04/08/2021
साधेपणाचा अर्थ म्हणजे भाऊ.
संपूर्ण जगाला व्यवस्थापनाचे धडे शिकवणारे कर्मयोगी, गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील आपल्याला पोरके करून निघून गेले.सेवा हाच त्यांचा धर्म ! आणि तो त्यांनी अतिशय समर्पणाने केला.महाराजांच्या सेवेत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवलं.ते ही एका सामान्य भक्ताप्रमाणेच.
संस्थानचे मालक असूनही साध्या फायबरच्या खुर्चीत बसूनही उत्कृष्ट व्यवस्थापन कसे होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भाऊ. संस्थानमध्ये स्वच्छता व नम्रता याचे जिवंत उदाहरण निर्माण करणारे भाऊ. हजारो लोक मंदिरात असतानाही कमालीची शांतता व शिस्त याचे उत्तम असे व्यवस्थापन करणारे भाऊ.
भक्तांच्या सोयीसाठीही पावलोपावली निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देणारे भाऊ . भक्तांच्या वेळेची व सुविधेची काळजी घेणारे भाऊ. लाॅकडाऊन नंतरच्या कोरोनाकाळात भक्तांची सुनियोजित काळजी घेऊन भक्तांना दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून मंदिर सुरू केले त्यावेळेस संपूर्ण भारतभर कोरोनाच्या संकटकाळात देवस्थानात नियम कसे पाळावे याचा एक आदर्श निर्माण करणारे भाऊ.
वारकरी पंथाचा अवलंब करून पंढरपूर वारी पायी करणारे भाऊ.कोणत्याही देवस्थानात एकटे भेट द्यायला गेले असता,तेथे स्वतःचे सर्व काम स्वतःच करणारे भाऊ,ज्यांच्या एका इशा-यावर दहा जण धावून येतील , पण तरिही स्वावलंबन म्हणून झाडाचे खाली पडलेले वाळलेले पान स्वतःच उचलून कचरापेटीत टाकणारे भाऊ.
साधेपणा चा अर्थ जपणारा साधुपुरूष. या साथुपुरूषाचा शेवटही अगदी साधेपणाने झाला.
श्री संत गजानन महाराजांचे चरणी सेवा अर्पण करणारे शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाने शेगांव पोरके झाले. श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापन काटेकोरपणे राखण्याबरोबरच संस्थानाला एका वेगळ्या रूपात त्यांनी घडवले.सामाजिक व धार्मिक कार्याची सांगड घालून त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आदर्श निर्माण केला. सेवाव्रत धारण केलेला हा कर्मयोगी सर्व भक्तांचा पालनकर्ता होता.
त्यांच्या शब्दाला मान होता.त्यांचा आदर तसेच आदर्श होता शेगांव संस्थानात. .त्यांची विचारसरणी सामान्य माणसापेक्षा वेगळी होती आणि म्हणून सामान्य माणसाच्या हिताची होती.
आज त्यांच्या निघून जाण्याने शेगाव शहरात व संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच न भरून निघणारी आहे.देव माणूस आपल्याला सोडून गेला हे खरे, पण त्यांचे विचार आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती
दिपक वाडेकर शेगांव 🙏🏻