07/05/2019
#गुहागर 😊
रत्नागिरीसह संपुर्ण कोकणाला समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या पुर्व, दक्षिण व उत्तरेकडील भागाला १० ते १५ वर्षापुर्वी गुहागर काहीसे लांब पल्ल्याचे वाटायचे. त्याला कारणही तसेच होते, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गापासुन चिपळुण शहरापासुन गुहागर ४५ कि.मी.अंतरावर आहे. एकेरी मार्गाने वाहतुक व्यवस्था असल्याने गुहागरला जाताना दोन ते अडीच तास लागत असत.
एन्रॉन प्रकल्पामुळे गुहागर ख-या अर्थाने जगाच्या नकाशावर आले.गुहागर तालुक्यातील रानवी अंजनवेल या माळरानावरील भुमिपुत्रांनी कंपनीविरोधात दिलेला लढ्यामुळे गुहागरचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले.
कोकणाच्या विकासाला थोडी गती मिळत होती. तसतसा गुहागर गाव जवळ येवु लागले. एन्रॉन कंपनीने गुहागरकडे जाणारा रस्ता दुहेरी केला. जयगड , दाभोळ या दोन्ही खाड्यामधुन वाहतुक सुरु झाली नी गुहागरची पर्यटन दृष्टया वाटचाल सुरु झाली.
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गुहागर येथे गेलो तो २०११ साली. नोकरीची पहिली नियुक्ती गुहागर येथे झाली. आई-वडील जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या टोकावर माझी नियुक्ती झाल्याने अस्वस्थ झाले होते. वडील एस्.टी.महामंडळामध्ये असल्यामुळे नोकरीस असताना गुहागर अगदी जवळुन पाहीले होते. माझी पहिलीच पोस्टिंग असल्याने ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
२०११ ते २०१५ या कालावधीत मी गुहागर तालुक्यात नोकरी केली. मी नोकरी केली ती सरकारी दृष्ट्या म्हणत आहे. कारण माझ्यादृष्टीने मी आजवर जगलेल्या आयुष्याचा तो ‘सुवर्णकाळ’ होता असे मी म्हणेन. कारण एस.टी.मधुन पहिले पाऊल मी गुहागरात टाकले नी आज तिथुन बदली होऊन ४ वर्षे झाली तरीही गुहागर हे मला माझं ‘ पहिलं प्रेम ’ वाटतं. म्हणुनच गुहागरची ओढ आजही मनाला कायम लागलेली असते. निसर्गाने पुन्हा मानवी जीवन बहाल केले तर मनोमनी माझा जन्म माझ्या आत्ताच्या आई वडिलांच्या पोटीच व्हावा फक्त तो गुहागरात व्हावा हिच इच्छा आहे.
तुम्ही म्हणाल असं काय आहे गुहागरात ? गुहागर गाव पहायचे असेल तर मुंबई किंवा पुणेकरांनी प्रवासाची सुरुवात चिपळुणकडुन न करता मुद्दामहुन दापोलीकडून करायला हवी. वाशिष्ठी नदीची चमकणारी चमत्कारीक दाभोळची खाडी ओलांडली की धोपावे किंवा वेलदुर गावातुन तुमचा प्रवास सुरु होतो. रानवी , अंजनवेल मार्गे सरळ आलो की आरे गावातील धारदेवी मंदिराजवळ एक अवघड वळन येते, त्या वळणावर पहिल्यांदा येणा-या माणसाला थांबण्याचा मोह आवरता येत नाही. कारण समोर दिसते ते डोळ्याचे पारणे फेडणारा नारळ, पोफळींच्या बागांनी , विविध वृक्षवेलींनी आच्छादलेला व हिरवागार भुप्रदेश आणि त्यावर साज म्हणुन की काय त्या भुप्रदेशातुन वळणे घेत वाहणारी आरे गावची नदी निळाशार समुद्राला जाऊन बिलगताना दिसते. सुरुबन व नारळ पोफळीच्या बागांच्या पलीकडे दिसणा-या फेसाळणा-या लाटा, चांदीसारखी चमकणारी पुळण असलेला समुद्रकिनारा नी आकाशात शुभ्र कापसासारखे पिंजुन ठेवलेले ढग दिसतात. निसर्गाच्या या अभिजात कलाकृतीचे नाव गुहागर आहे हे कळेपर्यंन्त आपण गुहागरच्या प्रेमात पडलेलो असतो.
