कोथरूड
कोथरूड हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे.कोथरूड सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर आहे ]एखाद दोन प्रमुख खासगी उद्योग संस्था(कारखाने) वगळता मुख्यत्वे मध्यमवर्गीय निवासी क्षेत्रांचा या विभागात समावेश होतो.
भौगोलिक सीमा
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा कोथरूड परिसरातील पुतळा
कोथरूड गावठाण हा भाग बहुधा विस्तारपूर्व मूळ कोथरूड गाव असावे.महापालिका प्र
भाग क्रमांक २६ , २७ , २८ , २९ आणि ३४ मध्ये कोथरूड प्रभाग विभागला आहे.[४]पौडफाटा/एस.एन.डी.टी. परिसरापाशी एरंडवणे परिसर संपल्यानंतर कोथरूड परिसराची सुरवात होते. ’कर्वे रस्ता’ आणि ’पौड रस्ता’ हे कोथरुडमधील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. पौडफाटा ते चांदणी चौक तसेच कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी च्या पलीकडील वनदेवीची टेकडी या सर्वसाधारणपणे कोथरूडच्या सीमा मानल्या जातात. डहाणूकर कॉलनीनंतरचा हिंगणे आणि कर्वे नगर परिसर हा स्वतंत्र कर्वेनगर परिसराचा भाग असला तरी बऱ्याचदा त्यांना विस्तारित कोथरूडचा भाग म्हणून उल्लेखिले जाते.
कोथरुडमधील काही महत्त्वाची ठिकाणे
कोथरूड गावठाणातील म्हातोबा मंदिर ग्राम दैवत, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणेश मंदिर, हनुमान मंदिर, मॄत्युंजयेश्वर मंदिर, वनदेवी मंदिर ही पुरातन प्रमुख देवळे, आणि एम.आय.टी. रस्त्यावरील जयभवानी मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगॄह, सिटीप्राईड चित्रगॄह, वेदभवन, थोरात उद्यान. कोथरूड गावठाण्याच्या सुरवातीस लागणारा कर्वे यांचा पुतळा आणि गावठाणाच्या एका बाजूस शिवाजीचा पुतळा आणि पौडफाटा उड्डाणपूल, या प्रमुख परिचय खुणा आहेत.
प्रमुख निवासी क्षेत्रे
कोथरूड गावठाण, कर्वे रस्ता आणि पौड स्त्यावरील निवास क्षेत्रांव्यतिरिक्त,राहुल नगर, डहाणूकर कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी, भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, कुमार परिसर, महात्मा सोसायटी ही प्रमुख निवासी क्षेत्रे या परिसरात मोडतात.
केळेवाडी,जयभवानीनगर , किष्किंदानगर आणि सुतारदरा या परिसरात निम्नमध्यमवर्गीय वस्त्या आणि झोपडपट्टया देखिल आहेत. [५]
उद्याने आणि टेकड्या
उद्याने
थोरात उद्यान, धोंडीबा सुतार बालोद्यान, मयूर कॉलनी, पं. जितेंद्र अभिषेकी उद्यान ही कोथरूडमध्ये आहेत, तर कर्वेनगर परिसरातील ताथवडे उद्यान आणि सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यान हीही या परिसराच्या जवळची दुसरी उद्याने आहेत.
टेकड्या
वनदेवी/हिंगणे, हनुमान टेकडी(एआरएआय), रामबाग कॉलनी टेकडी, एनडीए(चांदणी चौक)
वाहतूक
डेक्कन/एरंडवण्यातून कर्वे रस्त्याने येणारी वाहतूक एस एन डी टी/पौडफाटा येथे पौड रस्ता आणि पुढे सरळ जाणारा कर्वे रस्ता यात विभागली जाते. मुठा नदीवरच्या गरवारे, म्हात्रे पुलांवरून येणारी रहदारी एरंडवण्यातील कर्वे रस्तास समांतर सीडीएसएस समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जाऊन राहुल नगर परिसरातून, अथवा संगमप्रेस समोरून जाऊन करिश्मा चौकात पुन्हा कर्वे रस्त्यावर येते. अथवा कॅनॉल रस्त्याने काही अंतर जाऊन, कर्वे रस्त्याला समांतर जाऊन परत कर्वे रस्त्यावर येते. पौड रस्त्यावरून पुढे जाणारी रहदारी चांदणी चौक परिसरात आणि कर्वे रस्त्याने पुढे जाणारी वाहतूक वारजे चौकात मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळणरस्त्याला जाऊन मिळते.
