09/04/2023
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.