19/06/2016
दाजीपूर-राधानगरी अभयारण्य कोल्हापूरकरांनी केले स्वच्छ
- - सकाळ वृत्तसेवा
चाळीस टन बाटल्या, वीस टन प्लॅस्टिक...!
कोल्हापूर - जागतिक वारसास्थळामध्ये नोंद असलेल्या दाजीपूर- राधानगरी अभयारण्याच्या स्वच्छतेसाठी शनिवारी (ता. 28) हजारो कोल्हापूरकर एकवटले. तीन तासांच्या श्रमदानातून तब्बल चाळीस टन काचेच्या बाटल्या आणि वीस टनांहून अधिक प्लॅस्टिक संकलित झाले.
"सकाळ माध्यम समूहा‘च्या पुढाकाराने झालेल्या या मोहिमेत स्वच्छतेसाठी तीन पिढ्या एकत्र आल्या. संकलित झालेल्या बाटल्यांत दारूच्या बाटल्यांचा समावेश अधिक असल्याने पर्यटनाच्या नावाखाली येथे राजरोसपणे पार्ट्या होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान, या मोहिमेमुळे अभयारण्याच्या जतन व संवर्धनासाठीची जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली असून, भविष्यात स्वच्छता मोहिमेतील सातत्याबरोबरच प्रबोधनपर फलक, संबंधित घटकांच्या वारंवार बैठका, वन विभाग व पोलिसांच्या समन्वयातून गस्ती पथक, मद्यपी व कचरा करणाऱ्यांवर कारवाई असा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
नागरिकांनी सकाळी सहापासूनच मोहिमेसाठी अभयारण्याकडे धाव घेतली. काही गावांतून तर ट्रक आणि टेंपो भरून लोक येत होते. समुद्रसपाटीपासून सहाशे ते बाराशे मीटर परिसरात 351.16 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी 80 किलोमीटरच्या मार्ग व परिसरात तीस ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे नियोजन होते. प्रत्येक गट, संस्थांनी ठरलेल्या नियोजनानुसार सकाळी साडेसातपासून स्वच्छतेला प्रारंभ केला. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक सर्व सुरक्षिततेची साधने "सकाळ‘ने उपलब्ध केली होती. संपूर्ण क्षेत्र अतिसंवेदनशील असल्याने शांततेचा भंग न होता मोहीम यशस्वी करण्यासाठी गटप्रमुखांनी नेटके संयोजन केले. संकलित झालेला कचरा एका ठिकाणी आणण्यासाठीची यंत्रणाही त्यांनी नियोजनबद्धपणे पार पाडली.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार प्रकाश आबिटकर, महापौर अश्विनी रामाणे, "गोमंतक‘चे संचालक जयदीप माने, "सकाळ माध्यम समूहा‘चे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत, मधुरिमाराजे छत्रपती, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते उदय गायकवाड यांच्यासह ऐंशीहून अधिक संस्था- संघटनांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले.
तनिष्का-"यिन‘सह बचत गटांचाही सहभाग
सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का गटांसह यंग इन्स्पिरेटर नेटवर्क- "यिन‘चे सभासद विद्यार्थीही मोहिमेत सहभागी झाले. स्थानिक महिला बचत गटांनी स्वच्छतेसाठी आलेल्या सर्वांना कोकम, फळे आणि सरबताचे वाटप केले. प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मोहिमेत योगदान दिल्याने या मोहिमेच्या निमित्ताने "चला, दाजीपूर-राधानगरी अभयारण्य स्वच्छ करूया‘ ही एक लोकचळवळच आता उभी राहू लागली आहे.
गव्यांच्या वेशातील चिमुकल्यांनी वेधले लक्ष
आजच्या अभयारण्य कार्यक्रमाच्या आभार कार्यक्रमाच्या ठिकाणी गव्यांचा वेश केलेली चिमुकली मुले लक्ष वेधून घेत होती. केळोशी बुद्रुक येथील प्रतीक प्रकाश पाटील, जयतीर्थ पांडुरंग कुंभार व सूरज बळवंत गुरव या तिघांचा यात समावेश होता.
