26/06/2024
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!
१९१० च्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडी येथे आपला उद्योग उभा केला. पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडण्याचा बाका प्रसंग ओढवला. कारण उद्योगासाठी कच्चापक्का माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते. कच्च्या मालाची चणचण भासू लागली. यावर उपाय शोधताना शंकरराव किर्लोस्करांना एक कल्पना सुचली. ती त्यांनी आपले स्नेही, टेक्निकल स्कूलचे सुपरिटेंडंट काटे यांना सांगितली. बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजण गेले, त्यांनाही कल्पना पटली आणि त्यांनी शाहू छत्रपतींकडे येण्याचे कबूल केले. तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले. त्यांनी आपली अडचण महाराजांना सांगितली.
मग यात आमची काय मदत हवी आहे, असे शाहूंनी विचारले.त्यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले, ”महाराज, संस्थानातील किल्ल्यांवर खूप लोखंडी तोफा, चिलखते आदी साठलेले आहे. ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही तगतील” महाराजांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले, मजूर आणि शेतकर्यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे. नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या
नांगरांसाठी अवश्य घ्या. त्याची संस्थानाला दमडीही नको. फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पाहा! संस्थानाचा अभिमान, स्वाभिमान, पुरातन काळापासूनच्या वस्तू असलं काहीही मनात न आणता लोकराजाने लोकांना उदारपणे तोफा दिल्या. तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडे जाणेच जणू होते!