly believes that Conservation through communication works in this techno savvy world. Lets connect to conserve!!