बचत गटांतर्फे फरसाण, कोकम
वाढता उष्मा आणि प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन हत्तीमहल महिला बचत गट, हरहर महादेव, जय हनुमान, इंदिरा महिला बचत गट व पुरस्कार तरुण मंडळाने लोकांना कोकम, फरसाणा दिला.
सांगावकरांची बांधिलकी
आभार कार्यक्रमासाठी दशरथ सांगावकर यांनी आपल्या कृष्णा फार्म हाउसचा परिसर सकाळसाठी खुला करून दिला. सांगावकर कुटुंबीयांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हीही सहभागी आहोत, ही भावना व्यक्त केली.
राशिवडेतील विठ्ठल भक्त मंडळाने हजार लोकांना सोजी, अभिजित तायशेटे यांनी केळी, अरुण डोंगळे यांनी मसाले दूध, राजेंद्र भाटळे व दीपक शेट्टी यांनी पाण्याचे टॅंकर दिले. ऍड. अभिजित हुपरीकर यांच्या ड्रॅगन बॉजने व प्राथमिक आरोग्य केंद्राने अँब्युलन्स दिल्या. कोल्हापूर हॉटेल मालक संघाने सर्वांना जेवण पुरवले. राधानगरी व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ व फ्रेंडस् नेचर क्लबनेही सहकार्य केले. तिटवेच्या शहीद स्कूलची बस, कौलव ग्रामस्थांचा ट्रक, लक्ष्मीनारायण उद्योग समूह, परितेतील संकल्प फाउंडेशनने स्वतःची गाडी वाहतुकीसाठी दिली.
एकावडे कुटुंबीय
राधानगरीतील प्रल्हाद एकावडे आणि लता एकावडे यांनी या अभियानासाठी स्वतः सकाळचा उल्लेख केलेला टी शर्ट व टोप्या तयार करून स्वतःच्या दुचाकीवरून जमा झालेल्या कचऱ्यांची पोती घेऊन येत होते. तर ज्येष्ठ नागरिक, वय झालेले लोक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. सोन्याची शिरोली, कुडुत्री, राधानगरी, हत्तीमहल येथील महिलांनी उत्साहाने भाग घेतला.
लक्ष्मीनारायण उद्योग समूह दोन कचरा कुंड उभारणार
सकाळच्या उपक्रमाने प्रेरित होऊन लक्ष्मीनारायण उद्योग समूहाने राऊतवाडी धबधब्यावर दहा व न्यू हायस्कूल येथे दोन कचरा कुंड उभारणार असल्याचे सांगितले. तर युवक, कोल्हापूरच्या युवती, मंडळांचे कार्यकर्ते झाडाझुडपात घुसून कचरा गोळा करीत होते.
राजघराणे, इंगळे, विचारे कुटुंबीयांचा सहभाग
उपक्रमात खुद्द शाहू महाराज, त्यांच्या स्नुषा मधुरिमाराजे, ऋतुराज इंगळे त्यांचे कुटुंबीय, मिस अर्थ ब्यूटिक्वीन सहभाग स्पर्धक हेमल इंगळे, दाजीराव विचारे यांचे कुटुंबीय सहभागी होऊन स्वतः कचरा गोळा करण्यास मदत केली.
मोहिमेतून संकलित झालेला एकूण कचरा- 60 टन
काचेच्या बाटल्या- 40 टन
प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या- 20 टन
समुद्रसपाटीतून सहाशे ते बाराशे मीटर परिसरातील 351-16 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी ऐंशी किलोमीटरच्या मार्ग व परिसरात तीस ठिकाणी एकाच वेळी मोहीम.
