26/02/2018
चौल - अलिबाग....
काही-काही स्थळांची पाळेमुळे शोधायला लागलो की, दोन-अडीच हजार वर्षे मागे जावे लागते. सातवाहनांच्या राजवटीतील पैठण, तेर, जुन्नर, नाशिक ही यातलीच काही स्थळे! अलिबाग-अष्टागरमध्येही असेच एक गाव, सातवाहनकालीन प्राचीन बंदर दडलंय – चौल!
अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर चौल!
चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलजवळच्या वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी या काळाचे चौलशी असलेल्या नाते दाखवते, पण चौलच्या प्राचीन बंदराविषयी कुठलेच पुरावे मिळत नव्हते. तेव्हा याच्याच शोधात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि त्यातून हे प्राचीन बंदर प्रकाशात आले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीन असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते
काही-काही स्थळांची पाळेमुळे शोधायला लागलो की, दोन-अडीच हजार वर्षे मागे जावे लागते. सातवाहनांच्या राजवटीतील पैठण, तेर, जुन्नर, नाशिक ही यातलीच काही स्थळे! अलिबाग-अष्टागरमध्येही असेच एक गाव, सातवाहनकालीन प्राचीन बंदर दडलंय – चौल!
अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर चौल! खरेतर इथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे हीदेखील चौल-रेवदंडा अशी जोडगोळी! मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाडय़ा स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
खरेतर या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा, तर अशी चाफ्याची झाडे असलेला भाग तो चंपावती! याला आधार म्हणून आजही गावात जागोजागी असलेली चाफ्याची झाडे दाखवली जातात. काहींच्या मते इथे वापरल्या जाणाऱ्या ‘चंपा’ नावाच्या मासे पकडण्याच्या जाळीवरून किंवा चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले, तर रेवदंडय़ाचे रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले.
या पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना? त्याचे उत्तर चौलच्या प्राचीन बंदरात दडले आहे. इतिहासाचा प्रदीर्घ कालखंड, त्यातच बंदर असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती, लिपी, उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही नावांची जंत्री जन्माला आली.
आज चौलमध्ये पाऊल टाकले की, प्रथम या साऱ्या प्राचीन इतिहासापेक्षा कोकणच्या निसर्गसौंदर्याचीच मोहिनी पडते. नारळी-पोफळीची ही एवढी घट्ट वीण की, चौलमध्ये आलो तरी गाव आल्याचे समजत नाही. जणू सारा भवताल आकाशी धावणाऱ्या वृक्षांच्या मांदियाळीत हरवून गेलेला! या हिरवाईतच चौलच्या राजाभाऊ राईलकरांची एक वाडी! पाऊण एकरातली ही वाडी, पण जणू एखादे जिवंत वनस्पतींचे संग्रहालय! शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष यांचा हा संसार! यामध्ये नारळ, पोफळी, आंबा, फणस, रातांबा अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही तर चक्क परदेशी वनस्पती! एकेक झाड पाहू लागलो की, हा खजिना उलगडत जातो. बकुळ, सीतेचा अशोक, सोनटक्का, कवठी चाफा अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. चित्रक, ब्राह्मी, शतावरी, अनंतमूळ, वैजयंती तुळस, महाळुंगसारख्या वनस्पती औषधी वनस्पतींचे दालन उघडतात. जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि साबूदाणा, कॉफी, अननस आणि चॉकलेटमध्ये वापरले जाणारे ते कोको यासारख्या दुर्मिळ वनस्पती, साऱ्याच चार क्षण त्यांच्याकडे निरखून पाहायला लावतात. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘अॅव्हाकॅडो’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘पॅशन फ्रूट’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. खरेतर हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत! राईलकरांनी तो इथे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला. आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत. त्यांच्या या कार्यास यश लाभो ही सदिच्छा!
चौलमध्ये भटकायला लागलो की, गावातले लोक सर्वप्रथम रामेश्वर मंदिरात घेऊन येतात. चौलचे हे ग्रामदैवत! उतरत्या कौलारू छताचे मंदिर, पुढय़ात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी! कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना! मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात. हे ऐतिहासिक मंदिर पाहून झाले की, इथलीच आणखी एक गंमत पाहायची. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली तीन कुंडे आहेत. पर्जन्य, वायू आणि अग्नी अशी त्यांची नावे! दुष्काळ पडला, पाऊस आटला की, ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की, उर्वरित ‘अग्नी’ कुंड उघडायचे. गावातील त्या-त्या गोष्टींची उणीव ही कुंडे भरून काढतात. गंमत आहे ना? याच्या नोंदी तपासल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. गावोगावीच्या या श्रद्धा आणि त्यासाठीच्या या योजना पाहण्यासारख्या असतात. चौलमध्ये रामेश्वराशिवाय अन्यही काही मंदिरे आहेत. यामध्ये एकवीरा भगवती देवीचे मंदिरही असेच जुने! या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे.
अलिबागपासून १६ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून २ किमी. अंतरावर भोवाळे या निसर्गरम्य गावातील गोंगरवजा टेकडीवर हे दत्तमंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर पायर्या पायर्यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत विलोभनिय वाटतो.