जयगड व दाभोळच्या खाडीच्या मध्ये समुद्रकिना-यावर हे गाव वसलेले आहे. आरेच्या डोंगरउतारावरुन रस्त्याने खाली जात असताना रस्त्यांच्या दोहोबाजुंनी हापुस आंब्याची कलमांच्या बागा आपले स्वागत करतात. पुढे जाताना समुद्र किना-याला समांतर असणा-या रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी कोकणातील पारंपारीक प्रकाराची अंगण असलेली कौलारु घरे दिसतात. गुहागर गावचे नैसर्गिकदृष्टया दोन भाग पडलेले आहेत. त्याला खालचा पाट व वरचा पाट असे म्हणतात.वरचा पाट ते खालचा पाट या भागात पश्चिमेकडील प्रत्येक घराच्या मागे नारळ पोफळीची आगरे आहेत.त्यांना वाडी म्हणतात, प्रत्येक वाडीत गोड्या पाण्याची विहिर आहे आणि एक वाट ही समुद्राच्या किना-यापर्यंन्त गेली आहे.
गुहागर गावाच्या मध्यावर असलेले श्री देव व्याडेश्वर शिवमंदिर हे अनेक चित्पावन ब्राम्हण कुटुंबियाचे हे कुलदैवत आहे. गुहागर ची दररोज ची पहाट ही याच श्री देव व्याडेश्वराच्या शिवमंदिरातुन होणा-या शंखनाद व चौघड्यांच्या सुमधुर संगीताने होते.
पहाटे गुहागर समुद्रकिना-यावरुन फिरताना पुळणीवर फिरणारे सागरी जिवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. सुर्याची सोनेरी किरणे नारळ पोफळीच्या बागेतुन वाट काढत किना-यावरील वाळुवर पडली की संपुर्ण समुद्रकिनारा सोनेरी होवुन जातो. स्वच्छतेच्या बाबतीत गुहागर समुद्रकिनारा हा संपुर्ण कोकण किनारपट्टीवरील क्रमांक एकचा आहे. ५ किलोमीटरचा लांबीचा हा किनारा नारळी-पोफळी आणि सुरुच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. गुहागरची सायंकाळ ही रम्य या शब्दाला साजेशी आहे. स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, एक पर्यटन जेटी व समुद्रदर्शनाचा आनंद दुरवरुन घेणेसाठी प्रशासनाने सहकुटुंब बसण्याची केलेली व्यवस्था यामुळे समुद्राच्या पाण्यावरील आभाळाची लाली पाहत सुर्यास्त पाहताना मन हरपुन जाते. लहान मुलांना खेळण्यासाठी किना-यावर बगीचा व विविध खेळणींची व्यवस्था आहे. रात्री तर या समुद्रकिना-यावर बसण्याची गंमत काही वेगळीच आहे. दुरच्या क्षितीजावर लुकलुकणा-या मासेमारी करणा-या बोटींचे दिवे, जवळुनच कानावर धडकणारी समुद्रांच्या लाटांची गाज नी थंडगार वारा हे सगळं स्वप्नवत वाटतं. रात्रीही या समुद्रावर मानवी धोका नाही. प्रशासनाने येथे ‘हायमॅक्सची ’ ची सोय केली आहे तसेच गुहागर पोलीस स्टेशन इथे हाकेच्या अंतरावर आहे. विदेशी व स्थानिक पर्यटकांना इथे कसलीही मानवी भिती नसली तरी किना-यापासुन समुद्रात खोलवर पाण्यात जाण्याचे टाळावे. खोलवर जाऊन पोहोणेसाठी हा समुद्रकिनारा धोकादायक आहे.