प्रत्येक ठिकाणाचे अंतर तीन ते पाच किलोमीटर. त्यामुळे पंधरा ते वीस जणांचे गट करून झाली स्वच्छता मोहीम
एकूण सहभागी संस्था- 83
लवकरच कृती आराखडा
मोहिमेमुळे अभयारण्याच्या जतन व संवर्धनासाठीची जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली असून, भविष्यात स्वच्छता मोहिमेतील सातत्याबरोबरच प्रबोधनपर फलक, संबंधित घटकांच्या वारंवार बैठका, वन विभाग व पोलिसांच्या समन्वयातून गस्तीपथक, मद्यपी व कचरा करणाऱ्यांवर कारवाई असा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
असे उभारले नेटवर्क
"सकाळ‘चे कर्मचारी, तनिष्का व "यिन‘ सभासद विद्यार्थी, बायसन नेचर क्लबसह सहभागी संस्थांतील काही कार्यकर्त्यांना तीस ठिकाणांच्या स्वच्छता मोहिमेची जबाबदारी दिली होती. प्रत्येक गटाच्या प्रमुखाकडे सुरक्षिततेची सर्व साधने उपलब्ध केली होती. तत्पूर्वी नियोजनाच्या वेळोवेळी बैठका झाल्या. स्वच्छतेच्या ठिकाणांची माहिती देण्यासाठी व्हाईट आर्मीचे जवान कार्यरत होते. एकूण परिसराची चार मार्गांनुसार विभागणी करून कचरा गोळा करण्यासाठी आवश्यक साधने पुरवण्यासाठी व कचरा संकलनासाठी चार विशेष वाहनांची सोय केली होती. त्याशिवाय एकमेकांना संपर्कासाठी वॉकीटॉकी यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थेसाठी तीन रुग्णवाहिका कार्यरत होत्या.
वैद्यकीय कचराच अधिक
काही भागांत वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण अधिक आढळले. हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी इंजेक्शन्स, सीरिंज, मुदत संपलेल्या गोळ्या पोती भरून ठिकठिकाणी टाकली होती. अभयारण्य परिसरात वैद्यकीय कचरा टाकला जातो, ही गंभीर बाब या निमित्ताने पुढे आली.
सारे गाव एकवटले
मोहिमेच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील कौलव गावाने सारे गट-तट, राजकीय मतभेद बाजूला सारून मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातून ट्रक आणि टेंपो भरून ग्रामस्थ मोहिमेसाठी आले. गावच्या किंवा परिसराच्या विकासासाठी सारे गट-तट, राजकीय मतभेद विसरून एकत्र या, असा संदेशच या निमित्ताने कौलवकरांनी दिला.
धबधब्यात दारूच्या बाटल्याच जास्त
राऊतवाडी धबधब्यात अनेक प्रकारच्या दारूच्या बाटल्या पाहून स्वच्छता करणारे कार्यकर्ते आणि स्थानिकही थक्क झाले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मोहिमेत अकरापर्यंत दारूच्या बाटल्याच बाटल्या गोळ्या झाल्या. पोत्याने मिळालेल्या बाटल्यामुळे तेथे दारू पिण्यास कायमचाच मज्जाव करण्याबाबतही कार्यकर्ते आणि स्थानिक पुढाऱ्यांनी तेथूनच चर्चा सुरू केली.
बाटल्या फोडणे धोकादायक
दाजीपूर अभयारण्य परिसरात स्वच्छता करताना काही कार्यकर्त्यांना पर्यटकांनी फोडलेल्या बाटल्यांमुळे दुखापत झाली. पर्यटकांनी केवळ नशा केली नाही तर काचेच्या बाटल्या फोडून त्या इतरत्र टाकून त्याचा इतरांनाही त्रास दिला. ही वाईट प्रवृत्ती बंद करण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत, अशीही मागणी कार्यकर्ते, बचत गटाच्या महिलांनी केली.
