26/07/2018
अगदि मनातल...कोणीतरी ट्रेकर #संभाजी_धनवे यांच्या शब्दातून..
ट्रेकर कुणा म्हणू मी!
काल एका ठिकाणी वाचलं,नविन पावसात बेडूक निघावेत तसे नवीन ट्रेकर पावसात फिरायला निघतात, आणि डोक्यात एकदम विचार सुरु झाले खरंच त्यांना ट्रेकर म्हणावं का ?
खूप वेळा प्रसारमाध्यमं फिरायला जाणाऱ्या सगळ्यांना ट्रेकर म्हणतात. आता यांना खरा ट्रेकर कोण समजून सांगणार?
खरंच, अशा लोकांना ट्रेकर म्हटलं तर काय वाटत असेल, आपलं संपूर्ण आयुष्य या कामासाठी व्यतीत केलेल्या लोकांना? काय वाटत असेल आज जे हयात नाहीत त्या लोकांच्या आत्म्यांना? त्यांना किती यातना होत असतील. ते फक्त आणि फक्त एक खरा ट्रेकरच जाणू आणि अनुभवू शकतो.
जसं पंढरपूर ची वारी म्हटलं कि वारकरी जीव कि प्राण एक करून त्या वारीत, त्या दैवी कामात सहभागी होऊन आपलं तन मन धन समर्पित करत असतो. त्यावेळी तो फक्त वारकरी असतो. ना मालक ना कामगार, ना बाप ना मुलगा , ना गरीब ना श्रीमंत. तो असतो फक्त नि फक्त एक वारकरी. अशी हि वारी प्रत्येक वारकरी जगत असतो नि अनुभवत असतो . पण ट्रेकर च्या बाबतीत हि असं असू शकतं हे फक्त एका खऱ्या ट्रेकरलाच समजू शकतं. खरा ट्रेकर हा देखील एक वारकरीच असतो . पण वर्षातून अनेक वेळा तो हि वारी अनुभवत असतो नि जगत असतो .
पाऊलखुणा व्यतिरिक्त काही मागे न उरो , झाडाच्या पानालाही इजा न होवो याची काळजी करणारा. निसर्गाच्या सान्निध्यात आपला तन मन धन विसरणारा हा वारकरी कुठं? नि दारू पिऊन मदोन्मत्त हत्ती सारखे हुंदडणारे पर्यटक कुठं? का यांना सगळे एका पंक्तीला बसवायचा प्रयत्न करत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं असं कुठंतरी वाटलं म्हणून लिहावं वाटलं इतकंच.
"आई मी ट्रेकिंग ला जाणार आहे." एवढंस सांगून देखील लगेच हो पण नीट जा! म्हणणारी आई इतर वेळी कुठं जाऊ का? म्हणल्यावर किती आढेवेढे घेऊन होकार देते. हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे. मुलगा ट्रेकिंग ला जातो उनाडक्या करत हिंडत नाही यात बापाला अभिमान असतो . मित्रांमध्ये कायम याच्या ट्रेकिंग गप्पा प्रिय.
परवा एक मित्र सहज बोलता बोलता म्हणाला. बायकोला ट्रेकला नेलं अाता तिला कमीतकमी असं वाटणार नाही की नवरा उगीचच नको त्यांच्यासोबत हिंडत नाही. ट्रेकर विषयी एक आदरभाव आहे मनात, आजतरी सगळीकडे पण…हे चित्र बदलू नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्यांना ट्रेकर म्हणणं कूठंतरी थांबलं पाहीजे.
या सगळ्या दुर्घटना, ट्रेकर दरीत कोसळला , वाहून गेला , अडकून बसला असं म्हणणाऱ्यांना हे कोण सांगणार कि बाबा रे ही जात वेगळी आहे. ते ट्रेकर्स असूच शकत नाही (अपवाद सोडता). बरं पण मग यांना वाचवायला कोण येतात? तर, ट्रेकर!! कारण, सह्याद्रीत मोकळेपणाने फिरू शकतात फक्त वाघ अाणि मावळेच. हे जीवाचं रान करून मदत करणारे वाघ कुठं, नि सेल्फी च्या मोहात पोरींपूढं शायनिंग मारून कपाळमोक्ष करून घेणारे थिल्लर हिरो कुठं? काहीतरी साम्य अाहे का?
अगदी साधं उदाहरण म्हणजे अापल्या खर्चात काटकसर करून ट्रेकींगसाठी चांगलं पुस्तक अथवा उपकरण घ्यायचा विचार करणारे ट्रेकर्स कुठं, नि तोच वरखर्च दारुपार्ट्यांमध्ये उधळून मौजमजा करत फिरणारे कुठं? यात काहीच फरक नसावा???
पक्षांचा,वाहत्या पाण्याचा,बेधूंद वार्याचा,रात्रीच्या एकांताचा मंजूळ अावाज अनूभवता यावा म्हणून भटकणारा सौंदर्यवेडा कुठं, नि कर्कश अावाजाने या सगळ्या शांततेचा भंग करून बेधूंद होऊन तरूणाईच्या गर्दीत हरवलेला बाबूराव कुठं? काहीतरी ताळमेळ अाहे का?
निसर्गाला अोरबाडायला जाल तर, तो कधी तूमचा काळ बनेल त्याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. पण तेच जर त्याला सांभाळत, जपत त्याच्या सोबतीची सवय करून घ्याल तर, त्याच्यासारखा सुंदर, परोपकारी मित्र तुम्हाला शोधून सापडणार नाही.