22/09/2023
आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा,अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. रायगड जिल्ह्यातील सुधागडाच्या पायथ्याशी पाली या गावात हे सुंदर मंदिर आहे. देवाने येथे येऊन राहण्याची आख्यायिका भक्त आणि देव यांतील नाते सांगणारी आहे.
या आख्यायिकेनुसार, पूर्वी पाली हे गाव 'पल्लीपूर' या नावाने ओळखले जात होते. येथे कल्याण नावाचा व्यापारी राहत होता. त्याचा मुलगा बल्लाळ हा गणेशभक्त होता. तो रोज आपल्या बरोबरीच्या मुलांना घेऊन जवळच असलेल्या जंगलात जात असे. तेथे तो एका शिळेचे गणेशरूप म्हणून पूजन करीत असे. बल्लाळाने दिवसरात्र गणेशाच्या भक्तीत तल्लीन राहणे कल्याण यांना मान्य नव्हते. एकदा त्यांनी बल्लाळाला बेदम मारले आणि झाडाला बांधून निघून गेले. शरीरावर जखमा झाल्या असल्या, तरी बल्लाळाने गणेशाचे नाव घेणे सोडले नाही. त्याची भक्ती पाहून गणेश विप्र रूपात तेथे आले. त्यांनी बल्लाळाला सोडविले. बल्लाळाने आपल्या आराध्याला ओळखले आणि भक्तांचे दु:ख दूर करण्यासाठी तेथेच राहण्याची विनंती केली. गणेशानेही ती विनंती मान्य करून अंशरूपाने तेथे वास्तव्य केले.
पालीत बल्लाळेश्वराचे सुबक दगडी मंदिर आहे. या मंदिराआधी धुंडीविनायकाचे मंदिर लागते. बल्लाळाने पूजन केलेली शिळा धुंडीविनायक म्हणून ओळखली जाते. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी धुंडीविनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. बल्लाळेश्वराचे मंदिर पूर्वी लाकडी होते. पेशवाईच्या कालखंडात त्याचा जीर्णोद्धार झाला आणि आज दिसणारे दगडी मंदिर उभे राहिले. मंदिराच्या दर्शनी भागात मोठी घंटा आहे. ही घंटा वसईच्या विजयानंतर चिमाजीअप्पा यांनी, विजयाचे चिन्ह म्हणून अर्पण केली आहे.
बल्लाळेश्वराची मूर्ती दगडी सिंहासनावर स्थित आहे. साधारण तीन फूट उंच असलेली ही मूर्ती रुंद आहे. मागच्या बाजूला चांदीच्या प्रभावळीवर रिद्धी आणि सिद्धी उभ्या आहेत. अतिशय प्रसन्न अशा या पूर्वाभिमुख मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आणि बेंबीत हिरे जडविले आहेत. गणेशाची सोंड डाव्या बाजूला झुकलेली आहे. मूर्तीसमोर, गर्भगृहाबाहेर हाती मोदक घेतलेला उंदीर आहे.
भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवसांचा उत्सव असतो. विनायकी आणि संकष्टी चतुर्थीला देवाची पालखी निघते. चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दहीकाल्याचा नैवेद्य असतो. येथे गणेश स्वत: येऊन नैवेद्य ग्रहण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.