बीअरच्या बाटल्यांचे बॉक्स्
राऊतवाडी धबधब्यासह इतर ठिकाणी बीअरच्या बाटल्यांचे बॉक्सच सापडले. पर्यटन म्हणजे केवळ नशा करणे एवढांच आहे की काय, असाच प्रश्न स्वच्छता करताना कार्यकर्त्यांना पडला. काही महिलांनी या बाटल्या पाहून आश्चर्य व्यक्त केले.
कुटुंबाचाही समावेश
"सकाळ‘ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी सातपासूच लोक दाजीपूर अभयारण्याकडे येत होते. अनेकांचे स्वागत गैबी चौकात होत होते. अनेक कुटुंबीयांनी ठिकठिकाणी थांबून आई-वडील, मुलगा, मुलगी असे एकत्रित कचरा उठाव करीत होते.
आबालवृद्धांचा सहभाग
दाजीपूर अभयारण्याच्या स्वच्छता मोहिमेत आबालवृद्धांनी सहभाग दाखविला. आमदार, शासकीय अधिकारी, मंडळांचे कार्यकर्ते, स्वयंस्फूर्तीने आलेल्या बचत गटांचा महिला, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मुलींचा सहभाग होता.
पदप्रतिष्ठा विसरून मोहिमेत सहभाग
मोहिमेत पदप्रतिष्ठा विसरून अनेकांनी पुढाकार घेतला. वन विभागाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अनेकांच्या हातात लोखंडी सळी आणि हॅण्डग्लोज होते. त्यांनी रस्त्याकडेच्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक गोळा केले.
स्वखर्चाने सहभाग
कोल्हापूर शहरापासून सुमारे ऐंशी किलोमीटरवर स्वच्छता मोहीम असली, तरी राधानगरीपर्यंत हजारो कोल्हापूरकर स्वखर्चाने आले. स्वतःची न्याहारीही त्यांनी बरोबर आणली आणि त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातूनही अनेक जणांनी मोहिमेत सहभाग नोंदवला.
यांचे विशेष सहकार्य
- कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन
- ग्रीन इंडिया गॅसोलिन, कोल्हापूर
- आदी प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि. कोल्हापूर
- आयमॅक्स ऍडव्हर्टायझिंग (सुनील बासराणी)
- रामसिना ग्रुप, कोल्हापूर
- कोल्हापूर हॉटेल मालक संघ
- डी. एम. कॉर्पोरेशन प्रा. लि. (दिलीप मोहिते)
- ड्रायडंट सर्व्हिसेस प्रा. लि. पुणे (कमिन्स डिलर)
- कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)
या ठिकाणी झाली मोहीम
माळवाडी धरण, जुने गेस्ट हाऊससमोर, दाजीपूर बॅक वॉटर, फोंडा घाट ते बापू हॉटेल, हसणेकडील माळ, उगवाई मंदिर, उगवाईसमोर बॅक वॉटर (अ), उगवाईसमोर बॅक वॉटर (ब), उगवाईसमोर बॅक वॉटर (क), हसणे पूल, हसणे-देवराई, हसणे तलाव, हसणे ते सतीचा माळ, सतीचा माळ ते शेळप, शेळप ते एजिवडे, एजविडे ते न्यू करंजे, न्यू करंजे ते दाऊदवाडी, दाऊदवाडी ते फेजिवडे, धरण गेट - वीज घर - फेजिवडे, फेजीवडे ते हत्ती महाल, हत्ती महाल ते अंबाबाई मंदिर, पेट्रोल पंप ते मांजर खिंड, डोंगराई मंदिर ते काळम्मावाडी रोड, काळम्मावाडी धरण गेट व मंदिर, राजापूर, मांजर खिंड ते गैबी, गैबी ते खिंडी व्हरवडे, सात दरवाजा ते पाडळी, राऊतवाडी धबधबा, राऊतवाडी ते ओलवण.
इचारतोय गवा...!
शाहीर आझाद नायकवडी यांनी सादर केलेला पोवाडा
भरून डोळं इचारतोय गवा...
