04/07/2023
तुम्हांला माहितीय का आज ‘जागतिक फणस दिन’ आहे... चक्रावलात असाही काही दिवस असतो म्हणून.
फणसाचा समावेश पूर्णान्न कॅटेगरीमध्ये होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही फणस उत्तम आहे. जीवनसत्त्व अ आणि क, फायबर (तंतू) ठासून भरलेला फणस पोटभरीच फळ आहे. दुपारच्या जेवणात फणसाची दीड-दोन वाट्या भाजी खाल्लीत तर रात्री तुम्हांला अगदी हलकी भूक लागेल. त्यामुळे मधुमेही किंवा वजन कमी करणाऱ्यांकरता फणस एक चांगला पर्याय आहे. यात पोटॅशियम आहे. शरीरातलं सोडियम आणि द्रव पदार्थांचं प्रमाण नियमित करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. एंटीऑक्सिडंट असल्यामुळं फणस कॅन्सर प्रतिबंधक आहे. फणसाची मूळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळं जमिनीत खोलवर असणारे क्षार आपल्याला गऱ्यांमधून मिळतात. फणसाच्या टेक्स्चरमुळं हल्ली मांसाहाराला पर्याय म्हणूनही कच्च्या फणसाचा वापर केला जातोय. नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादकांमधील जागरुकतेमुळं कोकणात आणि केरळमध्ये गेल्या काही वर्षात फणसक्रांतीला सुरूवात झालीय. केरळमध्ये श्रीकृष्ण पद्रे नावाचे वरिष्ठ कृषी पत्रकार देशभरातील फणस उत्पादक शेतकरी आणि देशाबाहेरील उद्योग यांच्यातला दुवा आहेत. त्यांच्या भरीव कामगिरीमुळं केरळ सरकारनं त्यांची केरळचे फणस राजदूत म्हणून नेमणूक केलीय. 20 वर्ष वयाच्या फणसाच्या झाडाचं लाकूड सर्व प्रकारच्या फर्निचरकरता, घराच्या बांधकामाकरता उत्तम आहे. नारळापेक्षाही किंचीत जास्तच गुण फणसामध्ये आहेत.. त्यामुळं फणसही कल्पवृक्षच आहे.
आपल्या देशात फणसाचं मूळ आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियाई देशांमध्ये फणसाचं उत्पादन आणि लागवड झपाट्यानं वाढत आहे. व्हिएतनाम फणसप्रक्रिया उद्योगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया आणि चीन या देशांना व्हिएतनाम फणसाचे चीप्स निर्यात करतं. व्हिएतनामच्या या उद्योगांना वर्षाला शंभर हजार टनांपेक्षा अधिक फणस लागतात. अगदी थायलंड, आफ्रिकेच्या काही भागात आणि मेक्सिकोमध्येही मुख्य पिक म्हणून फणसाची लागवड करण्यात येतेय. पण अजूनही भारतात व्यावसायिकदृष्ट्या फणसाचा फारसा विचार केला जात नाही. तामिळनाडूतल्या पनरुत्तीमध्ये वर्षभर फणस मिळतो. सहकारी संस्थेच्या माध्यमातून फणसाची व्यावसायिकरित्या लागवड करण्यात येते. इथं 70-80 किलो वजनाचेही फणस मिळतात. पनरुत्ती आणि कर्नाटकच्या तुबगेरेमधून व्हिएतनामला फणस निर्यात करण्यात येतात. ईशान्य भारतातही फणस चांगलाच लोकप्रिय आहे. नुकतंच शिलाँगमध्ये स्मोकी जॅक या कंपनीला आठळ्यांपासून जॉकलेट बनवायला व्यावसायिक परवानगीही मिळालीय. या जॉकलेटमध्ये कोको आणि दूध पावडर नाहीये.
कच्च्या फणसाची भाकरी बनवता येते. साधारण 2 लीटरचं भांडं भरून कोवळ्या फणसाचे गरे घ्यायचे. कोवळ्यामध्ये तर आठळ्या नसतातचं. गरे बारिक वाटायचे. या पेस्टमध्ये, 2 कप तांदूळ भिजवून बारिक वाटून मिसळायचे. वाटायला लागेल इतपतच पाणी घालायचं. भाकरी थापता येईल एवढचं सैलसर पीठ हवं. केळीच्या पानात भाकरी थापून मग पानासकटच भाकरी गरम तव्यावर टाकायची. पानाकडील बाजू वरती. खालून भाकरी शेकू लागली की वरून पान आपोआप सुटून येतं. मग उलथून दुसऱ्या बाजूनं शेकवायची.
कच्च्या फणसाची बिर्याणी, कबाब, पॅटिस तर बनवतातचं पण कोवळ्या फणसाचा चक्क बटाटावडाही बनवतात. च्यॅवम्यॅव खाऊ किंवा स्टार्टर्समधला हा एक नवा ऑप्शन आहे.
