13/10/2022
बहुधा साल एक्कावन्नबावन्न असावं. वीणा आमची वरुसा दोन वरुसांची असेल.
व्यंकटेश माडगूळकर, दत्ताराम मिरासदार, व्यंकटेशची पत्नी, कन्या ज्ञानदा, दमाचे पंढरपुरचे मित्र, माझी पत्नी, वीणा, असा बारा-पंधरांचा जथाच्या जथा रायगडावर पावता झाला. जुनीच धर्मशाळा. त्याच त्या खोल्या. तेंच मागं पत्र्याचं स्वैपाकघर. तोच बाळू शेडगा.
वर दोनतीन दिवस होतों. या सगळ्यांना घेऊन गड हिंडत होतों. वाटेंत सर्पण जमा करीत होतों. भारे आणीत होतों बाळू शेडगा हाताशीं राबत होता. भात-पिठलं शिजवीत होतों. साऊ अवकीरकरणीकडलं दूधदही तोंडीं लावीत होतों. हिंडून आल्यामुळे भुका लागत होत्या. भातपिठल्याचा पन्ना पाडीत होतों. एकमेकांची थट्टा करीत होतों. गप्पा मारीत रात्री जागवीत होतों. असे दिवस मोठे रंगभरले होते. दुसरे दिवशीं पौर्णिमा, आकाशांत पूर्णचंद्र उगवणार होता. दिवसभर गड भटकून आलों. संध्याकाळपासून मनीं एक बेत योजला होता. भातपिठलं करून झालं. संवगड्यांना म्हणालों,
“गडे हो, एक बेत आहे. हो म्हणत असाल, तर सांगतों."
कुणी एक बोलला,
"टकमकावरून उडी टाकणं तेवढं सांगूं नका, म्हणजे झालं."
हंशाचा खकाणा थोडका बसू दिला. मग म्हणालों,
“आज आकाशांत पूर्ण चंद्र उगवेल. तो थोडका वर येऊं द्यायचा. मग सगळ्यांनी धर्मशाळेतून निघायचं. सिंहासनासमोर जायचं. मुजरे घालायचे. मग सगळ्यांनी मिळून शब्द न बोलता एका मेळानं बाजारपेठेतून समाधीकडे जायचं. तिथं दहावीस मिनिटं बसायचं. अन् तसंच शब्द न बोलतां परतायचं. कबूल ?"
"कबूल, कबूल !”
रात्री बाहेर पडलों. गंगासागरापासल्या पायऱ्यांवरून पालखीदरवाज्यानं बालेकिल्ल्यांत शिरलों. राजांच्या वाड्याचा चौथरा ओलांडीत सिंहासनासमोर पावते झालो.
सगळे तिथं मौन उभे राहिलों.
तोंवरी चंद्र वर चढला होता. सगळे भग्नावशेष चांदिण्यांत उजळून निघाले होते. झळाळत होते. एक निगूढ शांतता चहूंकडे पसरली होती. एक गडी मागं राहिला होता. तो नगारखान्याखालून आम्हांस येऊन मिळाला. असं वाटलं, कीं तो चांदिणं चिरीत येतो आहे.
त्या चांदिण्या रात्रीं तें तसं मौन पाळून असणं. त्या चांदिण्याचा, त्या अकलंक शांततेचा, त्या उदासीन गूढतेचा जणूं सगळ्यांवर एक नशा चढला. कुणी खोकूं लागला, तेही नको झालं.
सिंहासनास मुजरे घालून नगारखान्यावाटे बाहेर पडलों. पुढं मी. नगारखान्याच्या छायेंतून सगळी मूक दिंडी चालू लागली. तें तृप्त तृप्त, भरपूर चांदिणं, त्यांतून होळीचा माळ ओलांडीत बाजारपेठेत शिरलों.
चांदिण्या रात्रीं सृष्टीचं रूप बदलून जातं. दिवसां पाहिलं होतं, तें हें नव्हे. हें कांहीं तरी अनोखं आहे. अपरिचित आहे. ते पडके वाडे, त्यांच्या उद्ध्वस्त भिंती, वाड्यांचे कोपरे, चौथरे, ओटे, असा दिवसां जमवलेला सगळा हिशेब आतां या क्षणीं चुकलासा वाटतो आहे. चांदिण्यानं आपला जादूचा कुंचला अवघ्या सृष्टीवर फिरवला आहे. जणू हे सर्व सजीव झालं आहे. आता हे चळूवळू लागेल.