शहाणा होईल माणूस कवा?
प्लास्टिकच्या बाटल्या जंगलात मिसळ....
दारूच्या बाटल्यांची त्याच्यात भेसळ....
जे जे जमेल ते जंगलात घुसळ....
आमच्याच करणींन प्रदूषित झालं इथलं पाणी नि हवा.......
भरून डोळं इचारतोय गवा...
शहाणा होईल माणूस कवा?
जंगलात येतोया मजा मारायला...
शांताबाई, झिंगाट आमच्या जोडीला..
ओरडून-बोंबलून लागलो नाचायला....
ऐकून आवाज उडून गेला पशु-पक्ष्यांचा थवा...
भरून डोळं इचारतोय गवा...
शहाणा होईल माणूस कवा?
जंगलांची कत्तल आम्हीच केली...
जंगलं सिमेंटची सर्वत्र झाली...
फार्म हाऊसची भर जंगलात पडली...
विकृत-विनाशी मानवी वृत्तीला थांबवेल कुठली दवा?
भरून डोळं इचारतोय गवा...शहाणा होईल माणूस कवा?
विनवणी आहे सर्वाला...
जंगलांचे पावित्र्य राखूया चला.....
"सकाळ‘च्या साथीन ठरवूया चला....
स्वच्छता ठेवूया जंगलांना जपूया..
मोकाट फिरू दे गवा.....
भरून डोळं इचारतोय गवा...शहाणा होईल माणूस कवा?
असाही पाहुणचार
हॉटेल मालक संघाने सर्वांसाठी जेवणाची सुविधा दिली. राधानगरीतील इंदिरा महिला बचत गट, जय हनुमान महिला बचत गट, पुरस्कार तरुण मंडळाने सर्वांनी केळी, कोकम व पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध केली. राशिवडे येथील विठ्ठल माऊली भक्त मंडळाने सर्वांसाठी सांजाचा शिरा दिला.
राज्याच्या नकाशावर ठळक ओळख असलेले राधानगरी अभयारण्य आणि राधानगरी धरण असल्याने सातत्याने याची विधानभवनातही चर्चा होते. हा परिसर सर्व राज्याला भुरळ घालणारा आहे. याच्या स्वच्छतेसाठी सकाळ माध्यम समूहाने आज घेतलेली मोहीम अत्यंत स्तुत्य आहे. आता हा स्वच्छतेचा संदेश जिल्हाभर घराघरांत जाईल आणि एक जागर होईल आणि "सकाळ‘चा हा उपक्रम सगळीकडे राबवला जाईल. यासाठी राज्य शासनाकडे विषय मांडून इथल्या पर्यटन विकासासाठी विशेष निधीसाठी प्रयत्न करू.
- प्रकाश आबिटकर - आमदार
अभयारण्यामध्ये असलेला कचरा काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून "सकाळ‘ने आज घेतलेल्या उपक्रमाचा संदेश सगळीकडे पोचेल. आज आम्हाला सहभागी होताना आनंदही झाला, समाधानही लाभले. यासाठी आता जागे होऊन भविष्यात कचरा होऊच नये यासाठी लोकांनी दक्ष राहावे.
- के. पी. पाटील- माजी आमदार
अभयारण्यामध्ये इतका कचरा असेल, याची कल्पनाही नव्हती. इथल्या समस्येचा अभ्यास करून "सकाळ‘ने घेतलेला उपक्रम किती महत्त्वाचा आहे हे समजले. सहभागी झालेल्या सर्वांना याची जाणीव झाली. आता यापुढे निदान कचरा होऊ देणार नाही, अशी भूमिका प्रत्येकाने घ्यावी लागेल.