रेवदंडय़ापासून जेमतेम ४-५ कि.मी.वर वसलेले शांत सुंदर चौल. आजूबाजूला भातशेती, कोंकणी कौलारू घरे आणि फणसाच्या झाडांची सोबत लाभलेलं टुमदार चौल. पावसाळ्यात पाणी घरात येऊ नये म्हणून इथली घरे एका चौथऱ्यावर बांधलेली आढळतात. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगरांच्या मिळून बनलेल्या समूहाला अष्टागर हे नाव पडले आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी भोपाळे तळे या नावाचे एक तळे लागते. तळ्याच्या शेजारूनच पुढे दत्तमंदिराकडे जाण्यासाठी जवळजवळ १५०० सिमेंटच्या पायऱ्या चढून जावे लागते. मोठय़ा पायऱ्या आणि दोन्ही बाजूंना असलेली झाडे यामुळे ही चढण त्रासदायक होत नाही. तसेच वाटेत विश्रांतीसाठी बाके केलेली आहेत. डोंगरमाथ्यावरून रेवदंडा परिसराचा देखावा केवळ अप्रतिम दिसतो. वरती गेल्यावर समोर एक मठ लागतो. तिथे दोन औदुंबर वृक्ष आहेत. त्या वृक्षांखालीच पहिल्यांदा दत्तपादुका होत्या. इथेच वरच्या बाजूला एका मंदिरात दत्तमूर्ती व त्या मूर्तीच्या पुढय़ात मूळ पादुका आहेत. इथे हरेरामबुवा, मुरेडेबुवा, बजरंगदासबुवा, दीपवदासबुवा अशा सत्पुरुषांचे वास्तव्य होते. पैकी मुरेडेबुवांची इथे समाधी आहे. सन १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. इथे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते.
साधारण पाचशे पायर्या चढून गेल्यावर डाव्या हाताला एक लहानसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. पुढे साधारण पंचवीस तीस पायर्या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर विश्रारांती स्थान म्हणून सद्गुरू बुरांडे महाराज समाधी पहावयास मिळते. पुढे सुमारे दिडशे पायर्यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यापुढे हरे राम विश्रामधाम त्यानंतर हरे राम बाबांचे धुनीमंदिर त्यापुढे औदुंबर मठ पहावयास मिळतो. इथपर्यंत आल्यानंतर आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या दत्तमंदिराच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदासबाबा मठ आहे.
दत्तमंदिरातील दत्तमुर्ती त्रिमुखी सहा हात असलेली पाषाणाची आहे. देवळाभोवती प्रदक्षिणेसाठी मोकळी जागा आहे. मुख्य गाभारा थोडासा उंचावर आहे. देवालयाच्या कमानीपासून गाभार्यापर्यंत छोटासा जिना आहे. दरवर्षी दत्तजयंतीपासुन पाच दिवस दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या पाच दिवसांत फार मोठी जत्रा भरते. सदर दत्तमंदिर आज महाराष्ट व इतरत्र एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.
या मंदिरांशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावंतिणीचा वाडा या तीन मध्ययुगीन वास्तू! खरेतर या तीनही वास्तू चौलमधील मुस्लीम सत्ताधिशांचे अस्तित्व सांगणाऱ्या! यातील राजकोट हा चौलचा भुईकोट विजापूरच्या आदिलशाहीने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटींबरोबर सत्ताबदल अनुभवत मराठय़ांकडे आला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठय़ांच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्यांच्या आरमाराचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. या राजकोटाची तटबंदी, येथील शिबंदीची घरे, महाल-वाडे यांचे अवशेष आजही दिसतात.
दुसरी वास्तू हमामखान्याची! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह! कमानींची रचना, भिंतीतच काढलेल्या खोल्या आणि या साऱ्यांवर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने या वास्तूला कलात्मक चेहरा आला आहे. या साऱ्यातून फिरणारे पाण्याचे पाट, कारंजी, हौद तर ती शाही श्रीमंतीच पुढे आणतात. आज या साऱ्यांचे पाण्याशी असलेले नाते तुटले असले तरी त्या सौंदर्यशाली रचना पाहूनच भिजायला होते. कलावंतिणीचा वाडा ही अशीच आणखी एक सौंदर्यवास्तू! चौलच्या सराई भागात आज उद्ध्वस्त अवस्थेत उभ्या असलेल्या या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत या साऱ्यांतून फिरू लागलो की, काही क्षण वर्तमानाचे भान हरपते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगी!
चौलचा या इतिहासाचा गुंता वर्तमान, मराठेशाही, मध्ययुगातील मुस्लीम राजवटी असा सोडवत आपण अगदी त्याच्या प्राचीन अस्तित्वाच्या शोधावर येऊन ठेपतो. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलजवळच्या वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही या काळाचे चौलशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल बोलते, पण चौलच्या प्राचीन बंदराविषयी कुठलेच पुरावे मिळत नव्हते. तेव्हा याच्याच शोधात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि यातून हे प्राचीन बंदर प्रकाशात आले.
काय मिळाले या उत्खननामध्ये? त्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अॅम्फेरा’ आणि असे बरेच काही! जमिनीखाली काळाचे अनेक थर डोक्यावर घेत गाडली गेलेली प्राचीन संस्कृतीच यामुळे प्रकाशात आली. डेक्कन कॉलेजचे डॉ. विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननामध्ये डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. श्रीकांत प्रधान, शिवेंद्र काडगावकर, सचिन जोशी, रुक्सना नानजी आणि विक्रम मराठे आदी अभ्यासकांनी यात भाग घेतला. या उत्खननामुळे चौलला त्याची खरी ओळख मिळाली. दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन बंदर! त्या काळी या बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीनदेखील असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते. आज दोन हजार वर्षांनंतर चौलच्या कुंडलिका नदीतून बरेच पाणी वाहून गेले आणि आजचे चौल अलिबागच्या नकाशातही शोधावे लागते आहे.