आपल्याला हे कच्चे गरे टिकवताही येतात. आठळ्या काढलेले कच्चे गरे एका बरणीत भरा आणि त्यात जाडं/खड्याच मीठ घाला. आठवडाभर दिवसातून एकदा हे खालीवर हलवा. मीठाला पाणी सुटू लागत. झाकण घट्ट लावून फडताळात बरणी ठेवा. हे कच्चे गरे सहा महिने टिकतात. हवं तेव्हा गरे काढा. स्वच्छ धुवून घ्या मग एक दिवसभर साध्या पाण्यात भिजत घाला म्हणजे अतिरिक्त मीठ निघून जाईल. आणि मग हवा तो पदार्थ बनवा. अगदी भाजीही. या टिकवलेल्या गऱ्यांच्या पेस्टमध्ये ओलं खोबरं, जीर वाटून घालायचं. पाणी नाही घालायचं. गोळा होईल इतकी तांदूळाची पीठी घाला. तेलाचा हात लावून लहान बोराएवढे गोळे करा आणि कढईत सोडा. सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळा. थोडे कुरकुरीत कडक असतात पण येताजाता तोंडात टाकायला, टाईमपासकरता छान.
सर्वसाधारणपणे आपल्याकडे उडीद, तांदूळ, ज्वारी, नाचणी, पोहे याचे पापड बनवले जातात. पण तुम्हांला आश्चर्य वाटेल फणसाचेही पापड बनवतात. छान पाऊस पाहत खोबरेल तेलात तळलेला फणसाचा पापड त्यावर ओलं खोबरं,साखर पेरलीय आणि फिल्टर कापी (कॉफी). आहाहा, पावसाळ्यात गावी असं रिलॅक्स करायला मला खूप आवडतं. हा पापड भाजूनही छान लागतो. आपल्या आवडीनुसार जेवणात, संध्याकाळच्या टाईमपास खाण्यात तळून, भाजून कसाही एन्जॉय करा. फणसाच्या पापडाकरता कच्चा फणस लागतो. बिया काढून कच्चे गरे वाफवून घेणे. अंदाजे मीठ घालून हे वाफवलेले गरे चेचायचे. हवं असल्यास थोडं तिखट आणि जिरं घाला. या चेचलेल्या लगद्याचे लिंबाएवढे गोळे करा. या गोळ्याला अगदी थेंबबर तेल सगळीकडून लावा. पोळपाटावर प्लॅस्टिक ठेवा त्यावर हा गोळा ठेवा, वरून आणखी एक प्लॅस्टिक ठेवा, मग या गोळ्यावर एखाद्या सपाट वस्तूने/झाकणाने दाब द्यायचा. पण आता प्लॅस्टिक बंदीमुळे काही तरी दुसरा उपाय करावा लागेल. आणि मग सावलीत हे पापड वाळवायचे. मग नेहमीप्रमाणे हवाबंद डब्यात भरायचे.
काही फणसाचे गरे तर केशरी रंगाकडे झुकणारेही असतात. फणसाच्या असंख्य जाती आहेत. ढोबळमानाने जास्त रसाळ व फायबर असणारा आणि जास्त मांसल असलेला असे प्रकार आहेत. यातही बऱ्याच पोटजाती आहेत आणि नव्याने विकसितही होत आहेत.
गरे नुसते खाण्यासोबतच सांदण, खीर, केक, आईस्क्रिम, बिस्किटं, केक यातही वापर होतो. गऱ्याचा रस टिकवताही येतो. आठळ्या काढून वाटलेले गरे जाड बुडाच्या भांड्यात घेवून मध्यम आचेवर चांगले परतायचे. त्यातला पाण्याचा अंश पूर्ण काढायचा. घट्ट गोळा तयार होईपर्यंत परतत राहायचं. तपकिरी रंग येतो. हे गोळे बनवून 7-8 महिने हवाबंद डब्यात ठेवता येतात. याचं खीर, सांदण बनवतात किंवा नुसतं खायलाही छान लागतं. पण जरा मेहनतीच काम आहे.
आठळ्या जरा वाळल्या की त्यांची पांढरी साल पटकन निघते. या आठळ्यांच्या चक्क पुरणपोळ्या बनवतात. हडबडलात ना? पण खरचं. चण्याच्या डाळीऐवजी आठळी वापरायची. पांढरी साल काढल्यावर आठळीला लालसर तपकिरी रंगाची साल असते. सुरीने ही साल खरवडायची. आता आठळी शिजवून घ्यायची. मग नेहमीप्रमाणे गूळ घालायचा. हवं तर ओलं खोबरही घालायचं. आणि नेहमीप्रमाणे पूरण करायचं. बाकी आपल्या नेहमीच्या पूरणपोळीप्रमाणेच पीठाच्या लाटीत पूरण भरून पोळी करायची.
तुम्हीही जर फणसवेडे असाल तर तुमचं फणसावरचं प्रेम हे पदार्थ आणखी वाढवतील हे निश्चित.
©साधना तिप्पनाकजे