- विजय देवणे- जिल्हाप्रमुख शिवसेना
राधानगरी अभयारण्य ही कोल्हापूरला लाभलेली देणगी आहे. येथे कचरा ही मोठी समस्या आहे. याचा अंदाज घेऊनच "सकाळ‘ने ही मोहीम हाती घेतली. यामध्ये सहभागी होताना धन्य वाटले. या उपक्रमामुळे सामाजिक सेतू बांधला गेला. हा उपक्रम म्हणजे तरुणाईला आणि नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी महत्त्वाचा आहे.
- अरुण डोंगळे- संचालक, गोकुळ दूध संघ
"सकाळ‘ने नेहमीच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेतले आहेत. आजचे हे राधानगरी अभयारण्य स्वच्छतेचे अभियान खूपच महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये अनेकजण सहभागी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनेही आम्हीही योगदान दिले.
- ए. वाय. पाटील, अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस
खऱ्या अर्थाने खूप मोठे सामाजिक काम आज "सकाळ‘मुळे घडले. केवळ कचरा उचलने हा भाग नाही, तर प्रत्यक्ष समाजाला यात सहभागी करून घेऊन त्यांच्या दुष्कर्माचे चित्र दाखवून दिले. प्रत्येकाने जिवाचे रान करून कचरा गोळा केला. एक सांघिक भावना "सकाळ‘मुळे आमच्यात जागृती झाली.
- उदयसिंह पाटील- माजी सभापती पं. स.
निसर्गाच्या सानिध्यात येऊन इथल्या संपन्न वातावरणात माणूस कसा कचरा करतो याचे उदाहरण आज अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. बघेल तिथे कचरा आणि बाटल्या दिसत होत्या. त्या काढताना लोकांचे हात थकत नव्हते आणि त्या वेचून आटपतही नव्हत्या इतका प्रचंड कचरा होता. त्याचा आज "सकाळ‘मुळे निपटारा झाला, हे खूप महत्त्वाचे आहे.
- धैर्यशील पाटील- माजी अध्यक्ष भोगावती
"सकाळ‘ नेहमीच चांगल्याच्या पाठीशी राहिले आहे. मग पाणी प्रदूषणसाठी जलदिंडी असो किंवा रंकाळा वाचवा असो, दुष्काळावर मात असो, की पूरग्रस्तांना साथ असो हे "सकाळ‘चे उपक्रम परिणामकारच आहेत. यामुळेच या उपक्रमाला भरभरून साथ मिळाली. "सकाळ‘वरच्या विश्वासामुळेच हजारो हातांनी अभयारण्य स्वच्छ झाले. भविष्यातील धोके ओळखून उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे.
- सदाशिवराव चरापले- माजी अध्यक्ष भोगावती
"सकाळ‘च्या या उपक्रमात आम्हाला सक्रिय सहभागी होता आले. राधानगरीकरांसाठी आज उत्साहाचा दिवस होता. येथील प्रत्येक माणूस यामध्ये सहभागी होऊन "सकाळ‘ला बळ देत होता. हे पुढील पर्यटनाला दिशा देणारे आहे. राधानगरीच्या पर्यटनाला एक शिस्त लाभणार आहे.
- अभिजित तायशेटे- सभापती शिक्षण व अर्थ जि. प.
"सकाळ‘चा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, समाजाला दिलेली हाक कौतुकास्पद आहे. यामुळे घराघरांत आणि गावागावांत स्वच्छतेचा चांगला संदेश पोचणार आहे.
- विश्वनाथ पाटील- माजी उपाध्यक्ष भोगावती
आम्हाला कल्पानाही नव्हती इकता कचरा आणि काचा या जंगलात असतील; पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हे भयंकर रूप बघायला मिळालं. "सकाळ‘च्या या अभियानाला आमचे धन्यवाद.
- आंबाजी पाटील- माजी सदस्य पं.स.
‘सकाळ‘च्या या चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही सहकुटुंब सहभागी झालो. खरे तर याचा आनंद अवर्णनिय आहे. जंगलातील कचरा काढताना इथल्या वन्यप्राण्यांना काय वाटत असेल हे समजून आले. पर्यटनाला यावे; पण अशाप्रकारे कचरा होता कामा नये, अन्यथा एक दिवस पर्यटकांना पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहणार नाही.
