06/01/2021
शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्यांनी प्रजेची अमाप लूट केली. स्वराज्याची नासधूस केली. शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी स्वतः ३ एप्रिल १६६३ रोजी लाल महालात घुसून शाहिस्तेखानवर हल्ला केला. शिवरायांच्या आक्रमणाने भयभीत झालेला शाहिस्तेखान तीन दिवसात आपल्या फौजेसह पुणे सोडून पाय लावून पाळला. शाहिस्तेखानाच्या या ३ वर्षांच्या काळात त्याने स्वराजयाची अपरिमित हानी केली.
स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहणे आवश्यक होते. मार्ग सापडत नव्हता. राजांनी बहिर्जी नाईकांवर स्वराज्यासाठी आर्थिक स्त्रोत शोधण्याची जबाबदारी दिली. आणि नाईकांनी हेरली ती औरंगजेबाची महत्त्वाची बाजारपेठ असलेली सुरतच.
बहिर्जी नाईकांचे हेर सुरतेत पोहचले आणि त्यांनी सुरतेची इत्तंबुत माहिती महाराजांना दिली. खलबते झाली आणि महाराज सुरतेवर चालून गेले. सुरतेचा सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवून " इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." असा संदेश पाठवला. पण इनायतखान घाबरून किल्ल्यात जाऊन लपून बसला. महाराजांनी मग आपला मोर्चा सुरतेवर वळवला. मावळ्यांनी सुरतेतील अनेक बलाढ्य व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केला. गरीब, लहान मुले, स्त्रिया यांना कोणताही अपाय होता कामा नये असे आदेश फौजेला दिले होते.
मावळ्यांनी शहराची लूट सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूल दप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. अनेक मोठमोठ्या सावकारांचे वाडे काबीज करून सोने, चांदी, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्ने. नाणी, मोहरा, पुतळ्या, इभ्रम्या, सतराम्या, असप्या, होन, नाणे नाना जातींचे. मोल्यवान कापड, भांडे, तांब्याचे वरकड असे अमाप धन हाती लागले. सुरत बेसुरत झाली.
शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करून मोगलांच्या इतर ठाण्यावरून कुमक येण्याआधी सुरतेतून पसारा होणे अत्यावश्यक होते. अखेर गोळा केलेला खजिना घेऊन १० जानेवारी रोजी महाराजांनी सुरततेतून काढता पाय घेतला. मागावर असलेल्या मोगल तुकड्यांना झुकांड्या देत महाराज राजगडाकडे आले.
सुरतेवर केलेला हल्ला ही लूट नव्हती तर, स्वराज्याचे मुघलांनी केलेले नुकसान भरून काढण्यासाठी ची एक परतफेड होती. खरं सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण शिवरायांनी सुरतेतील गोरगरीब जनतेला, धर्मस्थळांना अजिबात त्रास दिला नाही. उलट जे मुजोर, मस्तवाल सावकार होते, ज्यांनी गोरगरिबांवर अन्याय करून संपत्ती लुबदली होती ती संपत्ती त्या मजग्या सावकारांकडून वसूल केली. तीसुध्दा त्या सावकारांना अगोदर इशारवजा पत्रातून कळवून. महाराजांनी त्या संपत्तीचा उपयोग स्वराज्यासाठी केला. सुरतेच्या मोहिमेत मिळालेली सगळी संपत्ती त्यांनी सिंधुदुर्गच्या संपूर्ण बांधकामासाठी वापरली.
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