20/04/2023
ग्रॅंन्ड टूर….. सेलिब्रेशन पन्नाशीचे
भाग - १
मी प्रवास वर्णन लिहीले की नाही? लिहायला सुरूवात झाली का? कधी लिहीणार? असे अनेक मेसेज, फोन सतत येत आहेत, मनांत गुदगुदी निर्माण झाली.( बेटा, मन मैं लड्डू फूटा ) आपले लिखाणाची कोणी नोंद घेतंय या एक निराळाच आनंद असतो…. असो,
आज सहलीहून परतून ३ दिवस झाले, पण लिखाण सुरू करण्यासाठी लागणारी ताकद शरीरात अजिबात उरली नाहीए. शरीर खऱ्या अर्थाने थकलेले आहे पण मन अजिबात थकले नाही. ऊलटपक्षी मनाने जरा जास्तच तरूण / ताजेतवाने झालो आहोत. तरूण झालो आहोत हे का लिहीलंय हे तुमच्या लक्षात आले असेलच…. हो बरोबर, आम्ही सहलीला जाण्यामागचा उद्देश्य हाच होतां की आम्ही सर्व शालेय वर्ग मित्र वयाची पन्नाशी पु्र्ण करत आहोत. पण सहलीत केलेला दंगा व मस्ती आम्हाला आमच्या बालपणांत घेऊन गेला होतां. या सहलीत आम्ही ती प्रत्येक गोष्ट केली जी आम्ही शाळेत असताना केली होती… एकत्र भटकंती, हास्य विनोद, प्रत्येकाने आणलेला खाऊ ( शाळेतील डबा जरा लहानच वाटतं होतां, इतका खाऊ आणलां होतां प्रत्येकाने ) तो खाताना व्यक्त होणारी खादाड वृत्ती उचंबळून येत होती. भाडंणं, इतरांची त्यात मध्यस्ती, काही वेळाने भांडणारे भांडखोर बट्टी घेण्याऐवजी एकत्र काढतं असलेले फोटो ( सेल्फी ). कोणी फोटो काढत असेल तर मला नाही घेतलं त्या फोटोत म्हणून होणारे लाडीक रुसवे, असे अनेक बालिश चाळे चालू होते. प्रवासात गाण्याच्या भेंड्या, गाणी भराभर उरकण्याचा अट्टाहास, एकाच गाण्याची दोघांनी एकदम सुरूवात झालीच तरी आपण थांबायचे नाही हा शिरस्ता चालू ठेवत गाणं म्हणत रहायचं व एकाच वेळी दोघांनी थांबून तिसरंच गाणं सुरू करायचं, गाण्यात शब्द आठवले नाही तर नुसताच ताल धरून गाणं निभावून शेवटचं अक्षर समोरच्या ग्रुपवर भिरकावणं. इतकंच काय भरीस भर म्हणजे नव्याने उदयास आलेली रिल बनवण्याची संस्कृती देखील निभावली….
सहल ८ एप्रिलला संध्याकाळी ५.०० वाजता मुंबई सेंट्रलवरून सुटणाऱ्या तेजसमधील प्रवासाने सुरू होणार होती पंरतु निदान तीन महिने अगोदरच रेल्वे बुकिंग करून सहलीच्या तयारीची नांदी झाली होती. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी विमानाने यायचे नक्की झाले. कोणते विमान आर्थिक व वेळेनुसार सोयीस्कर आहे याची शोधाशोध… सुट्टी मिळवण्यासाठी झालेली तगमग. सहलीला येणार असे कळवणारे सुरूवातीला १२-१३ चल जण होते मग सुरू झाली इतरांची मनं वळवण्याचा प्रवास.. प्रत्येकाची बाजू ऐकून त्यावर तोडगा काढत काढत आम्ही तो आकडा १८ पर्यंत नेला. यामध्ये कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे आमची १ मैत्रिण सातासमुद्रापार रहात असून देखील खास सहलीसाठी भारतात आली. होकार देणाऱ्यांपैकी २-३ च्या ॲाफीसमधील कामानिम्मीत रजा रहीत होण्याची शक्यता होती… एकाच्या ॲाफीसमध्ये ॲाडीट होते तर एक पोलीसांत काम करत असल्याने रजेबद्दल अनिश्चितता होती. पण सरतेशेवटी दोघेही येऊ शकले.. येऊ शकला नाही तो फक्त एक मित्र ज्याच्या तब्येतीच्या कारणास्तव. पण म्हणतात ना दाने दाने पे लिखा हैं खानेवाले का नाम तसंच काहीतरी अजून एका मित्राच्या बाबतीत घडलं.. सहल सुरू व्हायच्या केवळ ५-६ दिवस आधी त्याने होकार दिला व तो दुसऱ्याच्या तिकीटांवर प्रवास करून आला.