- गायत्रीदेवी सूर्यवंशी- माजी सभापती पं. स.
"सकाळ‘चा हा उपक्रम आज साजरा होताना समाजातील सर्वांनी घेतलेला सहभाग पाहता एका समाजिक बांधिलकेतून लोक कसे झटून एकत्र येतात याची जाणीव झाली.
- किसन चौगले- राधानगरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी
अभयारण्य स्वच्छतेचे हे अभियान म्हणजे राधानगरीकरांना अभिमानाची बाब आहे. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना काय दिशा द्यायची, याचा अंदाज आम्हाला आला. आता एक स्वच्छ पर्यटन आणि जबाबदार नागरिक म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे.
- राजेंद्र भाटळे- राधानगरी
खरोखरच आपल्या परिसरात इतका कचरा असेल याची कल्पनाही आम्हाला नव्हती. मात्र ती दृष्टी "सकाळ‘ने दिल्याने सकाळपासून कचरा काढताना सगळीकडे कचराच दिसून आला. भविष्याची आमची जबाबदारी वाढली.
- संभाजी आरडे- राधानगरी.
"सकाळ‘मुळे आम्हाला एका सामाजिक आणि संवेदनशील अभियानात भाग घेता आला. खरोखर अतिशय चांगला उपक्रम झाला. भविष्यात येणाऱ्या पर्यटकांना आता चांगला संदेश मिळणार आहे.
- भिकाजी एकल- सचिव संघटना राधानगरी
छत्रपतींच्या कुटुबीयांचा सहभाग
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे यांच्यासह छत्रपती शाहू विद्यालयातील तारा कमांडो फोर्समधील विद्यार्थिनी, एनसीसी छात्रसैनिक यांनी दाजीपूर बॅक वॉटर परिसरात झालेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शाहू महाराज, मधुरिमाराजे व यशस्विनीराजे यांनी प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, गुटख्याच्या पुड्या गोळा केल्या. तारा कमांडो फोर्समधील विद्यार्थिनींनी बॅक वॉटर पसिरात सुमारे दीड किलोमीटर आत जाऊन स्वच्छता मोहीम राबवली.
विचारे कुटुंबीयांचे श्रमदान
उगवाई देवी मंदिरासमोरील बॅक वॉटर परिसरात प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या गोळा करण्यात आल्या. "दाजीपूर‘ हे नाव ज्यांच्या पूर्वजांच्या नावे पडलेले आहे, त्या विचारे कुटुंबीयांनी मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला. परिसरातील कचरा त्यांनी एकत्रित केला. विजय विचारे, अभिजित विचारे, प्रकाश विचारे, दीपा विचारे, अमृता विचारे, रेवती विचारे, देविका भोसले, नंदिनी घोरपडे, विजय पाटील यांनी मोहिमेत भाग घेतला.
मोहन पाटील यांच्यातर्फे नाष्ट्याची सोय
मोहन पाटील यांच्यातर्फे गेट वे ते हसणेकडील माळ परिसरात स्वच्छता करणाऱ्यांना चहा व नाष्ट्याची सोय केली होती. एक ट्रकभर प्लास्टिक व दारूच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, गुटख्याच्या पुड्या येथे जमा करण्यात आल्या.
फेजिवडेतील महिलांचा उत्साह
फेजिवडेतील महिलांचा एक गट उत्स्फूर्तपणे मोहिमेत सहभागी झाला. हातात पोती घेऊनच त्या रस्त्याच्या दुतर्फा फिरत होत्या. लोखंडी सळ्यांत बाटल्या अडकवून त्यांनी त्या जमा केल्या. त्यांचा कामातील उत्साह तरुणांना लाजविणारा होता. एक किलोमीटर परिसरातील कचरा त्यांनी जमा केला.