——अन् या बाजारपेठेच्या भिंतींआडून कुणी पांची हत्यारं ल्यालेला, शिरस्त्राण, चिलखत घातलेला अश्वारोही संथपणं घोडा चालवीत आमच्या दिंडीच्या शेजारून बालेकिल्ल्याकडे चालता होईल.
त्याच्या स्वागतासाठी सज्ज असावं, शब्द कांहीं मुखावाटे उच्चारूं नये. नम्रतेनं त्याचा आदर व्यक्त करण्यासाठीं माना लववाव्यात. त्याला दृष्टीआड होऊं द्यावं, अन् मग तसंच मूकपणे चालत राहावं.
यांतलं कांहींच घडलं नाहीं. आम्ही मौनपणं चालत राहिलों.
बाजारपेठ ओलांडली, पलिकडील बामणवाडा, तिथं दों बाजूंना थोडका उतार असं भावत होतं, कीं वरून चांदिणं सांडतं आहे, वाहून जातं आहे. शांतता तर इतकी, की कुणी एक पाय घाशीत, काठी आपटीत चालत होता, तें त्याचं कृत्यही कानांना टुपत होतं. बोरीचं झाड डाव्या हातास टाकून अवघे जगदीश्वरापास पोंचलों. मागील दरवाज्यानं प्राकारांत शिरलों. आकाशांत उंचावलेला मंदिराचा कळस. चहूं बाजूंना प्राकाराच्या भिंती. मधली फरसबंदी--
छे छे ! हें नेहमींचं नव्हे. नुकता तर कुणी इतिहासपुरुष चांदिण्याच्या वर्षावांत पावलं भिजवीत या फरसबंदीवरून पैल निघून मंदिरांत शिरला आहे. आपल्या इथल्या अस्तित्वानं त्याची समाधि भंगेल, कीं काय, असा एक दचका मनीं उभवला आणि मावळला.
मंदिराबाहेरूनच जगदीश्वराला नमस्कार करून समोरच्या दारांतून अवघे पैलच्या समाधीपुढं उभे राहिलों. मस्तकं झुकवलीं. तिथं तो राजा किती वर्षांपासून विश्रांति घेत होता. चिरविश्रांति. त्याला विश्रांति घेण्याचा पूर्ण अधिकार होता. तो जेमतेम पन्नास वरुसं जगला. पण या उण्यापुऱ्या पन्नास वरुसांत एकही वरीस कधीं तो स्वस्थपणं कुण्या सुरक्षित जागीं विसांवला नाहीं. सारखा सतत स्वातंत्र्याची चिंतना करीत इये देशीं घोड्याच्या पाठीवर चहूं दिशा धुंडाळीत होता. समर्थांनीं आईला सांगितलं, चिंता करतों विश्वाची ! यानं त्याच्या आईला सांगितलं, कीं नाहीं, कोण जाणे, पण यानं चिंता केली मायदेशाची !
असं कल्पकल्प मौनपणं चिंतिलं. अर्ध घटका असे त्या भावनेनं चिंब होत समाधीसमोर थांबलो. मग तसेच शब्द न बोलतां माघारे वळलो. पुनः बाजारपेठ ओलांडीत मुक्कामावर आलो. मुखावाटे अक्षरही न उच्चारतां तसेच अंथरुणांवर पहुडलों.
पहाटे येंकटराव मजपाशीं आले. आपल्या दमदार, खर्जातल्या स्वरांत म्हणाले,
"एन्चाण्टमेंट असा शब्द इतके दिवस केवळ आइकला होता. काल रात्रीं तो प्रत्यक्ष अनुभवला !"
- गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
'दुर्गभ्रमणगाथा'.
कोजागरी पोर्णिमेनिमित्त खास... गोनीदा, व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार... तिघेही आवडते साहित्यिक. आणि रायगड...
Pranav Kulkarni
फोटो - जगदीश्वर मंदिर, रायगड.