15/02/2019
सैनिकहो, नका रक्त सांडू..
सैनिकहो, नका रक्त सांडू आमच्यासाठी. आमची ती लायकी नाही. खरं तर जगायला पाहिजे तुम्ही आणि मारलं पाहिजे आम्हाला. कारण आम्ही मुळात मेलेलोच आहोत. क्षात्रतेज उरलंय ते फक्त तुमच्यात आणि तुमच्यातच. आमच्याकडे आहेत फक्त शब्दांच्या फ़ैरी आणि विखारांच्या तलवारी.
तुमच्या बलिदानामुळे आज आम्ही गळे काढू. पण अगदी उद्यासुद्धा एक देश म्हणून तुमच्या पाठीशी उभे ठाकणार नाही.
आम्हाला महत्वाचा आहे तो आमचा पक्ष, आमची खुर्ची, आमचा पैसा आणि आमची पत. देशबिश सगळं झूट आहे हो. नका करू आमच्यासाठी काही.
निवडणुका तोंडावर आल्यामुळे उद्याही आम्ही आधी आमचा फायदा पाहू.
खरंतर पाकिस्तान दहशतवाद जोपासण्यासाठी इतका पैसा कशाला खर्च करतोय.आमच्यातच देश तोडणारे दहशतवादी निपजलेत,पाकिस्तानने दहशतवाद पोसला नाही तरी आम्ही जातपात, धर्माच्या नावाखाली स्वतःचाच देश मोडतो आहोत की. फोडा आणि झोडा ही नीती आता कोणा इंग्रजांनी वापरण्याची गरज नाही आम्हीच ती आत्मसात केली आहे.
काय म्हणता?? ..तुमच्या बांधवांच्या हौतात्म्याचा तुम्हीच सूड घेणार??
तुम्ही तुमचं कर्तव्य करत रहाणार! आम्ही कसेही वागलो तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुमच्या कानावर येतात त्या फक्त रणर्जना. ऐकू येतो तो तुमच्याच टापांचा खडखडाट.
सलाम तुमच्या देशप्रेमाला, धाडसाला, वीरत्वाला आणि हौतात्म्यालाही !
तुम्ही पूर्ण सक्षम आहात म्हणूनच आम्ही इथे निर्धास्त जगतो आहोत. आज एक वचन देतो, आम्ही तुमच्या पाठीशी एकदिलाने उभे राहू. आम्ही जितके असू तितके! आणि जे नाहीत तुमच्यामागे त्यांच्या विरुद्ध आम्ही जंग छेडू!...