19/01/2023
गेली 15 वर्षं अव्याहतपणे सुरू असलेला रत्नागिरीची शान वाढवणारा, आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव जाहीर झाला आहे. हा महोत्सव शनिवार दि. २१ आणि रविवार २२ जानेवारी या दरम्यान थिबा राजवाडा येथे होणार आहे.
शनिवार दि. २१ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या शास्त्रीय सादरीकरणाने या महोत्सवाचा सायंकाळी ७.०० वाजता शुभारंभ होणार आहे. त्यांना प्रणव गुरव तबला साथ तर अथर्व कुलकर्णी संवादिनी साथ करणार आहेत. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून एक तपाहून अधिक काळ शिक्षण घेत यशस्वी यांची उज्ज्वल वाटचाल सुरू आहे.
त्यानंतर, तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला तालचक्र हा ताल, लय, स्वर, पदन्यास यांच्या अनोख्या संगमाचा कार्यक्रम होणार आहे. तालाच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा हा एक अभिनव कार्यक्रम आहे. यात विजय घाटे यांचे तबलावादन, ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे कथ्थक नृत्य अशी सर्वसमावेशक मेजवानी तालचक्रच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे. याला संवादिनी साथ अभिषेक सिनकर करणार आहेत.
दुसर्या आणि समारोपाच्या म्हणजेच दि. २२ जानेवारी या दिवसाची सुरुवात मेहताब अली नियाझी यांच्या सतार वादनाने होईल. प्रसिद्ध अशा भेंडी बाजार घराण्याचे मेहताब वादक आहेत. तसेच त्यांनी पद्मभूषण राजन - साजन मिश्रा यांच्याकडून गायनाचे धडेदेखील घेतले आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून सादरीकरणाला सुरूवात करून आजपावेतो अनेक मानाच्या, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. मेहताब यांना तबला साथ प्रवीण करकरे आणि योगेश सम्सी यांचे शिष्य श्री. स्वप्निल भिसे करणार आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांप्रमाणेच भारत सरकारतर्फे दिली जाणारी स्वरतीर्थ फडके शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.
थिबा राजवाडा परिसरात होणार्या या महोत्सवाचा भव्य समारोप किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार करणार आहेत. भारत सरकारचा मानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले पं. व्यंकटेश कुमार स्वामी हरिदास रचित भजन गायनासाठी ओळखले जातात. कर्नाटक सरकारमार्फत घेतल्या जाणार्या संगीत परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक यामध्ये पंडितजींनी मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गायनासोबत शिष्य घडवण्यासाठीही अपार मेहनत घेतली आहे.
पंडितजींना संवादिनी साथ करणार आहेत, पं. अजय जोगळेकर. तुळशीदास बोरकर यांच्या तालमीत तयार झालेल्या जोगळेकर यांनी आजपर्यंत भारतातल्या सुमारे सर्वच नामवंत गायक, वादक आणि नृत्य कलाकारांना साथ केली आहे. याच मैफिलीला पं. व्यंकटेश कुमार यांना तबला साथ करणार आहेत, बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध वादक भरत कामत. आजोबांकडून मिळालेल्या संगीत वारश्याची जपणूक करत कामत यांनी आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या महोत्सवांमधून तसेच अगणित व्यावसायिक रेकॉर्डिंगला साथसंगत केली आहे.
गेली दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक मानाचे महोत्सव कोव्हिड आणि तात्कालीक कारणांनी होऊ शकले नाहीत, मात्र त्याही परिस्थितीत आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा परिसरात होणारा संगीत महोत्सव मात्र खंड न पडता सुरू राहिला. यात रसिकांनी आणि प्रायोजकांनी अतिशय महत्वाचा वाटा उचलला. आता यंदाच्या महोत्सवाच्या पूर्वतयारीला सुरूवात झाली असून त्यातील महत्वाचा भाग म्हणजे संगीत महोत्सव प्रवेशिका कार्ड्स. सदर कार्ड्स आर्ट सर्कल सदस्यांजवळ उपलब्ध आहेत. वर्षभरात आर्ट सर्कलच्या बॅनरखाली होणारे सर्व कार्यक्रम सदर संगीत महोत्सव प्रवेशिका कार्डधारकांना निःशुल्क पाहता येणार आहेत. तरी प्रतिवर्षीप्रमाणेच रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आर्ट सर्कलने केले आहे.