05/10/2021
।। श्री विष्णु ।। कोळिसरे, जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र
प्रस्तुत श्री विष्णुची मूर्ती कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या प्रसिध्द गणेशाचे तीर्थक्षेत्रापासून १८ कि.मी. अंतरावरील कोळिसरे गावात आहे. मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणातील आहे. या मूर्तीची उंची ५ फूट ५ इंच असून २७ इंच इतकी रुंदी असावी. आख्यायिका अशी आहे कि कोल्हापूर येथील रंकाळा तलावात मध्ययुगात ही मूर्ती पाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने ठेवली गेली. कोणा एका सज्जनाच्या स्वप्नात येऊन तेथून दुसरीकडे स्थापित करण्याकरिता स्वप्नात आज्ञा केल्याप्रमाणे रंकाळ्याहून कोकणात नेताना कोळिसरे या ठिकाणी स्थापित झाली. अशी आख्यायिका आहे.
मूर्तीची रचना : अखंड शिळेतून ही मूर्ती त्रीमित वाटावी अशी खोदकाम करण्यात आली आहे. या मूर्तीची संपूर्ण कलाकुसर कोरुन झाल्यानंतर ती गुळगुळीत करण्यात आली. या गुळगुळीत प्रक्रियेमुळे त्या मूर्तीची चकाकी वाढून सौंदर्यात भर पडल्याने अत्यंत विलोभनीय मूर्ती वाटते. या मूर्तीच्या रचनेवरुन ही मूर्ती शिलाहारकालीन असावी. कोल्हापूर येथील वास्तू शिल्पांशी खूप साधर्म्य दिसते. शिलाहार घराणे शके ८६२ ते ११३४ ज्ञात इतिहास लेखावरुन मिळते. (मिराशी वा.वि. १९७४ पान नं.) हे घराणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक व राजकिय इतिहासात भर घालणारे घराणे असून प्रमुख तीन घराण्यात कोल्हापूरचे शिलाहार व उत्तर कोकणातील शिलाहार व दक्षिण कोकणातील शिलाहार घराणे अत्यंत प्रभावी होते. जसे बांधीव मंदिरांची सुरवात गुप्तकाळापासून (४ थे ते ६ वे शतक) उत्तर भारतात पाहावयास मिळते तसे महाराष्ट्रातील बांधीव मंदिराचा पाया शिलाहार घराण्यांच्या काळात घातला असे म्हटल्यास वावगे ठरु नये. श्री विष्णूची मूर्ती वर म्हटल्याप्रमाणे शिलाहार काळातील असावयाचे कारण मूर्तीची-शरिराची रचना, आयुधाची रचना, अलंकाराची रेलचेल, मूर्ती शास्त्राचा आधार व तांत्रिक कार्य पध्दती होय. मूर्तीतील भावमुद्रा, रेखीव आखणी, सौंदर्याने परिपूर्णत्वेस पोहचल्याची साक्ष या मूर्तीतून पाहावयास मिळते. विष्णूची ही सहपरिवार मूर्ती असून भव्यता दर्शविण्याकरिता त्या त्या देवतेचे कार्य व क्षमता मूर्तीच्या उंचीवरुन व्यक्त केली आहे. संकीर्ण प्रकारातील विष्णूची मूर्ती वाटावी अशी समपद स्थानक चतुर्भुज मूर्ती होय. ही मूर्ती एका रथवाहिकेवर (पीठावर-पाटावर) उभी आहे. परंतु पायाखाली कमळाची रचना नाही. प्रलंबबाहु, सडपातळ शरिररचना उत्तम प्रकारातील असून पाठशीळेतः स्तंभावर मकरतोरण (शृंगग्रास) किर्तीमुखासह कोरलेले आहे. विष्णू मूर्तीच्या १/३ आकारात डाव्या हाताखाली लक्ष्मी तर उजव्या हाताखाली गरुड (लांच्छन) वाहन असून या मूर्तीच्या पेक्षा उंचीच्या चक्रपुरुष व शंखपुरुषाचे (आयुध पुरुषांची) मूर्ती कोरलेल्या आहे. (जोशी नि.