21/03/2015
चैत्र शु. प्रतिपदा. नववर्षप्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा नवप्रभात ही नववर्षाची नवतेजाच्या आगमनाची, नव्या आशा ,नवे स्वप्न मनात धुंदी नवकल्पनांची ....शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. अखंड भारतात या दिवसाला असाधारण मह्त्व आहे. गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला आहे. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यात ब्रम्हपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. तो असा.....
चैत्रे मासि जगद ब्रम्हा ससर्ज प्रथमेहनि
शुक्लपक्षे समग्रं तु तदा सु्र्योदये सति
प्रवर्तयांमास तथा कालस्य गणनामपि
तत्र कार्या महाशान्ति:सर्व्कल्मषनाशिनी
सर्वोत्पातप्रशमिनी कलिदु:स्वप्ननाशिनी "
याचा अर्थ असा, ब्रम्हदेवाने चैत्र शु. प्रतिपदेच्या सकाळी समस्त जग निर्माण करुन कालगणनाही सुरु केली. त्या तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलिकृत दु:स्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी. ब्रम्हदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर, इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व विष्णूची पूजा करावी. यविष्ठ नावाच्या अग्निमध्ये हवन करावे. ब्राम्हणभोजन घालावे व आप्तेष्टांना देणग्या द्याव्या.ज्या वारी वर्ष - प्रतिपदा येते त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी, असे आणखी एक विधान भविष्य पुराणात सांगितले आहे. या दिवसाचा लौकिक विधी असा --- घरातली सर्व माणसे तैलाभ्यंग करुन उष्णोदकाने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाचे टाळे व फुलाची माळ बांधून दारात तो ध्वज अर्थात गुढी उभारतात. गुढी उभारण्याचा पाडवा म्हणूनच याला "गुढीपाडवा" असे म्हणतात.॰सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. मराठी नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो....
गुलाबी पहाट सोनेरी प्रकाश नव्या स्वप्नांची नवी लाट !!!
"नवे प्रयत्न ,नवा विश्वास ,नव्या यशासाठी नवी सुरवात" ........
येणारे नवीन "मराठी "वर्ष आपल्याला यशाचे ,सुखाचे ,समृद्धीचे जाओ..... ह्याच गुढी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा ....!!!..