15/08/2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७५ वर्षांमध्ये भारताने जी भरारी घेतली आहे, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. भारतीयांनी गुलामीतून बाहेर पडून स्वातंत्र्याचा श्वास घेत, हजारो वर्षांचा सांस्कृतिक, अध्यात्मिक, वैचारिक ज्ञान व कला यांचा वारसा जपत भविष्याकडे वाटचाल सुरु केली होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी संविधान लिहण्यापासून ते कोरोना काळात संपूर्ण जगाला मदतीचा हात पुढे करण्यापर्यंतची भारताची वाटचाल, ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. या स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी पर्वानिमित्त भारताने प्रत्येक स्तरावर केलेल्या प्रगतीचा आढावा गेल्या वर्षभरापासून अनेक संस्था, लेखक, संशोधक व अभ्यासकांकडून घेतला जातोय आणि तो सुरूच आहे. तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रातील वाखाणण्याजोग्या प्रगतीबरोबरच, पर्यटन क्षेत्रानेही चांगलीच भरभराट गेल्या कधी वर्षांमध्ये केली आहे. त्यानिमित्त पर्यटन विशेष व पर्यटन उद्योगाच्या वाटचालीवर गेल्या वर्षभरात अभ्यास व अनेक वेळा लेखन करण्याची संधी मला मिळाली. भारतातील पर्यटनाच्या वाटचालीचा अभ्यास करताना एका गोष्टीने माझे लक्ष खास आकर्षित केले, ते म्हणजे भारतीय रेल्वे.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम केले आहेत. त्यात पर्यटकांसाठी प्रवास, निवास, अन्न, पर्यटन स्थळावरील विशेष यात्रा व दौरा यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने, इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या संस्थेची १९९९ साली स्थापना केली आहे. IRCTC टुरिझम पोर्टलवर पर्यटकांच्या प्रवास आणि इतर गरजा यासाठी सेवा व सहाय्य करते. यासह अनेक वेगवेगळे टूर पॅकेजेस, विशेष रेल्वे व परिक्रमा मार्ग, भारत दर्शन, हॉटेल बुकिंग इत्यादीं सेवा प्रदान करते. भारतातील रेल्वे आधारित पर्यटन हे मुख्यत्वे राज्य स्तरीय पर्यटन संस्था, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि आदरातिथ्य सेवा-उद्योग यांच्या समन्वयाने पर्यटन विकास साधण्याचे एक विशिष्ट साधन आहे.
IRCTC ने, सार्वजनिक आणि खाजगी संस्था, टूर ऑपरेटर, वाहतूकदार, हॉटेलवाले आणि स्थानिक टूर प्रमोटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक जाहिरात धोरण व साखळी तयार केली आहे. भारतीय रेल्वे दररोज 13 दशलक्ष प्रवाशांना सेवा प्रदान करते. साहजिकच स्थानिक पर्यटनामध्ये भारतीय रेल्वे विशेष योगदान देत आहे. संपूर्ण भारतभर रेल्वेचे जाळे पसरलेले आहेत. रेल्वेचा प्रवास हा सर्वच वयोगटासाठी, रोजचा प्रवास, एकटे किंवा समूहाने - जवळ अथवा दूरच्या प्रवासातही अधिक सोयीस्कर असल्याने प्रवाश्यांची प्रथम पसंती ही भारतीय रेल्वेच असते. त्याच गौरवशाली भारतीय रेल्वेच्या पर्यटनातील योगदान आणि विविध उपक्रम-योजनांचा पुढील काही लेखांमध्ये आढावा घेऊ
महेश टिळे, पुणे.
१५ ऑगस्ट २०२२.