सहलीला जाणाऱ्या सभासदांचा एक व्हॅटस्ॲप ग्रुप बनवण्यात आला. त्यांवर सुचना, माहिती, चर्चा रंगात येऊ लागल्या होत्या. सहलीची तारीख जसजशी जवळ येतं होती तसतसे ग्रुपमधील चर्चा वेग घेऊ लागली होती व अपेक्षेच्या ओझ्यासोबत भांडण व कुरूबुरी सुरू झाल्या. रोज नवीन वाद. नव्यानेच जोडला गेलेला मित्र हे सर्व बघून जरा बालचळलांच होता, त्याला सहल होणार की नाही? इतपत शंका येऊ लागली. पंरतु आमच्याच एका मित्राने त्याला खात्रीने सांगितलं…” तू लक्ष देऊ नकोस, शांत रहा. काहिही झालं तरी सहल होणारचं” हा जो विश्वास आहे तोच आम्हां सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. भांडायचं आहे तितकं भांडा पण एकसंध रहा हाच आमच्या ग्रुपचा पाया असल्याने ग्रुप आजवर अनेक सहली व गेटटूगेदर करू शकलां आहे. सहलीला जाताना व परतताना सर्वांनी एकाच प्रकारचे टिशर्ट घालायचे ठरले व सुरू झाले नवे वाद… रंग कोणता? मजकूर काय छापायचा? एक ना अनेक. त्यांतच एका मित्राने सांगितले ग्रुपवर एकसारखी टोपीदेखील घ्या. सर्वांनुमते टिशर्टचे रंग ठरले, काही सभासद टिशर्ट खरेदीच्या कामाला लागले, काही डिझाईन काय असावं हे ठरवू लागले. सहलीचा बॅनर का नको? तोही बनवां हा नवा ठराव ताबडतोब पास झाला व आमच्या अजून एका मित्राच्या माथी ती जबाबदारी टाकण्यात आली. ( मुंबई सेंट्रलस्टेशनवर येताना त्याने तो बॅनर हरवलां हा मुद्दा नजरअंदाज करत 🤪 ) आम्ही तोच बॅनर परत बनवून घेतलां. सहलीच्या काही दिवसआधी मैत्रिणीच्या घरी गेटटूगेदरचे आयोजन केले होते सर्वाना सुचना देण्यासाठी की “काय सोबत न्यायचे आहे व काय टाळायचे हे सांगण्यासाठी”. पण चर्चा कमी मैत्रिणीने बनवलेले बटाटेवडे / खिमा खाण्यात सर्व दंग होते. टिशर्टचे वाटप तिच्याच घरी झाले. प्रवासात आमच्या मित्राने जो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे त्याने कॅमेरा आणण्याची जबाबदारी ऊचलली. ( मोठी मोहीम फत्ते ) त्याच्यावरच गो प्रो ( go pro camera is ideal camera for videography ) देखील आण अशी अजून एका मित्राने जबाबदारी टाकली. तो तयार देखील झाला. आता आमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा, गो प्रो कॅमेरा व डझनभर फोटोग्राफर अशी टीम तयार होती.
ट्रेन संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार होती म्हणून आम्ही ४.०० वाजता भेटायचे ठरवले. यामागे उद्देश होता. बॅनर लावू, केक कापू, फोटो काढू पण…… ना बॅनर आला ना दोन मैत्रिणी वेळेत आल्या. ट्रेन सुटायच्या केवळ १२ मिनिटे आधी स्टेशनवर धापा टाकत टाकत कशाबश्या पोहोचणाऱ्या मैत्रिणींकडे बघताना आम्हाला सिमरनची आठवण झाली ( ज्यांना सिमरन माहीत नाही त्यांनी यापुढे कधिही हिंदी सिनेमा बघायच्या फंदात पडू नये ) व तत्परतेने त्या दोघींचे चलचित्र बनवण्यात आले….. भाग सिमरन भाग जीले अपनी जिंदगी
ट्रेनने आधी मुंबईसेट्रल व नंतर बोरिवली स्थानक सोडले व सुरू झाली ट्रेनमधील दंगामस्तीला. गाडीमध्ये बसल्याबसल्या आमच्याकडून *रिल* बनवून घेतले जातं होते व ते बनवतांना होणाऱ्या चुका आम्हांला गडगडाटीहास्य करण्यास प्रवृत्त करीत होते. ट्रेनचा वेग व आमचे हास्य परमोच्च स्थानी पोहोचले होते पण त्याची आम्हास काही पर्वा नव्हती कारण बोगीतील सहप्रवासी देखील आमच्या या गोंधळात सामील झाले होते. टिसी आले, तिकीटं तपासली, गप्पा मारल्या व आमच्यातील एक होऊन आम्ही आणलेल्या खाऊपैकी जिलेबी खातं खातं पुढे निघून गेले लवकरच परत भेटू वाक्य ऊच्चारत. रात्री १०.०० च्या सुमारास “झोपा आता” असा डब्यातून आवाज आला व आम्ही देखील इतरांना त्रास नको या मतावर येतं झोपी गेलो. सकाळी ८.३० च्या सुमारास ट्रेन न्यू दिल्ली स्थानकांत पोहोचली. आम्ही उतरलो व सुरू झाले फोटोसेशन. स्थानकावर फक्त आम्ही होतो व सोबत होती रिकामी ट्रेन.