पु. १९७९ पान २) चतुर्भुज मूर्ती उजव्या हातात पद्म (अर्ध उमललेले). उजव्या वरील हातात दंडयुक्त शंख, डाव्या वरील हातात दंडयुक्त चक्र व डाव्या खालच्या हातात षटकोनी दंड, लंबगोलाकार गदा अशी 'पशंचग' आयुध क्रम केशवादी प्रकारातील पहिला 'केशव' होय. कानात चक्र-मकर कुंडले, डोक्यावर करंड मुकुट, उंच उंच होत गेलेला त्यावर आमलक व कळस, (तुटलेला) मुकुटाच्या मध्यात किर्तीमुखाची रचना असून मुकुटाच्या मागे स्वतंत्र प्रभामंडळ दाखविण्यात आलेला आहे. अंगावर टपोऱ्या मोत्यांची मण्यांची एकावली माळ, यज्ञोपवित, (हेमसुत्र), बाहुबंध, हातात कंकणे व बहुतेक चारही हाताच्या पाचही बोटांमध्ये अंगठ्यांची रचना असून अंगठ्यांमध्ये रत्ने, मोती वापर केल्याचे दिसते. गुढग्यापर्यंत लोंबणारे मण्यांचे सर व मांडीभोवती साखळ्या असलेली मेखला हे प्रमुख दागिन्यांपैकी एक दागिना होत. इतर देवतांमध्ये पायात कोणताही दागिना दिसत नाही परंतु विष्णूच्या पायात दागिने पहावयास मिळतो तसा वाड:मयीन उल्लेख ही मिळतो. (अपराजित पृच्छाषोडशाभरण २३६ पान६०१-८)
शरिररचनेचा विचार केल्यास सडपातळ शरिरधारी, प्रलंबबाहु, बोटांची वळणदार व नाजुकता, चेहऱ्यावरील भाव, अर्थोन्मिलित डोळे, एकाग्र दृष्टी पाहता कलाकाराने आपली कला पूर्णपणे ओतल्यासारखे भाव संपूर्ण मूर्तीत पाहावयास मिळतो. विष्णूच्या मूर्तीशास्त्रानुसार श्रीवत्स व कौस्तुभ हे चिन्हांपैकी श्रीवत्सचिन्ह या मूर्तीच्या छातीच्या मध्यभागी शंकरपाळी आकाराचे कोरले आहे. श्री विष्णूने त्रिशूल चिन्ह शिवाचे मैत्रीस्तव हृदयावर धारण केले अशी कथा आहे.
लक्ष्मी : विष्णूपत्नी लक्ष्मी हिचे अर्धसन स्थानक असून डोक्यावर केशरचना आहे. चेहऱ्याभोवती गोलाकारातील प्रभामंडल कोरलेले आहे. उजवा हात मांडीवर, डावा हात सिंहकर्ण मुद्रेत असून हातात उमलते फूल दाखविले आहे. कानात कुंडले, गळ्यात मोतीमाळा, सरी, बाजूबंद, हातात बांगड्या, कमरबंध, गुडघ्याभोवती माळा, पायात कंकणे व पैंजण अशी भरपूर अलंकार दाखविण्यात आले आहेत.
गरुड : विष्णू लाच्छन (वाहन) म्हणून गरुडाची मूर्ती अर्धसम उभी असून अंजलीमुद्रेतील मूर्ती मानवी रूपात दाखविली गेली. गरुडाचे प्रमुख लक्षण टोकदार नाकासोबत पंख ही कोरण्यात आले आहे. त्यासही अलंकाराने सजवलेले आहे. डोक्यावर करंडमुकुट, त्यामागे लंब प्रभामंडल, केसाच्या जटा, कर्णफुले, एकावली, कमरबंध, पायात दागिने कोरलेले आहेत.
