09/06/2021
तुर्तुक- लेह लडाख
============
२००९ साली "थ्री इडियट्स" हा चित्रपट येण्याआधी लेह लडाख फार प्रसिद्ध नव्हते. त्यानंतर मात्र लेह लडाख ला पर्यटकांची पहिली पसंती मिळताना दिसत आहे. लेह पासून २०५ किमी वर भारताच्या उत्तरेकडील सीमेजवळील शेवटच्या गावांपैकी एक म्हणजे ' तुर्तुक'. हे गाव १९७१ च्या पाकिस्तानसोबत च्या युद्धा आधी पाकिस्तानात होते. या युद्धामध्ये जी ६ गावं जिंकून भारताने ताबा मिळवला होता त्यातील हे एक गाव.
भौगोलिक दृष्टीने हे गाव पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बाल्टिस्तान मधील आहे. या गावातील लोकांची मुख्य भाषा बाल्टी आहे तर काही लोक लडाखी आणि उर्दू भाषेत बोलतात. तुर्तुक ही भारताची शेवटची चौकी आहे त्यानंतर पाकिस्तान-नियंत्रित गिलगिट-बाल्टिस्तान सुरू होते. तुर्तुक हे सियाचीन ग्लेशियरच्या प्रवेशद्वारा पैकी एक आहे. तुर्तुक येथील विविध जातीचे जर्दाळू जगप्रसिद्ध आहेत .
हे गाव पर्यटकांसाठी २०१० मध्ये खुले झाले. तुर्तुक हे पुरातन 'सिल्क रूट' वरचे मुख्य केंद्र होते. हा रस्ता मध्य आशिया आणि तिबेट चीन मधील व्यापारी वाहतुकीसाठी मुख्यत्वे वापरला जात असे. हे गाव आणि तेथील लोकांची जीवनशैली आपल्यासाठी नवलाईची आहे. येथील मुख्य समाज हा इस्लामिक असून सुद्धा बहुतांश लोक हे शुद्ध शाकाहारी आहेत. हे लोक इराणी दिनदर्शिका वापरतात. २१ मार्च ला नौरोज फेस्टिवल येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतात राहून इराणी संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल तर या उत्सवादरम्यान येथे भेट देणे योग्य राहील. या सणाच्या आधी आणि नंतर ५/६ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक पदार्थांची रेलचेल येथे असते.
या भागातील लोक गोल्फ आणि पोलो हे खेळ ८०० वर्षांपासून पारंपरिक खेळ म्हणून खेळतात. या गावाचे दोन भाग आहेत; जुने तुर्तुक आणि नवीन तुर्तुक. जुन्या तुर्तुक मध्ये बाल्टिस्तान च्या राजाचा राजवाडा आहे. बाल्टिस्तान च्या स्त्रिया जगात सगळ्यात सुंदर असतात असे म्हणले जाते. त्या इतक्या सुंदर असतात की त्यांच्या वयाचा अंदाज सहजासहजी लावता येत नाही. उंच भौगोलिक भागात घेता येणारे ' बकव्हीट ' हे पीक भारतात फक्त याच भागात पिकते. हे धान्य उच्च कॅलरीयुक्त आहे. साधारण लेह भागात एकाच हंगामात पीक घेतले जाते. पण या भागाचे वातावरण असे आहे की येथे दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. येथे जे पिकते ते पूर्णतः नैसर्गिक खतांचा वापर करून पिकवले जाते, रासायनिक खते वापरण्यावर पूर्णतः बंदी आहे.
या भागातील उत्पन्नाचे आणखी एक साधन म्हणजे जर्दाळू. उंच जागांवर वर मिळणारे हे एक उच्च लोहाचे प्रमाण असेलेले फळ या भागात मोठ्या प्रमाणात पिकते. सात प्रकारचे जर्दाळू या भागात पिकतात." ऍप्रिकॉट ब्लॉसम टूर" हे एक पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे. जसा जपान मध्ये 'चेरी ब्लॉसम' असतो तसाच इकडे "एप्रिकॉट ब्लॉसम" पण पाहता येतो. साधारणतः एप्रिलचा मध्य ते मे च्या दरम्यान वसंत ऋतू ची चाहूल लागते. त्याच दरम्यान जर्दाळूच्या झाडांना लाल , पांढरे, गुलाबी रंगाची फुले आणि कळ्या उमलण्याचा काळ असतो. निसर्गाची अशी रंगांची उधळण डोळ्यांना विलक्षण आनंद देऊन जाते.
या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक घरात एक तरी गाढव पाळले जाते. या गाढवांना, ते एक उपजीविकेचे साधन असल्यामुळे, यांच्या कडे विशेष महत्व आहे. साधारण हिवाळा सुरू होण्याआधी सियाचीन ला भारतीय सैन्याला पूर्ण ऋतुभर पुरेल एवढे सामान घेऊन जाण्यासाठी या गाढवांचा उपयोग होतो. त्या ठराविक काळात ही लोक वर्षभराची कमाई करून घेतात. प्रत्येक घरात एक गाढव असल्या कारणाने गाढवांचे ओरडणे सतत कानावर पडत असते. याची तक्रार मात्र पर्यटकांनी केली तर स्थानिकांना आवडत नाही, कारण ते त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे असे ते मानतात.
पाकिस्तान ची सीमा अगदी ७/८ किमी वर असल्या कारणाने येथे सैन्याचा राबता असतो. कसल्याही प्रकारचे व्यावसायिक पक्के बांधकाम करण्याची येथे परवानगी नसल्याने येथे हॉटेल ची व्यवस्था नाही. परंतु स्थानिक लोकांच्या मदतीने पूर्णतः नैसर्गिक अशा 'इको फ्रेंडली होम स्टे' ची व्यवस्था काही वर्षांपासून येथे चालू झाली आहे.
असे हे आगळेवेगळे, सर्वार्थाने महत्वाचे असलेले हटके गाव, जे सर्व भारतीयांचा अभिमानाचे प्रतीक आहे, त्या गावाला नक्की भेट द्या .
कसे पोहचाल
=========
√ विमानाने लेह विमानतळ २०५ किमी वर आहे.
√ रस्ता मार्गे मनाली किंवा श्रीनगर मार्गे लेह ला जाऊन तेथून टॅक्सी ने जाऊ शकतात.
कुठे राहाल
=======
√ तुर्तुक येथे कॅम्प आहेत तिथे राहता येते.
साधारण हवामान
==============
√मे ते सप्टेंबर ८ डिग्री सेल्सियस ते २० डिग्री सेल्सियस.
√ ऑक्टोबर ते डिसेंबर -३ डिग्री सेल्सियस ते ९ डिग्री सेल्सियस.
√ जानेवारी ते मार्च -१० ते ५ डिग्री सेल्सियस.
संकलन:
अमित कुलकर्णी.