आज संध्याकाळी मनालीच्या दिशेने जाणारी बस पकडायची होती, तोवर काय करायचे यांवर एका मित्राने आधीच तोडगा काढला होतां लाल किल्ला दर्शन. फ्रेश होण्यासाठी व बॅगा ठेवण्यासाठी ग्रुपमधील एका मित्राच्या सहाय्याने पहाडगंजमधील हॅाटेल बुक केले होते. फ्रेश झालो व निघालो तडक लाल किल्ल्याच्या दिशेने.
लाल किल्ला आतून अतिशय स्वच्छ व प्रचंड व्याप्ती असलेला परिसर.. दिवाण - ए - आम, दिवाण - ए - ख़ास, संग्रहालय करत करत वेळ कसा निघून जातो कळते देखील नाही. या परिसरात आम्ही वेगवेगळ्या आकारत ऊभे राहून फोटो काढत होतो. तू नीट ऊभा रहा, तू जरा वाक, तू समोर बघ… सुचना सुरू झाल्या तसे आजूबाजूची अनोळखी गर्दी देखील आमच्याकडे वळून वळून बघत होती व आमचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करत होते. निदान २५-३० लोकांनी आमचे फोटो काढले असतील व अनेक जण चौकशी करतं होते की तुम्ही सर्व एकत्र कसे काय? शालेय मित्र आहोत हे ऐकल्यावर तर बऱ्याच जणांची बोटं तोंडात जायचीच बाकी होती. त्यांच्या डोळ्यांत आमच्या मैत्रीबद्ल आदरयुक्त कौतुक ओतप्रोत जाणवतं होतां. दुपारचे ३ वाजत आले होते, पोटातील कावळे काव-काव करून केव्हाच गतप्राण झाले होते. घसा कोरडाच नाही तर त्याला भेगा पडायला सुरूवात झाली होती. पण ऊत्साह… बाजूच्याच दुकानांत खावे तर नाही, आम्ही निघालो “पराठे गल्ली”च्या दिशेने. १५-२० मिनिटे तंगडतोड केल्यावर त्या चिंचोळ्या गल्लीत शिरलो. तेलाचा ओतप्रोत वापर बघून माझ्यासह अजून एक मित्र तिकडून सटकलो, अजून एकाचा ऊपवास असल्याने तो देखील बाहेर पडला. बाहेर येऊन थंडगार लस्सीचे २ ग्लास व अल्पोपहार उरकत सर्व मंडळी हॅाटेलवर आलो. फ्रेश होऊन “मजनू का टिला”च्या दिशेने निघालो, यांच ठिकाणावरून मनालीला जाणाऱ्या बऱ्याचश्या बसेस सुटतात. बसस्टॅापवर जी बस येईल ती आपलीच आहे व ती चुकली तर सर्व खेळ खल्लास ही बालपणापासून प्रत्येकाच्या मनांवर झालेले संस्कार इथे कामी येत होते. बस नंबर ठाऊक होतां तरी येणारी प्रत्येक बस आपलीच आहे समजून जो काही गोंधळ घातला जात होतां त्याला तोड नाही. काही वेळाने बस आली व आम्ही आमच्या सर्व बॅगा बसच्या डिकीत भरू लागलो. आमच्या सामानाचा ढिगारा बसून बसचा क्लिनरदेखील म्हणाला “वापिस नहीं आओगे क्या?” बस सुरू झाली श्री गणेशाच्या नावाच्या गजरात…. १ गंमत सांगायची राहिली, बसची वाट बघत असताना बस ड्रायव्हरचा फोन आला की तुम्ही पेट्रोल पंपाऐवजी जरा पुढे चर्चजवळ या. आम्ही जे हाताला सामान लागेल ते घेऊन पुढे निघालो. चर्चच्या आसपास पोहोचत नाही तोच एकाच्या लक्षात आलं की आमची एक मैत्रिण दिसतं नाहीए…. गेली कुठे? म्हणून तो परत मागे फिरलां त्याला सोबत म्हणून अजून एक मित्र परतलां…. पेट्रोलपंपाजवळच लागलेल्या भलत्याच मनालीच्या बसच्या दारांत आमची मैत्रिण उभी….. 😇. तिला सोबत आणल्यावर ती निष्पापपणे म्हणाली… “मी चुकले असेन पण तुम्ही दिसलां नाहीत म्हणून बसमध्ये चढणं टाळलं”. धन्य आमची मैत्रिण ( आणि हो बरं का…. दोनपैकी ही एक सिमरन ).
रात्री धाब्यावर जेवणासाठी बस थांबली पण आमच्यासाठी एका मैत्रिणीने घरूनच पराठे आणले होते, दुसरीने ३-४ प्रकारची लोणची / चटणी… हा हा हा काय तो बेत अगदी १ नंबर, चहा कॅाफी प्यायलो व सुरू झाला उर्वरीत प्रवास. बस पहाटे ५.०० च्या सुमारास ॲाटजवळ पोहोचली. आम्ही ठरल्याप्रमाणे उतरलो, आमच्या दिमतीला हजर असलेली बस व कार हजरच होती. सामान गाड्यांवर चढवले व निघालो…….. तिर्थनला.