आयुधदेवता : आयुधांना स्वतंत्र देवता कल्पून मानवी रूपात आयुधांचे अंकन गुप्तकाळापासून रुढ झाली. (जोशी नि.पु. १९७९ पा. ५१) या मानवी रुपातील धारण केलेल्या आयुधांना आयुधपुरुष म्हणून ओळखतात याच्या निर्मितीमागे स्वतंत्र कथा रामायण, महाभारत या महाकाव्यात येते. साधारणपणे या मानवी आयुधपुरुषांचे अंकन ठेंगू असतात. गदेला स्त्रीरुपात दाखवित असल्याने गदादेवी म्हणून संबोधले जाते. गदेच्या दर्शनी भागावर स्त्री मूर्ती कोरली जाते परंतू येथे किर्तीमुखाची रचना गदेच्या मुदगलासारखी म्हणजे खालून वर निमुळता होत गेलेला कुंभ/आमलक संबोधतात. लक्ष्मीच्या' बाजूस खुज्या आकारातील विष्णूच्या डाव्या हातात चक्र असल्याने त्याच बाजूस स्वतंत्रपणे चक्रपुरुष खोदण्यात आले. डाव्या हातात चक्र धरलेला व उजवा हात मांडीवर समभंगावस्थेत स्थानक मूर्ती कोरलेली आहे. डोक्यावर करंडमुकुट, शरिरावर मोजके दागिने या मूर्तीच्या मागे प्रभामंडल नाही तसेच विष्णूच्या उजव्या बाजूस खाली नमस्कार मुद्रेतील गरुडाच्या मूर्तीच्या बाजूस शंखपुरुषाची मूर्ती आहे. तिच्या उजव्या हातात शंख धरलेला असून डावा हात मांडीवर ठेवलेला आहे. समभंगावस्थेत स्थानक मूर्ती कोरलेली आहे. या ही मूर्तीच्या अंगावर मोजके दागिने दिसत आहेत, ही आयुध पुरुषाची मूर्तीचा उद्देश रक्षणाचा असल्याने विशेष महत्व आहे. विष्णू मूर्तीच्या पायाखाली पीठ सोडून पाठशीळेवर प्रभावलायाची रचना केली आहे. या रचनेचा उद्दीष्ठ दगडी मूर्तीस आधार देणे होय. या आधाराचा वापर प्रभावलयात केले गेले. चौकोन दगडाच्या शेवटी अर्धशंकरपाळीकृती होत त्या टोकास पूरित म्हणतात. रथाच्या संख्येप्रमाणे वाहिलेला त्रिरथ, पंचरथ, सप्तरथ अशी संज्ञा देतात. ही पाठशीळा संपूर्णपणे प्रभामंडलाचे काम करते. या प्रभावळीत मूर्तीच्या खांद्याखाली स्तंभशाखाची रचना आहे, ही रचना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील अर्धस्तंभाच्या भौमितिक रचनेसारखी हुबेहुब भासते. त्याप्रमाणे येथे स्तंभशाखेची रचना असून तीवर कमलाकृती वेटोळ्याचे प्रभावलय कोरलेले आहे खाली मकरीचे अंकन तीवर उजव्या डाव्या भागात दशावताराची मूर्तीचे अंकन केलेले आहे. मुख्य वरील बाजूस किर्ती मुखाची रचना केलेली आहे. दशावतरात दोन जलचर, मत्स्य-कूर्म, दोन अर्धमानवी प्राणी रुपातील वराह-नृसिंह तर उर्वरित मानवी रुपातील अवताराची कल्पना केली आहे ती वामन, परशुराम राम, बलराम, बोध्दी व कलकी असा आहे.'
संकल्पना : श्री. रविन्द्र मेहेंदळे, पुणे मो. : ९८२३०१९९३३
श्री. गाजूल बी.एस. अभिरक्षक, पुरातत्वसंग्रहालय,डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, पुणे