15/01/2022
आज पौषाची शुक्ल त्रयोदशी ,मृग नक्षत्र! आज पुन्हा एकदा तारळीचा तीर धन्य होणार ! मणीमल्लाचा शत्रू ,मार्तंड भैरव असा परम प्रतापी खड्ग धारी खंडेराया आज म्हाळसाकांत होणार. !
शंकराच्या या अवताराचं कौतुकच निराळं. धर्मपुत्र सप्तर्षींवर आलेलं मणी मल्लाच संकट निवारण करायला देवाला नवीन रुप धारण करायचं होतं म्हणून देवानं हे कोटी मदनाला लाजवेल असं देखणं रुप घेतलं चंद्राचा झाला घोडा, जटा ऐवजी किरीट, हरिण वाघाच्या चामड्याच्या वस्त्राऐवजी झळझळीत पितांबर, मुंडमाला रूद्राक्षा ऐवजी सुवर्णाचे रत्न जडित अलंकार आणि भस्मा ऐवजी भंडाऱ्याचं लेणं!
सागर मंथना वेळी जगन्मोहीनीच्या रूपाला भुललेल्या जगदिश्वर शंकरानं जगन्नाथ नारायणाला गळ घातली आणि त्यांच तेच मोहीनीच रूप घेऊन पार्वती नेवासे नगरात तिमशेट वाण्याघरी म्हाळसा म्हणून अवतरली. तीच्या ओढीनं देव राजापुरात आले. म्हाळसेशी विवाह करून विंध्यवासिनी (ईंजाई) च्या परिसरात शंभू घळीत वसले.
पुढे बराच काळ गेला कुणी पालाई नावाची गवळण भोळ्या भक्तीन त्या पर्वतावर राजेलिंगाची अर्चना करू लागली. काया थकली तस तिनं म्हाळसा मल्लारीलाच साकडं घातलं. भोळ्या भक्ताचे कैवारी पालाई ला पावले.गाईच्या दूधाची खूण सांगून तारळीच्या तिरी जोडलिंगाच्या रूपात प्रगटले. तेव्हापासून ती नगरी पालाईची झाली. तीच खंडेरायाची पाली. आजही त्या पालाईचा मान देवाच्या दारा शेजारी आहे.
दरवर्षी प्रमाणे आज देखिल दुपारी नेहमीप्रमाणे देवराज दादा पाटिल देवाला आणायला मंदिरात जातील. देव आज जगत्पिता नाही तर नवरदेव आहे. दादा त्या कवळ्या नवरदेवाला पोटाशी धरून लग्नाला निघतील . गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही रथ नाही .नाचणा-या सासनकाठ्या नसतील तरी नेहमी इतकी नसली तरी थोड्या तरी भंडा-याच्या उधळणीत काळगंगा तारळी नदीच पात्र ओलांडून देव पैलतीरी बोहल्यावर पोचतील एव्हाना सूर्यास्त व्हायला आला असेल. देवाची मूर्ती पूजा करून सजवली जाईल. अक्षता वाटल्या जातील मंगलाष्टकांच्या सुरावटीत त्यांची उधळण होईल म्हाळसाआक्कांच्या वतीन (हो आम्हा कोल्हापूरकरांची म्हाळसा बहीणच मानतात कारण करवीर निवासिनी आदिमाता म्हणून ही आमची आक्काच ) कोल्हापूरकर देवसेवक देवाला माळ घालतात आणि भोळा सदानंद म्हाळसापती होतो आणि देव देवीसह बोहल्यावर दर्शन द्यायला बसतील. या लग्न सभेचा रिवाजच निराळा सगळीकडे लोक नवरा नवरी ला आहेर करतात इथं नवरानवरीच ज्याला जे हवं देऊन तृप्त करतात. रात्रभर उजळलेल्या दिवटीच्या उजेडात वाघ्या मुरळी नं गायलेलं कौतुक ऐकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडला की मानकरी पालखी घेऊन न्यायला येतात गावातून मिरवून तारळीच्या पाण्यात मनसोक्त खेळून देव मंदिरात येतात. कधी काळी पाहीलेला हा आनंद सोहळा कित्येक शतक असाच रंगतोय बदलतात ती तो अनुभव घेणारी मनं ! पण यंदा मात्र हा सोहळा होईल तो भक्तांच्या उपस्थिती शिवाय . भंडाऱ्याची उधळण नाही सासनकाठ्यांचा मेळा वऱ्हाडी गाडे काही नाही, तशाही परिस्थितीत देवाचं लग्न लागेल साक्षीला असतील ते मावळतीचा सूर्य आणि उगवतीचा चंद्र जणू दोघांच्या रूपानं सगळं देवता मंडळ अक्षतांचा वर्षाव करेल स्थानिक मानकरी आपापली सेवा देऊन धन्य होतील. असा एकाकी विवाहाचा सोहळा पुन्हा कधी न होवो.भक्त वत्सल मल्हारी असा विना भक्तांचा कधी न राहो ही संकटाची घडी लवकर टळो आणि हा मनमल्हार म्हाळसा रमण तुम्हा आम्हाला सुखकर होवो हीच या विवाह मंडपाच्या दारी विनवणी
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तिकः