गुहागर हे सांस्कृतिक ‘गाव’ आहे. मी गाव हा शब्द मुद्दामहुन वापरतोय कारण गुहागर नगरपंचायत होवुन शहरासारख्या सुखसुविधा प्राप्त झाल्या असल्या तरी गुहागरकरांनी याचे ‘ गावपण ’ टिकवुन ठेवले आहे. होळी म्हणजेच कोकणातला शिमगा हे इथले खास आकर्षण आहे. पारंपारीक वेशातील संकासुर व गोमु हे जगप्रसिद्ध आहेत. तसेच भंडारी बांधवांची एकजुट दाखवणारा समा हा सुद्धा वैशिष्टपुर्ण खेळ असतो. भंडारी बोली भाषेचे वेगळेपण इथे आहे. गुहागर मध्ये क्रिकेट व कब्बडी हे खेळ प्रामुख्याने खेळले जातात. गुहागर समुद्र किना-यावरील पुळणीमध्ये पावसाळ्यात क्रिकेट व कब्बडी आवडीने खेळले जाते.
खाद्यसंस्कृतित इथे विवीधता आढळते तरीही मासेमारी चे प्रमाण जास्त असल्याने इथे जेवणात मासे हे प्रामुख्याने आढळतात. तसेच येथील आठवडा बाजारात सुकी खारवलेली मच्छी प्रामुख्याने मिळते. समुद्राचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहेत. गुहागरात प्रामुख्याने आंबा,फणस,काजू, सुपारी ,नारळ हि फळे मुबलक प्रमाणात मिळतात.
गुहागर गावाच्या शेजारी असणारी वेलदुर , धोपावे, अंजनवेल, असगोली ,पालशेत, वेळणेश्वर , हेदवी , तवसाळ , नरवण ह्या गावांनाही समुद्रकिनारा लाभलेला आहे. गुहागरपासुन काही अंतरावरच वेळणेश्वर व अंजनवेल गोपाळगड किल्ल्यावरील शिवमंदिरे , हेदवी येथील गणेश मंदिर येथे प्रसिद्ध आहेत.
गुहागर व परिसरातील आणखी एका वैशिष्टाचा उल्लेख मला करावा लागेल. ‘ कोकणची माणसं साधी भोळी , काळजात त्यांच्या भरली शहाळी ’ हे शब्दान शब्द् इथल्या माणसांना लागु होतो. इथे येणारा पर्यटक असो किंवा कॉलेज मधुन लेक्चर बंक करुन येणारी मुलं असोत कुणाशीही आजवर गैरवर्तन केलेचे ऐकवित नाही. माझ्या रक्ताच्या नात्याचे इथे कोणीही नसले तरीही त्या पलीकडे जावुन इथल्या विविध जातीधर्माच्या माणसांनी मला घरचा माणुस म्हणुन वागणुक दिली ती माझ्या ह्ददयात साठवुन ठेवली आहे.
तीनही बाजुंनी हिरव्यागार डोंगरांचा साज व एका बाजुला अथांग निळाशार समुद्र आणि नारळ पोफळीच्या आगारातुन आकाशाकडे डोकाऊ पाहणारी लाल मातीची कौलारु घरं पाहताना निसर्ग नववधुसारखा साजशृँगार करुन स्वत:ला आरशात न्याहाळत आहे असे वाटते.
अशा या गुहागरला नक्की भेट द्या , कारण गुहागरच्या समुद्र किना-याची गाज, इथला थंडगार वारा आणि इथली माणसं तुमच्या आयुष्यातील चार क्षणांना निवांतपणा देणारी आहेत.
!! येवा कोकण आपलाच असा !!
गुहागर, चिपळूण येथील छायाचित्र 🙂.