पौडफाटा, आनंदगर, करिष्मा चौक, मृत्युंजयेश्वर येथील मयूर कॉलनी फाटा, कर्वे पुतळा, कोकण एक्सप्रेस चौक, डहाणूकर कॉलनी चौक येथे वाहतूक नियंत्रक आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
पुणे, पिंपरी-चिंचवड परिवहन मंडळाच्या बसने सार्वजमनिक वाहतुकीचा भार वाहिला जातो. पुणे,पिंपरी-चिंचवड परिवहन मंडळाचे कर्वे रस्त्यावर धोंडीबा सुतार कोथरूड बसस्टँड आणि पौडरस्त्यावर कोथरूड बस डेपो हे वेगवेगळे प्रमुख बस टर्मिनस आहेत.
कोथरूड परिसर सार्वजनिक वाहतुकीकरिता मेट्रो रेल्वे ही पौड रस्त्याने वनाज कंपनीपर्यंत आणि कर्वे रस्त्याने वारजे परिसरापर्यंत पोहोचण्याचे प्रस्तावित आहे.
इतर खासगी सार्वजनिक वाहतूक मुख्यत्वे ऑटोरिक्षाने होते.
संस्था
खासगी संस्थांमध्ये, पूर्वाश्रमीच्या किर्लोस्कर समूहातून वेगळी झालेली, डिझेल इंजिनांची उत्पादन करणारी कमिन्स मर्यादित या प्रमुख संस्थेशिवाय किर्लोस्कर समूहांतर्गत, आणि पौड रस्त्यावरील वनाझ इंजिनियरिंग कंपनी व काही दुय्यम कंपन्यांचा समावेश होतो. पौड रस्त्याजवळील टेकडीवर एआरएआय ही राष्ट्रीय स्तरावरील स्वयंचलित वाहनांसंदर्भात उच्चस्तरीय संशोधन आणि मानांकन करणारी स्वायत्त संस्था आहे.
एरंडवणे आणि कोथरूड परिसरातील मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच व्यापारी साखळ्यांनी त्यांची दालने कर्वे रस्ता आणि पौडरोड परिसरात उभारली आहेत.
डीपी रोड परिसरातील महापालिकेचे विभागीय कार्यालय, गुजरात कॉलनी परिसरातील विभागीय इस्पितळ, आणि भाजी मंडई, कचरा डेपो परिसरातील कोथरूड पोलिस ठाणे यांच्या मार्फत विविध सार्वजनिक सुव्यवस्थांचा कारभार पाहिला जातो.
शिक्षण
श्री. छन्नूलाल मिश्रा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सादर करताना
पौडफाट्याच्या सीमेवर एस एन डी टी, पौड रस्त्यावर एम. आय. टी. आणि कर्वे नगर परिसरात कमिन्स कॉलेज ही प्रथितयश महाविद्यालये, शिवाय मराठवाडा मित्रमडळाचे अभियांत्रिरीकी महाविद्यालय, एकलव्य, शिवराय प्रतिष्ठानची महाविद्यालये, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, भारती विद्यापीठाचा कोथरूड परिसर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मुख्यालय हे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या परिसरात आहे. जोग, बालशिक्षण, एम् आय् टी,, शिवराय प्रतिश्ठान, भारती विद्या भवनची परांजपे प्रशाला, माहेश्वरी शिक्षण मंडळाची प्रशाला, आणि महापालिकेच्या प्रशाला या शाळाही येथे आहेत. एन सी ई आर टी चे फील्ड युनिट कार्यालय मयूर कॉलनी परिसरात आहे.
विस्तारित कोथरूडचा परिसर संपल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए च्या परिसराची सुरुवात होते
संस्कृती
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड
मुख्यत्वे सुशिक्षित सधन मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीचा प्रभाव कोथरूड परिसरात आढळून येतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रासंगिक कार्यक्रम, नाटके, संलग्न कला दालनातील प्रदर्शने यांच्या व्यतिरिक्त काही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजनही केले जाते. कोथरूडच्या विविध उपपरिसरात वेगवेगळ्या वसंत व्याख्यानमालांचे वार्षिक आयोजन केले जाते.
पारंपरिक वार्षिक गणेशोत्सवासोबत, नवरात्री, गरबा, भोंडला, दही हंडी इत्यांदीचाही थोडा सहभाग असतो.
प्रदूषण समस्या आणि आपत्ती
कोथरूड परिसरात मुख्यत्वे वाहनांमुळे झालेले वायुप्रदूषण तसेच ध्वनिप्रदूषण होते
मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळीपासून बऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नालाप्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे, नाल्यांमधील अतिक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड यामुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतिवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वांत वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला. खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पूरसदृश्य परिस्थितीचा अनुभव येतो.