25/06/2019
जुलेय लडाख!!!
लडाख म्हंटले कि आपल्या डोळ्यांपुढे येतेय ते म्हणजे आपल्या भारत भूमीचे बर्फाच्छदित कळस, जगातील सर्वात उंच असलेले रोड व आपल्या कारगिल युद्धाच्यावेळी आपल्या जवानांनी दिलेले बलिदान, परंतु या व्यतिरिक्त बरेच काही अजून आहे जे आपण येथे जाऊन बघू शकता.
लडाख ला जाण्याची योग्य वेळ म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात तुम्ही कधीही जाऊ शकता. सरळ विमानाद्वारे लेह ला न जाता, रोड मार्गे मनाली किंवा काश्मीर मार्गे गेलेले कधीही चांगले कारण शरीराला योग्य प्रमाणात उंचीवर नेले तर तुम्हाला लेह मधील ऑक्सिजन कमी असल्याचा त्रास होत नाही.
एकूण काश्मीर ची परिस्थिती आणि या महिन्यांमध्ये अमरनाथ यात्रा असल्यामुळे शक्यतो काश्मीर मार्गे टाळून मनाली मार्गे सहल उत्तम होते. काही लोकांची अशी धारणा आहे कि ऑक्सिजन कमी असल्यामुळे आपल्याला खूप त्रास होईल आणि आपल्याला हि सहल जमणार नाही, परंतु हे अर्ध सत्य आहे जर तुम्हाला सकाळी फिरायला जाण्याची / व्यायामाची सवय असेल, तुम्ही तुमच्या प्रकृतीची योग्य काळजी घेत असाल किंवा तुम्हाला कुठलाही आजार असेल परंतु तुम्ही त्याबाबत ची योग्य काळजी घेत असाल आणि तुम्ही योग्य टप्प्या टप्प्या ने लेह ला पोहचत असाल तर तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही.
मनाली मार्गे गेलात तर अजून एक फायदा असा आहे कि त्या वाटेने जाताना डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य बघायला मिळतील, त्यात तागलांग्ला पास जो जगातील दुसरा अति उंचीवरील रोड असलेला पास आहे. मोरोप्लाने जो जगातील अति उंचीवरील आणि सर्वात मोठा सरळ ४५ कि.मी चा रोड आणि अनेक खिंडी (pass) ज्यात रोहतांग, कोक्सर, केलोंग, दारचा, बरालाचा, निकाला, पांग ,लाचुन्ग्ला, पाहायला मिळतात.लेह ला पोहोचल्या वर लगेच फिरायला जाऊ नका, थोडा आराम करा व तो करत असतांना थोड्या थोड्या वेळाने सतत पाणी पीत राहावे. दारू व सिगरेट यांचे सेवन टाळावे.
लेह मध्ये सिंधू नदीच्या काठावर बसून ध्यान लावण्याची इच्छा मनात निर्माण होते, हेमिस, थिकसे, श्ये पॅलेस हि लडाख मधील अतिशय सुंदर व श्रीमंत बुद्ध मंदिर आहेत. काली माता मंदिर व Hall of fame Museum मध्ये आपल्या सैनिकांच्या पराक्रमाच्या गाथा, छायाचित्र,पाक सैन्याची जप्त केलेली शस्त्र बघतांना अंगावर काटा येतो. संध्याकाळी शांती स्तुपा वरून सूर्यास्त बघण्यासारखा असतो.
पॅंगॉन्ग लेक म्हंटले कि ३ इडीयट मधील ते सुंदर असे दृश्य आपल्या समोर येते, परंतु खरोखर तो बघण्यासाठी जात असतांना बर्फाळ डोंगर दर्यातून वाहणाऱ्या नद्या, आजूबाजूला असलेल्या मातकट तपकिरी रंगाच्या टेकड्या, गवताच्या कुरणे यामध्ये चरणारे याक (तिबेट मधील गायींचा एक प्रकार) अशा एक एक दृश्य संपेपर्यंत तुमच्यासमोर येणारा निळाशार पेन्गोंग लेक हा पृथ्वीवरील अति उंचीवरील नजर जाईल तिथपर्यंत न संपणारा तलाव बघतांना स्वर्गीय सुखाचा आनंद घेतल्या सारखे होते. हा तुमच्या सहलीचा सगळ्यात अविस्मरणीय भाग ठरू शकतो.
नुब्रा व्हॅली ला मुळात बर्फाचे वाळवंटच म्हणावे लागेल, लेह पासून नुब्रा व्हॅली कडे जातांना तुम्हाला जगप्रसिद्ध खारदुंगला पास वरून जावे लागते हा पास जगातील सर्वात उंचीवरील पास म्हणून प्रसिद्ध आहे.
उंच उंच बर्फ शिखरे, वळणावळणाचे रस्ते आणि अधून मधून दर्शन देणारे ओढे व धबधबे आणि त्या नंतर रुक्ष आणि उजाड जमीन हि निसर्गाची किमया बघायची असल्यास तुम्ही नक्की नुब्रा व्हॅली ला जावे. नुब्रा व्हॅलीच्या वाळवंट मध्ये तुम्हाला नुब्रा नदी वाहतांना
दिसेल. हुंदर गावाजवळ वाळूच्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दोन हंप असलेल्या उंटावर सफर करता येते. अजून एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ती म्हणजे गरम पाण्याचे झरे या ठिकाणी अंघोळ करण्याची सोय आहे.लेह वरून तुम्हाला कारगिल व द्रास ला जाता येते साधारण ६-७ तासांचा प्रवास आहे. त्या वेळेस वाटेत तुम्हाला मॅग्नेटिक हिल, इंडस-झंस्कार नद्यांचा संगम ह्या गोष्टी बघता येतात. द्रास येथे पोहचल्यावर तुम्हाला युद्ध स्मारक बघून अंगावर काटा आल्या शिवाय आणि छाती अभिमानाने भरून आल्या शिवाय राहणार नाही. कारगिल येथील लामायुरू व मुलबेक या बुद्ध मंदिराला भेट देऊन परत लेह ला येऊन आपल्या परतीच्या प्रवासाची तयारी करायला लागतो. विविधतेने नटलेल्या अश्या ठिकाणी निसर्गाने आपले स्वतःचे नियम बदलले असून ज्या ठिकाणी निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत याचा अनुभव घेण्यासाठी .......... मग कधी म्हणत आहात जुलेय लडाख!! (आपल्याला एक प्रश्न पडला असेल ब्लॉग चे नाव जुलेय लडाख का दिलं असावं परंतु जर तुम्ही लडाख मध्ये गेलात तर तिथल्या बोलीभाषेत धन्यवाद, आपण हळू म्हणावे तेव्हा जुलेय म्हणू शकता, अलविदा, आपण कसे आहात, आपल्याला भेटून आनंद झाला आणि आपले स्वागत आहे इत्यादी साठी जुलेय हा शब्द हमखास वापरला जातो.) - श्री. गिरीश दीघे.