06/10/2020
आहे ना सुंदर आपला परिसर?
पण हे सौंदर्य , हे पावित्र्य असे अजुन किती दिवस टिकेल कुणाला माहित. या वर्षी लॉकडाऊन व सार्वजनिक ठिकाणी पर्यटनास बंदी असल्याने आपल्या भागात विशेषतः मढेघाट, तोरणा किल्ला, राजगड किल्ला इत्यादी ठिकाणी प्लास्टिकचा होणारा कचरा अगदी नाही म्हणावा इतका कमी झाला आहे. यामुळे सर्वत्र निसर्गाचे रंग अगदी आहे तसेच दिसतात. नाहीतर रस्त्याच्या कडेने प्लास्टिकचे अक्षरशः ढिग पडलेले पहायला मिळतात.
पर्यटन बंद असल्याने अनेकांना सामान्य किरकोळ चहा, भजी, मका विकुन मिळणारा उत्पन्नाचा आधार देखील यावर्षी मिळाला नाही. हे देखील तितकेच खरे.
पर्यटनातुन रोजगार निर्मिती होते खरीच पण हेच पर्यटन निसर्गाच्या मुळावर देखील घाव घालीत असते.
विक्रीसाठी व वापरासाठी अनेक वस्तु, उत्पादने शहरातुन आणल्या जातात. या वस्तुंसोबत त्या त्या वस्तुचे प्लास्टीक पॅकींग देखील येतेच. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,चिप्स ची रिकामी पाकिटे, बिस्किट पुड्यांची रिकामी पाकिटे, मसाल्याची रिकामी पाकीटे, व अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्यांचा वापर तर होतो पण त्यामुळे निर्माण होणा-या कचरा मात्र आपल्याइथेच राहतो. हा कचरा मुख्य करुन प्लास्टिक व काचेच्या बाटल्या असतात. अनेक दुकानदार हा कचरा एकतर दुकानाच्या मागे किंवा रस्त्याच्या कडेला कुठेतरी टाकतात.
आपल्या तालुक्यातील रिसॉर्ट्स देखील कचरा निर्मितीमध्ये आघाडीवर आहेत. शेकडोंच्या संख्येने मिनरल पाण्याच्या बाटल्या रिसॉर्ट्स मध्ये येतात विक्रीसाठी अथवा वापरासाठी हे आपण पाहतो.
पण काय वापरानंतर निर्माण झालेला कचरा कोणीही हॉटेलचालक अथवा रिसॉर्ट्सचालक पुन्हा शहरात घेऊन जाताना कुणी पाहिलाय का?
वस्तु शहरातुन येतात पर्यायाने कचरा देखील शहरातुनच येत असतो. या वस्तु व उत्पादनांमुळे शहरांतील उद्योग चालतात, आर्थिक व्यवहार होतात. या व्यवहारातुन अनेकांची पोटे भरतात. अनेक जण नफा कमावितात. मग या विक्रीच्या साखळीतील प्रत्येकाचीच ही जबाबदारी नाहिये का की आपल्यामुळे निर्माण झालेला कचरा पुन्हा शहरात पोहोचवला जावा. शहरांत कचरा व्यवस्थापनांच्य मोठमोठ्या आस्थापना आहेत, व्यवस्था आहेत. ग्रामीण भागात तसे नाहीये. त्यामुळे निर्माण झालेला कचरा पुन्हा शहरात पोहोचवणे सर्वच दॄष्ट्या योग्य व तार्किक आहे.
काय आपल्या तालुक्यातील सुज्ञ लोक, तरुण, नेते, शिक्षक, सरकारी अधिकारी, सरपंचम ग्रामपंचायत सदस्य, पाटील अशा सर्वांनी हॉटेल चालक, दुकानदार, रिसॉर्ट्स चालक यांना कच-याच्या या समस्येबाबत जागे केले जाऊ शकते का?
असाच कचरा होत राहिला, विद्रुपीकरण होत राहिले, दुर्गंधी वाढत राहिली तर मित्रांनो आपल्या तालुक्यांत पर्यटनासाठी येणा-यांची संख्या कमी होत जाईल अथवा कचरा व घाणीचे साम्राज्य असेल तिथे कोणताही सुज्ञ पर्यटक येणारच नाही, येतील ते केवळ हुल्लडबाजी करणारे व कच-यात अजुन भर टाकणारे दारुबाज लोक. व अशा लोकांकडुन पर्यटनास चालना तरी कशी मिळणार?
गावागावातील लोकांनी कचरा निर्माण करणा-यावर कच-याची विल्हेवाट नीट करण्यासाठी नैतिक दबाव आणला पाहिजे.
असे आपण करु शकलो तर आणि तरच वरील फोटॉ मध्ये दिसत आहे तसे
निसर्ग सौंदर्य अबाधित राहिल.
फोटो स्थळ - पासली बालवड रस्ता.
पोस्ट अधिकाधिक शेयर, कॉपीपेस्ट करा,व्हॉट्सॲप ग्रुप्स , हॉटेल व्यावसायिक, दुकानदार अशा आपल्या माहितीतील जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
हेमंत ववले,
निसर्गशाळा